पाचवा मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपास यांना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीतील प्रवेशासाठी झगडावे लागले. झ्वेरेव्हने पाच सेटमध्ये तर त्सित्सिपासने चार सेटमध्ये विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झ्वेरेव्हने सर्बियाच्या दुसान लाजोविचला ६-४, ६-२, ४-६, १-६, ६-२ असे पराभूत केले. जर्मनीच्या या युवा खेळाडूला स्पर्धेच्या प्रारंभीदेखील सिमोन मॅथ्यूने पाच सेटपर्यंत झुंजवले होते. तिसऱ्या फेरीच्या सामन्यातही झ्वेरेव्हने सामन्याच्या प्रारंभीच १-३ अशा पिछाडीनंतर पहिला सेट आणि त्यानंतर दुसरा सेट जिंकला.

तिसऱ्या सेटमध्ये मात्र दुसानने झुंज देत तिसरा सेट आपल्याकडे झुकवला. चौथ्या सेटमध्ये तर दुसानने एकतर्फी बाजी मारत सामन्याचे चित्रच पालटवले. मात्र, अखेरच्या सेटमध्ये झ्वेरेव्हने लय पुन्हा साधत बाजी मारली. मात्र, पुढील फेरीत नवव्या मानांकित इटलीच्या फॅबियो फॉगिनीशी लढत असल्याने झ्वेरेव्हला त्याच्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. फॉगिनीने स्पेनच्या रॉबटरे बाऊटिस्टा अग्यूटला ७-६, ६-४, ४-६, ६-१ असे नमवत चौथी फेरी गाठली आहे.  त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.

पहिलाच ग्रीक टेनिसपटू

रोलॅँ गॅरोसवर होणाऱ्या फ्रेंच टेनिस स्पर्धेत चौथ्या फेरीत प्रवेश करताना त्सित्सिपासने तब्बल ८३ वर्षांनंतर अशी कामगिरी करणारा पहिला ग्रीक खेळाडू होण्याचा मान मिळवला. अंधारामुळे शुक्रवारी अर्धवट झालेल्या सामन्यात दोन सेटमधील पिछाडीनंतर सर्बियाच्या फिलीप क्राजिनोविचने टायब्रेकरमध्ये तिसरा सेट जिंकून सामन्यात रंग भरले. चौथा सेटदेखील टायब्रेकपर्यंत गेल्यानंतर त्सित्सिपासने चौथ्या सेटसह सामना ७-५,६-३, ६-७, ७-६ असा जिंकून त्याची घोडदौड कायम राखली. त्यामुळे आता त्सित्सिपासला पुढील फेरीत स्टॅन वाविरका आणि ग्रिगोर दिमित्रोव यांच्या सामन्यातील विजेत्याशी झुंजावे लागणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: French open tennis tournament