रोजसची ऐतिहासिक कामगिरी; हातोडाफेकीत वोल्दारझिकची हॅट्ट्रिक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक  हे नशिबाच्या जोरावर मिळालेले पदक नव्हते, याचा प्रत्यय घडवत केनियाच्या फेथ किपयेगोनने जागतिक मैदानी स्पर्धेतही १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. व्हेनेझुएलाच्या युलिमार रोजसने तिहेरी उडीत सुवर्णपदक जिंकताना ऐतिहासिक कामगिरी केली.

किपयेगोनने उत्कंठापूर्ण झालेली शर्यत चार मिनिटे २.५९ सेकंदात पूर्ण केली. अमेरिकेच्या जेनिफर सिम्पसनने हे अंतर ४ मिनिटे २.७६ सेकंदात पूर्ण करीत रुपेरी कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेची कास्टर सेमेन्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. हे अंतर पार करण्यास तिला ४ मिनिटे २.९० सेकंद वेळ लागला. शर्यतीमधील शेवटची फेरी बाकी असताना डच खेळाडू सिफान हसन, इंग्लंडची लॉरा मुईर, इथिओपियाची गेंझेबे दिबाबा यांच्या समवेत किपयेगोन आघाडीवर होती. शेवटचे २० मीटर अंतर बाकी असताना किपयेगोनने वेग वाढवत  आघाडी घेत अंतिम रेषा पार केली. सिम्प्सनने मुसंडी मारत रौप्यपदक खेचून आणले. सेमेन्यानेही वेग वाढवत तिसऱ्या क्रमांकाने ही शर्यत पूर्ण केली. मुईरला रिओ ऑलिम्पिकमध्येही पदकाने हुलकावणी दिली होती.

विविध उडय़ांबाबत प्रत्येक मीटर महत्त्वाचा असतो याचाच प्रत्यय तिहेरी उडीत पाहायला मिळाला. २१ वर्षीय रोजसने कोलंबियाच्या ऑलिम्पिक विजेत्या व गत विश्वविजेत्या कॅटरीन इबारग्वेनवर सनसनाटी मात केली. तिने व्हेनेझुएलास जागतिक स्पर्धेतील पहिले सोनेरी यश मिळवून दिले. इबारग्वेन व रोजस यांच्यात येथे सुवर्णपदकासाठी विलक्षण चुरस दिसून आली. इबारग्वेनने तिसऱ्या प्रयत्नात १४.८९ मीटपर्यंत उडी मारली. रोजसने १४.९१ मीटपर्यंत उडी मारून तिला हरविले. इबारग्वेनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कझाकिस्तानच्या ओल्गा रिपाकोवाला कांस्यपदक मिळाले. रोजसला रिओ ऑलिम्पिकमध्ये इबारग्वेनकडून पराभूत व्हावे लागले होते. त्या वेळी तिला रौप्यपदक मिळाले होते.

मॅक्लीऑडकडून जमैकाला पहिले सुवर्ण

जमैकाच्या ओमर मॅक्लीऑडने आपल्या देशाला यंदाचे पहिले सोनेरी यश मिळवून दिले. त्याने ११० मीटर अडथळा शर्यत १३.०४ सेकंदात जिंकून हे सुवर्णपदक पटकावले. तो अमेरिकन प्रशिक्षक एडरिक फ्लोरिअल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत विश्वविक्रम करणारी केंड्रा हॅरिसनलादेखील एडरिक यांचेच मार्गदर्शन मिळाले आहे. ओमरने हे सुवर्णपदक उसेन बोल्टला अर्पण केले. गतविजेत्या सर्जी शुबेन्कोवने ही शर्यत १३.१४ सेकंदात पार करीत रौप्यपदक मिळविले, तर हंगेरीच्या बलाझ बेजीला (१३.३१ सेकंद) कांस्यपदक मिळाले.

चारशे मीटर धावण्यात निर्मलाकडून निराशा

भारतीय धावपटूंकडून ऑलिम्पिक व जागतिक स्तरावर चांगल्या यशाची अपेक्षा धरणे चुकीचे असते. येथील जागतिक स्पर्धेतही हेच पाहावयास मिळाले. २२ वर्षीय खेळाडू निर्मला शेरॉनला ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीमधील उपांत्य फेरीत २४ खेळाडूंमध्ये २२वे स्थान मिळाले. तिने हे अंतर ५३.०७ सेकंदात पार केले.

निर्मलाची या शर्यतीमधील ५१.२८ अशी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. मात्र तिला येथे या कामगिरीइतकी वेळ नोंदविता आली नाही. निर्मलाने येथील प्राथमिक फेरीत ५२.०१ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. त्यापेक्षा कमी वेळेत ती उपांत्य फेरीची शर्यत पूर्ण करील अशी अपेक्षा होती. पण अपेक्षेइतका वेग तिला ठेवता आला नाही.

भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने विजेतेपद मिळविले होते, पण या स्पर्धेत तिच्याकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. आशियाई स्पर्धेत तिने ५२.०१ सेकंद अशी वेळ नोंदवली होती.

निर्मला म्हणाली, ‘येथे आशियाई स्पर्धेपेक्षा चांगली कामगिरी करण्याचे माझे ध्येय होते, मात्र मला वेगाने धावता आले नाही. येथे मला आहाराबाबत समस्यांना तोंड द्यावे लागले आहे, तसेच मला वैयक्तिक प्रशिक्षकही नाही. या गोष्टींखेरीज सर्वोत्तम यश मिळवता येत नाही.’

वोल्दारझिकची चमकदार कामगिरी

पोलंडच्या अ‍ॅनिता वोल्दारझिकने हातोडाफेकीत तिसरे जागतिक सुवर्णपदक मिळवताना नेत्रदीपक कामगिरी केली. वाढदिवसापूर्वी तिने स्वत:साठी मिळविलेली ही अनोखी भेटच ठरली. तिने ७७.९० मीटपर्यंत हातोडा फेकला, मात्र तिला स्वत:चा ८२.९८ मीटर हा विश्वविक्रम मोडता आला नाही. चीनच्या वाँग झेंग हिने ७५.९८ मीटपर्यंत अंतर पार करीत रौप्यपदक मिळविले. पोलंडच्या मल्विना कोप्रोनला (७४.७६ मीटर) कांस्यपदक मिळाले.

जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवणे सोपे नाही. अनेक मातब्बर व माजी विजेत्या खेळाडूंचे माझ्यासमोर आव्हान होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच सातत्यपूर्ण धाव घेण्याचे मी ठरवले होते. अन्य खेळाडूंनी शेवटच्या टप्प्यात वेग वाढवल्यानंतर मीदेखील वेग वाढवला. त्यामुळेच मला विजेतेपदाचे स्वप्न साकार करता आले. अनुभवी खेळाडूंचे कोणतेही दडपण न घेता संयमपूर्ण राहण्यावर मी भर दिला. ऑलिम्पिकपाठोपाठ जागतिक स्पर्धा जिंकल्यामुळे मला विशेष आनंद झाला आहे.

फेथ किपयेगोन

ऑलिम्पिक किंवा जागतिक स्तरावरील स्पर्धेत सोनेरी कामगिरी करण्याचे माझे स्वप्न होते. हे स्वप्न येथे साकार झाल्यामुळे मला खूप अभिमानास्पद वाटत आहे. हे माझे सुवर्णपदक नसून माझ्या देशाचेच हे सोनेरी यश आहे. हे पदक मला सतत प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या कुटुंबीयांचे आहे .

युलिमार रोजस

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Faith kipyegon wins world championship gold