Chiranjivi and Saubhagyakankshini: भारतीय संस्कृतीत लग्नाला पवित्र बंधन मानले जाते. त्यामुळे लग्नातील सर्व प्रथा, परंपरा आणि विधींना खूप महत्त्व देण्यात आले आहे. लग्नापूर्वी मेंदी, हळद, चुडा या प्रथांव्यतिरिक्त वर वधूच्या गळ्यात घालत असलेले मंगळसूत्र, सप्तपदी, कन्यादान या सर्व विधींमागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणही जोडलेले आहे. या प्रथांमागील महत्त्व तुम्हाला ठाऊक असेलच; परंतु लग्नाचे आमंत्रण देणाऱ्या पत्रिकेतील ‘या’ एका गोष्टीबद्दलची माहिती तुम्हाला ठाऊक आहे का? खरं तर लग्नाची आमंत्रण पत्रिका या सोहळ्याचा अविभाज्य भाग असते. या लग्नपत्रिकांवर वराच्या नावापुढे ‘चिरंजीव’ तर वधूच्या नावापुढे ‘सौभाग्यकांक्षिणी’ असे लिहिले जाते. वधू-वराच्या नावापुढे असे का लिहिले जाते? याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका दंतकथेनुसार, एका निपुत्रिक ब्राह्मण जोडप्याने अपत्यप्राप्तीसाठी आदिशक्तीची आराधना केली होती. त्यांच्या आराधनेने प्रसन्न होऊन देवी वरदान देण्यासाठी प्रकट झाली. परंतु, त्यावेळी वर देताना तिने ब्राह्मणाला दोन पर्याय दिले; ज्यात तिने सांगितले, “तुमच्यापोटी एक मुलगा जन्माला येईल, जो मूर्ख असेल; मात्र तो दीर्घायुषी असेल.” दुसऱ्या पर्यानुसार देवीने सांगितले, “तुमच्यापोटी असा मुलगा जन्माला येईल, जो खूप बुद्धिमान असेल; मात्र तो केवळ १५ वर्षे जगेल.” यावेळी ब्राह्मण जोडप्याने बुद्धिमान अपत्य मागितले.

काही काळानंतर ब्राह्मण जोडप्याच्या घरी बुद्धिमान मुलाने जन्म घेतला; परंतु त्याच्या पालकांना मुलाच्या अल्प आयुष्याची चिंता होती. वडिलांनी मुलाला शिक्षणासाठी काशीला पाठवले, तिथे त्याला एका श्रीमंत माणसाची मुलगी भेटली आणि त्याने तिच्याशी लग्न केले. ती मुलगीही आदिशक्तीची मोठी भक्त होती. दुर्दैवाने लग्नाचा दिवस हा मुलाच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला आणि यमराज त्याचा जीव घेण्यासाठी सापाच्या रूपात आला. सापाने मुलाचा चावा घेतला; पण त्याच्या पत्नीने तत्परता दाखवत सापाला टोपलीत बंद केले. हा साप स्वतः यमराज असल्याने यमलोक स्तब्ध झाले, असे म्हणतात.

पतीचा जीव वाचवण्यासाठी नवविवाहिता आदिशक्तीच्या पूजेत मग्न झाली. तिच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवी प्रकट झाली आणि तिने मुलीला यमराजाला मुक्त करण्यास सांगितले. तिने आज्ञेचे पालन केले आणि देवीच्या आज्ञेनुसार यमराजाने ब्राह्मण पुत्राला जीवदान दिले आणि त्याला ‘चिरंजीवी’ होण्याचा आशीर्वाद दिला.

यमराजांनी नवविवाहितेला ‘सौभाग्यवती’ असे संबोधले. तेव्हापासून वराला ‘चिरंजीव’ आणि वधूला ‘सौभाग्यकांक्षिणी’ (म्हणजे भाग्यवान होऊ इच्छिणारी मुलगी) होण्यासाठी वरदान म्हणून हे शब्द वधू-वरांच्या नावांपुढे लिहिले जातात.

सौभाग्यकांक्षिणी शब्दाचा अर्थ

सौभाग्य या शब्दाची फोड ‘सु-भग’ अशी होते. ‘भग’ या शब्दाचा अर्थ स्त्री-जननेंद्रिय असा काही शब्दकोशांमध्ये दिला आहे. सौभाग्यकांक्षिणी म्हणजे पतिसौख्य शेवटपर्यंत मिळो, अशी इच्छा असणारी स्त्री. या नात्यातून संतती निर्माण व्हावी हादेखील त्यामागील हेतू असतो आणि तशी इच्छा प्रत्येक लग्नोत्सुक मुलीची असणे नैसर्गिक आहे म्हणून ती ‘सौभाग्यकांक्षिणी.’ भारतीय समाजात गणिकेलाही सौभाग्यवती मानले जाते. तसेच भग म्हणजे भाग्य असेही होय. त्याशिवाय भग म्हणजे सुदैव, कीर्ती, भरभराट, उत्कर्ष, सौंदर्य असेही अर्थ शब्दकोशात आहेत.

आकाश राजाची कथा

महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे वधूला ‘सौभाग्यकांक्षिणी’ म्हटले जाते, त्याचप्रमाणे उत्तर भारतामध्ये वधूला ‘आयुष्यमती’, असे म्हटले जाते. वधूच्या नावापुढे ‘आयुष्यमती’ का लावले जाते याचे कारण खालील कथेत आहे.

प्राचीन काळात आकाश नावाचा एक राजा होता, जो निपुत्रिक होता. नारद ऋषींच्या सांगण्यावरून त्याने भूमीवर यज्ञ केला आणि सोन्याच्या नांगराने जमिनीची मशागत केली. त्यामुळे त्याला पृथ्वी मातेकडून कन्या प्राप्त झाली. राजा जेव्हा त्या मुलीला आपल्या महालात घेऊन येत होता तेव्हा वाटेत एक भयंकर सिंह त्या मुलीला खाण्यासाठी पुढे आला. सिंहाला पाहताच घाबरून राजाच्या हातातून ती खाली पडली. सिंहाने तिला तोंडात पकडले. यावेळी त्या सिंहाचे कमळाच्या फुलात रूपांतर झाले, त्याक्षणी भगवान विष्णू तेथे प्रकट झाले आणि त्यांनी कमळाला स्पर्श केला, विष्णूंचा स्पर्श होताच कमळाचे पुष्प यमराजाच्या रूपात अवतरले आणि लहान मुलगी २५ वर्षांच्या तरूणीत बदलली. त्याक्षणी राजाने आपल्या मुलीचे लग्न भगवान विष्णूशी लावून दिले. यमराजांनी मुलीला ‘आयुषमती’ होण्याचे वरदान दिले. वधूच्या नावापुढे ‘आयुषमती’ लिहिण्याची परंपरा तेव्हापासून सुरू झाली, असे मानले जाते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mythology history behind wedding invitation card chiranjeev and saubhagyakankshini sap