कबाब म्हटले की, तंदुरी कबाब, सीख कबाब, शामी कबाब, अशी कितीतरी उत्तमोत्तम नावे आपल्या डोळ्यासमोर येऊ लागतात. मात्र, गल्लोगल्ली मिळणारा हा पदार्थ आपल्या भारतात नेमका आला कुठून? या पदार्थाला त्याचे नाव कसे मिळाले, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? जर तसे असेल, तर आज आपण त्याचे उत्तर पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कबाब हे आगीवर भाजले जातात किंवा तेलामध्ये तळले जातात. कबाब या शब्दालादेखील त्याचा इतिहास आहे. कबाब हा शब्द पुरातन मेसोपोटेमियामधील अकेडियन भाषेतील शब्द कबाबू यापासून तयार झाला असल्याचे समजते. कबाबू याचा अर्थ भाजणे किंवा तळणे असा होतो. परंतु, कबाबमध्ये इतके प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकाराला त्याचे विशिष्ट असे नाव आहे. आज आपण अशाच दोन प्रसिद्ध कबाब आणि त्यांच्या नावामागील इतिहास जाणून घेऊ.

पाहा कबाबचा इतिहास

सीख कबाब [Seekh kabab]

जवळपास सर्वांनाच ‘सीख कबाब’ खायला खूप आवडतात. मात्र, या पदार्थाचे नाव हे तुर्की भाषेतून आले आहे. बारीक लाकडी काड्यांना मांसाचे मिश्रण लावून, त्याला आगीवर किंवा तंदूरमध्ये भाजून खाण्यासाठी तयार केले जाते. आता ‘सीख’ हा शब्द उर्दू आणि अरेबिक भाषेतील शीख शब्दावरून मिळाला आहे; ज्याचे मूळ तुर्की भाषेतील ‘शीश’ शब्द हे आहे. तुर्की भाषेतील शीश या शब्दाचा अर्थ तलवार, असा होतो. त्यामुळे असे म्हटले जाते की, कदाचित तुर्की लोकांच्या अशा पद्धतीमुळे ‘सीख कबाब’ उदयास आले. परंतु, जुन्या काळात जेव्हा तलवारीने युद्धे व्हायची तेव्हा ग्रीक सैनिक त्यांच्या तलवारींवर शिकार केलेल्या प्राण्याचे मांस शिजवून खात असत, अशी माहिती इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील floydiancookery नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.

हेही वाचा : तुम्ही कधी ‘Upside down’ झाडाबद्दल ऐकले आहे का? काय आहे या चमत्कारिक झाडाचे वैशिष्ट्य पाहा

आता ग्रीस आणि तुर्कस्तान बाजूबाजूला आहेत. त्यामुळे ग्रीक लोकांची ही पद्धत पाहून, तुर्की लोकांनीही त्या पद्धतीचा अवलंब करीत, त्यांच्या पद्धतीने हा पदार्थ तयार केला आणि त्यांच्या दररोजच्या ‘स्ट्रीट फूड’मध्ये तो आत्मसात करून घेतला असावा. परंतु, असा प्रकार त्या दोघांपैकीच पहिल्यांदा कुणी केला, असे सांगणे शक्य होणार नाही.

कारण- जेव्हापासून तलवार युद्धे होत होती तेव्हापासून मांस अशा पद्धतीने शिजवून खाण्याचा प्रकार अस्तित्वात होता. आता अशाच सीख कबाबच्या प्रकारात पर्शियाचा ‘शमशीर कबाब’देखील अनेक काळापासून प्रसिद्ध आहे. नावाप्रमाणेच तेथील लोक समशेर म्हणजेच तलवारींवर मांस शिजवत असत. ही पद्धत आजही अस्तित्वात आहे. जे पर्शियन किंवा इराणी सीख कबाब आहेत, ते तलवारीसारख्या आकाराच्या चपट्या धातूच्या पट्टीवर लावून भाजले जातात, अशी माहिती शेफ रणवीर ब्रारच्या एका व्हिडीओ त्याने सांगितली आहे.

शामी कबाब [Shaami Kabab]

भारतातील हैदराबादमध्ये गिलोटी कबाब आणि शामी कबाब खूप प्रसिद्ध आहेत. मटण, विविध प्रकारचे शाही मसाले वापरून अतिशय कुशलतेने बनविलेले हे कबाब तोंडात टाकताच विरघळू लागतात. परंतु असा हा अप्रतिम, स्वादिष्ट आणि शाही पदार्थ आपल्याकडे नेमका आला कुठून? आणि त्याला शामी हे नाव कसे पडले?

हेही वाचा : घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला मध्य रेल्वेवरील या स्थानकांना कशी मिळाली त्यांची नावे? जाणून घ्या

तर अनेकांचा असा समज आहे की, शामी कबाबमधील शामी याचा संबंध पर्शियन आणि उर्दू शब्द शाम म्हणजेच मराठीत संध्याकाळ, या शब्दाशी निगडित आहे, असे म्हटले जाते. जेव्हा राजे-महाराजे संध्याकाळी कार्यक्रमासाठी भेटत तेव्हा त्यांच्या जेवणामध्ये हे कबाब खाण्यासाठी ठेवले जायचे आणि म्हणून त्याला शामी कबाब म्हणून ओळखले जाऊ लागले, अशी गोष्ट प्रचलित आहे.

याच पदार्थाच्या नावाबद्दल अजून काही गोष्टीसुद्धा ऐकिवात आहेत. त्यातील एक म्हणजे हे शामी कबाब बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचा आणि मसाल्याचा एकत्रित शिजतानाचा वास हा ‘शमामा’ नावाच्या अत्तराप्रमाणे येत असे म्हणून या कबाबला ‘शामी’, असे नाव पडले, अशी माहिती floydiancookery या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर झालेल्या व्हिडीओमधून समजते.

मात्र, शेफ रणवीर ब्रारने त्याच्या एका व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार शामी कबाब आणि शाम [संध्याकाळ] यांचा कोणताही संबंध नसल्याचे त्याने म्हटले आहे. त्याने शेअर केलेल्या माहितीनुसार, शामी हे नाव शम्स या शब्दावरून पडले आहे. जुन्या काळात आणि आजही सीरियाचे नाव हे अल-शम्स, असे आहे. आता हे कबाब सीरियामधून भारतात आले असल्याने त्याचे नाव हे शामी कबाब, असे पडले आहे. त्यामुळे “तुम्ही कुठेही अल-शम्स किंवा शामी कबाब लिहिलेले वाचल्यास त्याचा त्याचा अर्थ शाम या शब्दाशी न जोडता, सीरियामधून आलेल्या पदार्थाशी जोडा,” असेही शेफ रणवीरने त्याच्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @floydiancookery नावाच्या अकाऊंटवरून आणि शेफ रणवीर ब्रारच्या युट्यूब चॅनलवरून शेअर झालेल्या व्हिडिओमधून माहिती मिळवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History and origin of name seekh and shami kabab how did this food items get their names check out in marathi dha