देशातील सर्वात मोठ्या शितपेय बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक असणारी कंपनी म्हणजे कोका कोला. याच कंपनीमार्फत बनवण्यात येणारे ‘थम्स अप’ हे शितपेयही भारतामध्ये खूप लोकप्रिय आहे. मात्र या शितपेयाचे नाव लिहिताना ते Thums Up असं लिहिलं जातं. यामध्ये B या अक्षराचा उल्लेख टाळण्यात आला आहे. पण असं का हे तुम्हाला ठाऊक आहे का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘थम्स अप’ची स्थापना १९७७ साली करण्यात आली. मुळची अमेरिकन कंपनी असणाऱ्या कोका कोला कंपनीने भारतामधून काढता पाय घेतला. परदेशी कंपनीन्यांनी आपल्या मालकीपैकी ६० टक्के मालकी ही भारतीय सह उत्पादक कंपनीबरोबर वाटून घ्यावी असा नियम बनवण्यात आल्याने ‘थम्स अप’ या भारतीय ब्रॅण्डची स्थापना करण्यात आली असं ‘मार्केटींग माईण्ड्स’ या वेबसाईवरील लेखात नमूद करण्यात आलं आहे.

त्यावेळी पार्ले या कंपनीचे सह मालक असणाऱ्या चौहान बंधूच्या मदतीने ‘थम्स अप’ची स्थापना करण्यात आली. त्यावेळी पार्लेची लिम्का आणि गोल्ड स्पॉट ही शितपेये भारतामध्ये लोकप्रिय होती. पाहता पाहता अल्पावधीत ‘थम्स अप’ भारतामध्ये लोकप्रिय झाले. ‘थम्स अप’मध्ये भारतात कोका कोलाने शितपेय उद्योगांमध्ये वर्चस्व मिळवलं. कोका कोलापेक्षा चव वेगळी राखण्यासाठी चौहान बंधू आणि त्यांच्या टीमने ‘थम्स अप’मध्ये अधिक सोडा वापरला. नवीन फॉर्म्युलासहीत चौहान आणि त्यांची टीम प्रोडक्ट बाजारामध्ये आणण्यासाठी तयार होती ते केवळ चांगल्या नावाच्या शोधात होते. अनेक चर्चा आणि सल्ल्यानंतर अखेर ‘थम्बस अप’ हे नाव देण्याचं ठरवण्यात आलं. मात्र हे नाव शितपेयाची चव आणि त्याबद्दल माहिती देणारं नसल्याची टिका काहीजणांनी केली. त्यावेळेच आज सर्रासपणे ऑल द बेस्ट साठी वापरला जाणारी अंगठाची खूण जास्त लोकप्रिय नव्हती. त्यामुळेच हे नाव ठेवावे की नाही याबद्दल पुन्हा प्रश्न निर्माण झाला.

अखेर रमेश चौहान यांनी ‘थम्बस अप’ हेच नाव ठेवण्याचा आग्रह धरला. अखेर या ब्रॅण्डची नाव नोंदणी करण्याच्या वेळी चौहान यांच्या वकीलांनी त्यांना ‘Thumbs Up’ या नावामधून ‘B’ अक्षर वगळण्याचा सल्ला दिला. ‘B’ वगळल्याने नवीन नाव वाटेल असा सल्ला वकीलांनी चौहान यांना दिला. अखेर ‘B’ वगळून ‘Thums Up’ असे नाव ठेवण्याचं निश्चित करण्यात आलं. त्यानंतर लाल रंगाचा अंगठा दाखवणारा हाताच्या आकाराचा लोगो वापरुन या ब्रॅण्डचा जन्म झाला. थोडक्यात सांगायचं झालं तर चौहान यांनी नवीन ब्रॅण्डचे नाव वेगळं वाटावं या एकमेव हेतूने ‘Thumbs Up’च्या नावातून ‘B’ वगळण्याचा निर्णय घेतला. चौहान यांचा हा निर्णय यशस्वी ठरला आणि ‘Thums Up’ आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. हे आज देशातील सर्वात लोकप्रिय शितपेयांपैकी एक आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know why thums up was named without letter b scsg