|| अभिजीत ताम्हणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बातमी कोणत्याही क्षेत्रातील असो. तिच्यामागचे महत्त्वाचे मुद्दे, एखाद्या घडामोडीचे इंगित नेमके समजावे यासाठीच्या या सदरातील आजचा विषय तसा दूरचा; पण गंभीर…

कझाकस्तान हा एरवी कुणाच्या खिजगणतीतही नसलेला देश ५ जानेवारीपासून अचानक एएफपी, एपी, रॉयटर्सआदी वृत्तसंस्था आणि अल जझीरा, बीबीसी, सीएनएन यांचे लक्ष वेधू लागला. तेथील हिंसक निदर्शने आणि ‘नागरिक विरुद्ध सरकार यांचे युद्ध’ असे त्याचे दिसत गेलेले स्वरूप, याकडे जगाने पुरेशा गांभीर्याने पाहिले. त्या सर्व बातम्यांचा अद्ययावत् आढावा घेऊनही भारतीय मनाला जे प्रश्न पडतात, त्यांच्या उत्तरांचा हा शोध…

कझाकस्तानात एवढी हिंसक निदर्शने भडकलीच कशी?

कझाकस्तानात इंधनकिमती – विशेषत: द्रवीभूत नैसर्गिक वायूच्या (एलपीजी) भडकल्या, हे कारण जगभरच्या वृत्तसंस्थांनी दिले असले तरी गरिबी हे खरे कारण मानता येईल (तेथील ‘टेंगे’ हे चलन रुपयाच्या तुलनेत, १७ पैसे किमतीचे आहे. ५० टेंगे म्हणजे आपले ८.५३ रुपये. पण एलपीजी ५० वा ६० टेंगे प्रतिलिटर हा दरही तेथे परवडत नाही) कझाकस्तानात ८० टक्के मोटारी ‘एलपीजी किट’वर चालवल्या जातात  आणि या इंधनवायूवरील अनुदान सरकारने पूर्णत: बंद केले, म्हणून नववर्षापासून किमती दुप्पट झाल्या आणि २ जानेवारीच्या रात्री पहिली दंगलसदृश निदर्शने झनावझेन या छोट्या शहरात झाली. कझाकस्तानची राजधानी नूरसुल्तान व महत्त्वाचे शहर अलमाटी यांच्यापासून हे झनावझेन  शहर (अनुक्रमे) दोन-तीन हजार कि.मी.वर आहे. तेथे पेट्रोल पंपांवरील ग्राहकही निदर्शनांत उतरले होते, पण पुढल्या तीन दिवसांत ही निदर्शने पसरली. अलमाटी शहरातील निदर्शक पालिका मुख्यालयात घुसले, या इमारतीला आगही लावण्यात आली. तर नूरसुल्तान येथेही प्रचंड जमाव रस्त्यावर उतरला आणि सरकारी इमारतींचा ताबा घेण्याचा प्रयत्न येथील निदर्शकांनीही केला. राजधानीत असे घडत असल्याने कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव यांनी पूर्ण शक्ती पणाला लावली.

कझाक सरकारने कोणते उपाय केले?

राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी पंतप्रधान अस्कर मामीन यांचे सरकार बरखास्त करून उपपंतप्रधान अलीहान स्माइयलोव्ह यांना प्रभारी म्हणून नेमतानाच, ‘आणीबाणीच्या सर्व तरतुदी यापुढे लागू’ अशी घोषणा करून लष्करासह सर्व सुरक्षा यंत्रणांना ही निदर्शने चिरडण्यासाठी मुक्तद्वार देण्याचा मार्ग खुला केला. मात्र सहा जानेवारी उजाडेस्तोवर सुरक्षादलांचे १८ जण जमावाच्या हिंसाचारात बळी गेलेले होते.  ‘समाजकंटक’, ‘सशस्त्र गुन्हेगार’ तसेच ‘परकीय प्रशिक्षण घेतलेले अतिरेकी’ असाच निदर्शकांचा उल्लेख करणे कझाक सरकारी यंत्रणांनी चालवले असून असे किमान २६ ‘सशस्त्र गुन्हेगार’ आतापर्यंत ‘गारद’ केल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी अधिकृतपणे दिली आहे.

याखेरीज, किमान तीन हजार निदर्शकांना सुरक्षादलांनी अटकेत ठेवले असून हा शुक्रवार सकाळपर्यंतचा आकडा शनिवारपर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे. कारण, महत्त्वाच्या दोन शहरांच्या आसपासच तब्बल ७० नवे तपासणी-नाके सुरक्षादलांनी आतापर्यंत उभारलेले असून प्रत्येकाची कसून तपासणी, संशयितांची धरपकड असे उपाय सुरू आहेत.

रशियाची युद्धविमाने बोलावण्यापर्यंत वेळ आली?

होय. रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन यांनी ‘कझाक राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीला मान देऊन’ रशियन हवाईदलाची विमाने कझाकस्तानात- त्यातही, भूतपूर्व सोव्हिएत रशियासाठी महत्त्वाचे असलेल्या अलमाटी (तेव्हाचे नाव अल्मा अ‍ॅटा) शहरातील तळावर उतरवण्याचा सपाटा सहा जानेवारीच्या रात्रीपासून लावला आहे. मात्र त्याच वेळी कझाक राष्ट्राध्यक्ष तोकायेव हे, ‘परिस्थिती आता झपाट्याने नियंत्रण येत आहे’ असा दावा करीत होते. थोडक्यात, एक शक्यता अशी की ती रशियन युद्धविमाने वापरण्याची वेळ येणार नाही.

रशियाला कझाकस्तानावरही वरचष्मा हवा की काय? तो का?

युक्रेन, बेलारूस यांच्यावर रशियाचा डोळा असल्याचे सर्वज्ञात आहे, बेलारूसचे तर राष्ट्ऱाध्यक्षच रशियाच्या मर्जीतील आहेत. सन १९८९ मध्ये कझाकस्तान स्वतंत्र झाले, तेव्हापासून २०१९ पर्यंत नूरसुल्तान नज़्रबयेव हेच राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी ७८ व्या वर्षी पद सोडले, ते २०१८ पासून कुठे ना कुठे निदर्शने होऊ लागली होती म्हणूनच. त्यानंतर पदावर आलेले विद्यमान राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांच्यावर उघडपणे रशियाधार्जिणेपणाचा आरोप अद्याप तरी झालेला नाही. मात्र, नज़रबयेव यांच्याच कारकीर्दीत, २० वर्षांपूर्वीच, रशियाच्या सैन्याने कझाकस्तानचे संरक्षण करण्याचा करार झालेला आहे. त्या करारानंतर कधीही खुद्द कझाकस्तानच्या नागरिकांविरुद्धच या कथित ‘संयुक्त सैन्या’चा वापर होण्याची वेळ आली नव्हती, ती आता आली.

कझाकस्तानवर असा सैलसर राजकीय दबाव रशियाला हवाच असण्याचे कारण अर्थातच, युरेनियमचे साठे! ते कझाकस्तानात भरपूर आहेत. इतके की, कझाक निदर्शनांचे वृत्त येताच जगभर युरेनियमचे दर आणखी वाढले. या युरेनियम उत्खननावर पूर्वापार वरचष्मा रशियाचाच आहे.

इंधन दरवाढ, गरिबी… म्हणून इतक्या थराला?

आर्थिक प्रश्नांमुळे नागरिक हिंसक होऊ शकतात, हे आफ्रिकी देशांतही यापूर्वी दिसलेले आहे. पण कझाकस्तानचे अपयश हे आर्थिक तसेच राजकीयही म्हणावे लागेल, कारण इंधनदरांवरील अनुदाने पूर्णत: बंद करण्यासारखा मोठा निर्णय घेतेवेळी जनतेला विश्वासात न घेतल्यामुळेच देशाच्या पूर्व टोकापासून पश्चिम टोकापर्यंत निदर्शने पसरली. लोकांकडे संशयाने पाहणारे सरकार लोकांविरुद्ध जसा अतिरेकी बलप्रयोग किंवा अतिरेकी आरोप करते, तसेच तोकायेव राजवटीने केले. इंटरनेटबंदी वगैरे उपायही परवापासूनच कझाकस्तानभर लागू झालेले आहेत.

abhijit.tamhane@expressindia.com 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Analysis news in any field indication of events bbc cnn akp