अ‍ॅथलेटिक्स 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बर्मिगहॅम : राष्ट्रकुल स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकार रविवार भारतासाठी पदके मिळवून देणारा ठरला. एल्डहोस पॉल आणि अब्दुल्ला अबुबाकेर यांनी तिहेरी उडी प्रकारात इतिहास घडवत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक कमावले. त्याचप्रमाणे भालाफेकीत अन्नू राणीला कांस्यपदक मिळवण्यात यश आले. संदीप कुमार १० हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

तिहेरी उडीत पॉलने तिसऱ्या प्रयत्नात सरस कामगिरी करताना १७.०३ मीटरचे अंतर गाठले. त्याच्यापाठोपाठ सहकारी अबुबाकेरने पाचव्या प्रयत्नात १७.०२ मीटर उडी मारली. बर्मुडाचा जाह नहाल पेरिनशिफ (१६.९२ मीटर) कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

अन्नूने चौथ्या प्रयत्नात ६० मीटर भालाफेक करत आपले कांस्यपदक निश्चित केले. भालाफेक प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळविणारी अन्नू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. संदीप कुमारने १० हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदकाची कमाई केली. त्याने ३८ मिनिट ४९.१२ सेकंद अशी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना पदकाची कमाई केली. ४ बाय १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारतीय महिला संघाला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

भाविनाला सुवर्ण, सोनलबेनला कांस्य

पॅरा-टेबल टेनिस : भारताची तारांकित पॅरा-टेबल टेनिस खेळाडू भाविना पटेलने राष्ट्रकुलमधील महिलांच्या एकेरीतील ३-५ श्रेणीत सुवर्णपदक पटकावले, तर सोनलबेन पटेलने याच विभागात कांस्यपदक जिंकले. गुजरातच्या ३५ वर्षीय भाविनाने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवले होते. राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिने नायजेरियाच्या इफेचुकवुडे ख्रिस्तिआना इकपेओयीला १२-१०, ११-२, ११-९ असे नमवत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.

अन्य भारतीय पॅरा-टेबल टेनिसपटू सोनलबेनने इंग्लंडच्या सु बेलीला ११-५, ११-२, ११-३ असे पराभूत केले.

कुस्ती : दीपक, पूजाला कांस्यपदक

पूजा सिहाग (७६ किलो) आणि दीपक नेहरा (९७ किलो) या कुस्तीपटूंनी कांस्यपदके पटकावली. पूजाने ऑस्ट्रेलियाच्या नाओमी डी ब्रूनवर विजय साकारते कांस्यपदक निश्चित केले. तर, दीपकने पाकिस्तानच्या तयब रझावर कांस्यपदकाच्या लढतीत १०-२ अशा फरकाने विजय मिळवला. यंदा भारतीय कुस्तीपटूंनी १२ पैकी १२ वजनी गटांमध्ये पदके जिंकली. भारताची कुस्तीतील ही सर्वोत्तम कामगिरी असून भारताने सहा सुवर्ण, एक रौप्य व पाच कांस्यपदके मिळाली.

टेबल टेनिस : कमल-साथियन जोडीला रौप्य

राष्ट्रकुलमधील टेबल टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या अंचता शरथ कमल आणि जी. साथियन जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. २०१८च्या स्पर्धेतील विजेत्या इंग्लंडच्या पॉल िड्रकहॉल-लिआम पिचफोर्ड जोडीने कमल-साथियनचा ८-११, ११-८, ११-३, ७-११, ११-४ असा पाच गेममध्ये पराभव केला. त्यापूर्वी महिला एकेरीत भारताच्या श्रीजा अकुलाला कांस्यपदकाने हुलकावणी दिली. ऑस्ट्रेलियाच्या यांगझी लियूने श्रीजाला ३-११, ११-६, ११-२, ७-११, १५-१३, ९-११, ११-७ असे नमवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commonwealth games indian athletes performance in cwg
First published on: 08-08-2022 at 04:17 IST