युक्रेनला रशियावर स्टॉर्म शॅडो क्रूझ क्षेपणास्त्रे सोडण्याची परवानगी नाही. अमेरिका आणि ब्रिटनच्या परवानगीची युक्रेन वाट पाहत आहे. युक्रेनने रशियामध्ये हल्ले केले तर त्यामुळे संघर्ष वाढेल, अशी भीती असल्याने आतापर्यंत युक्रेनला सीमेपलीकडचे हल्ले पाश्चिमात्य शस्त्रे वापरून करण्यावर बंदी आहे. युक्रेन दोन्ही देशांकडून हे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी मिळण्याची वाट पाहत आहे. पण, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ क्षेपणास्त्र किती घातक आहे? हे क्षेपणास्त्र युक्रेनसाठी गेम चेंजर ठरू शकते का? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ क्षेपणास्त्र?

स्टॉर्म शॅडो क्रूझ लांब अंतरावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ‘अल जझीरा’नुसार, हे ‘एमबीडीए’ क्षेपणास्त्र प्रणालीद्वारे विकसित करण्यात आले आहे. २००१ मध्ये युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि इटलीमधील सर्वात मोठ्या क्षेपणास्त्र कंपन्यांमधील संयुक्त उपक्रम म्हणून ‘एमबीडीए’ची सुरुवात करण्यात आली होती. या क्षेपणास्त्राचे वजन १,३०० किलोग्राम आहे आणि हे क्षेपणास्त्र पारंपरिक स्फोटकांनी सज्ज आहे. हे क्षेपणास्त्र सहसा युनायटेड किंगडमच्या युरोफायटर टायफून किंवा फ्रान्सच्या राफेलमधून डागले जाते. फ्रान्समध्ये ते ‘स्केल्प’ क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते. त्याची रेंज २५० किलोमीटर आहे. हे युक्रेनच्या हातात असणारे आतापर्यंतचे सर्वात लांब पल्ल्याचे शस्त्र आहे आणि इतर कोणत्याही क्षेपणास्त्रापेक्षा तिप्पट ताकदीचे आहे. ‘द इंडिपेंडंट’नुसार, क्षेपणास्त्र टर्बो-जेट इंजिनने चालवले जाते.

स्टॉर्म शॅडो क्रूझ लांब अंतरावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : भारत-बांगलादेश संबंध बिघडणार? बांगलादेशने दुर्गा पूजेआधी थांबवली हिलसा माशांची भारतातील निर्यात; कारण काय?

बीबीसीनुसार, प्रत्येक क्षेपणास्त्राची किंमत सुमारे एक दशलक्ष डॉलर्स आहे. एकदा हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर अतिशय वेगाने जाते. हे क्षेपणास्त्र जमिनीच्या अगदी जवळून जाऊ शकते, त्यासाठी ते इनर्शिअल नेव्हिगेशन आणि जीपीएसचा वापर करते. या क्षेपणास्त्राचा वेग इतका असतो की ते डोळ्यांनी सहज दिसू शकत नाही. एमबीडीएने सांगितले की, क्षेपणास्त्र लक्ष्याकडे जाण्यासाठी एका संग्रहित छायाचित्रासह इन्फ्रारेड कॅमेराचा वापर करते. ‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार, क्षेपणास्त्र जेव्हा लक्ष्याच्या अगदी जवळ जाते, तेव्हा ते स्वतःला उंचावर नेते आणि लक्ष्याला छेदते. स्टॉर्म शॅडो क्रूझ बंकर आणि दारूगोळाचे साठे नष्ट करण्यासाठी योग्य असल्याचे मानले जाते. रशियाने युक्रेन विरुद्धच्या युद्धात असेच बंकर बांधले आहेत.

‘अल जझिरा’ने दिलेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र यापूर्वीच इराक, लिबिया आणि सीरियामध्ये तैनात करण्यात आले आहे. ते पहिल्यांदा मे महिन्यात युक्रेनला देण्यात आले होते. परंतु, पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला त्याचा वापर फक्त त्याच्या प्रदेशात आणि रशियन लोकांनी व्यापलेल्या जमिनीपर्यंत मर्यादित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याचे कारण असे की, रशियन हद्दीत हवाई हल्ल्यामुळे पश्चिम देशांचा रशियाशी थेट संघर्ष होऊ शकतो. ब्रिटीश सरकारने म्हटले आहे की, जोपर्यंत आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन केले जात आहे तोपर्यंत युनायटेड किंगडमने पुरवलेली क्षेपणास्त्रे कशी वापरायची हे युक्रेनवर अवलंबून आहे. युक्रेनचा सर्वात मोठा लष्करी मदतगार असलेल्या अमेरिकेने अलीकडेच आपली भूमिका बदलली आहे. पेंटागॉनने असे म्हटले आहे की, युक्रेन स्व-संरक्षणासाठी रशियाच्या आतील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने प्रदान केलेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करू शकेल. रशियाने केलेल्या आक्रमणाच्या सुरुवातीपासून, अमेरिकेने युक्रेनला रशियाच्या आत लक्ष्यांवर शस्त्रे वापरण्याची परवानगी न देण्याचे धोरण कायम ठेवले होते.

हे मिसाईल गेम चेंजर असू शकते का?

‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ क्षेपणास्त्र गेम चेंजर ठरेल की नाही हे सांगता येणे शक्य नाही. परंतु, यामुळे रशियन लोकांचे जीवन अधिक कठीण होऊ शकते. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, सेवस्तोपोल येथील रशियाच्या ब्लॅक सी नौदलाच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्राचा वापर केला गेला आहे. एस्टोनिया आधारित इंटरनॅशनल सेंटर फॉर डिफेन्स अँड सिक्युरिटीचे संशोधक इव्हान क्लिस्झ्झ यांनी ‘अल जझीरा’ला सांगितले की, हे क्षेपणास्त्र रशियन लॉजिस्टिक, कमांड आणि कंट्रोलमध्ये व्यत्यय आणण्यासाठी युक्रेनकरिता फारसे प्रभावी नाही. मात्र, युक्रेनच्या सध्याच्या ऑपरेशन्सच्या दृष्टिकोनातून या क्षेपणास्त्राची त्यांना मदत होऊ शकते. अर्थात, युक्रेनियन सैन्याचे रक्षण करण्यासाठी आणि शक्य तितकी स्वतःची जीवितहानी कमी करण्यासाठी.

हेही वाचा : जिथून करोना पसरला त्याच वुहान प्रयोगशाळेत तयार झाली लसीची मात्रा, काय आहे याचं महत्त्व?

युक्रेन वारंवार रशियन भूमीवर शस्त्रे वापरण्यास परवानगी देण्याची मागणी करत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी जुलैमध्ये सांगितले की, रशियन शस्त्रे केंद्रित असलेल्या ठिकाणांना नष्ट करण्याची लांब पल्ल्याची क्षमता युक्रेनकडील शस्त्रांमध्ये आहे. झेलेन्स्की यांनी बीबीसीला सांगितले की, “आम्हाला ते वापरण्यासाठी लांब पल्ल्याच्या शस्त्रांबद्दल निर्णय घेण्याची गरज आहे. आम्हाला त्याची खूप गरज आहे. ते आमच्या रुग्णालयांना, शाळांना लक्ष्य करत आहेत, आम्हाला त्यांना उत्तर द्यायचे आहे,” असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Storm shadow cruise missile that ukraine is banned from using inside russia rac