जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करायला हवी हे सुरूवातीपासूच लक्ष्य होते, असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले. बीसीसीआयतर्फे देण्यात येणाऱया वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठीच्या प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्काराने कोहलीला गौरविण्यात आले. पुरस्कार स्विकारल्यानंतर कोहली म्हणाला की, मला नक्कीच जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याची इच्छा सुरूवातीपासूनच होती. त्यामुळे लक्ष्य गाठण्यासाठी आपल्याला तिन्ही प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार हे मनात कुठेतरी निश्चित केले होते. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल करणे आणि देशाला अग्रस्थानी नेणे हेच लक्ष्य नेहमी डोळ्यासमोर असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

कोहलीने यावेळी आपल्या टीकारांनाही लक्ष्य केले. माझ्यावर टीका करणारे आहेतच पण त्यांच्यापेक्षा मी नेहमी माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवतो, असे कोहलीने सांगितले. माझ्या आतापर्यंतच्या करिअरवर टीका करणारे माझ्यावर शंका उपस्थित करणारे देखील अनेक आहेत. पण मी नेहमी स्वत:वर विश्वास ठेवतो. मी नेहमी जर माझ्यातील १२० टक्के मेहनत क्रिकेटसाठी घेत असेन तर मी इतर कोणाला उत्तर देणे महत्त्वाचे समजत नाही, असेही कोहली म्हणाला.

संघातील खेळाडूंकडून मिळणाऱया पाठिंब्याचेही कोहलीने यावेळी तोंडभरून कौतुक केले. गेल्या वर्षभरातील काळ माझ्यासाठी उल्लेखनीय राहिला. एक क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला दरवर्षी काहीतरी नवी संधी मिळण्याची इच्छा असते. दररोजची मेहनत, सराव शिबीर आणि त्यागाचे फळ मिळाले. पण संघातील प्रत्येक खेळाडूचा योगदानाशिवाय हे शक्य झाले नसते, असे कोहली म्हणाला.

 

यंदाच्या हंगामात कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा तिन्ही प्रकारांत सर्वाधिक धावांचा मानही कोहलीच्या नावावर आहे. त्याने तिसऱ्यांदा या पुरस्कारावर नाव कोरले. अष्टपैलू खेळाच्या बळावर भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या रविचंद्रन अश्विनला दिलीप सरदेसाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार दुसऱ्यांदा पटकावणारा अश्विन पहिला खेळाडू ठरला. स्थानिक क्रिकेटमध्ये जेतेपदांवर वर्चस्व राखणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनलाही गौरवण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Always wanted to be one of the top players in the world says virat kohli