पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सलमीचा फलंदाज गौतम गंभीरवर टिका केली आहे. गंभीरकडे व्यक्तीमत्व नाही. तो खूप अहंकारी आहे, अशी टिका आफ्रिदीने आपल्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रामध्ये केली आहे. मात्र त्याच्या या टीकेला गंभीरने सडेतोड उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आफ्रिदी, तू केलेली टीका ही खूपच हास्यास्पद आहे. असो! आम्ही (भारत) अजूनही पाकिस्तानी नागरीकांना वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा व्हिसा मंजूर करणे बंद केलेले नाही. (तू भारतात उपचारासाठी ये) मी स्वतः तुला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाईन’, असे ट्विट त्याने केले आहे.

गंभीरशी आफ्रिदीचा एका सामन्यादरम्यान वाद झाला होता. त्यानंतर या दोघांमध्ये कायमचे वितुष्ट आले. या प्रकाराबाबत आत्मचरित्रात अफिरडीने खुलासा केला आहे. आफ्रिदी आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हणतो, ‘काही जणांशी खाजगी शत्रूत्व असतं तर काही जणांशी कामासंदर्भात. मात्र गंभीरबद्दल वेगळचं होतं. गंभीर एकदमच विचित्र आहे. गंभीर आणि त्याचा अहंकार याबाबत मी काय बोलणार? गंभीरकडे व्यक्तीमत्व अजिबात नाही.उलट त्याच्या नावावर विक्रम कमी किंवा जवळपास नाहीतच, पण त्याच्यापाशी खूप अहंकार आहे!’

गंभीर एक खेळाडू म्हणून सतत नकारात्मक्ता घेऊन मैदानात वावरायचा. गंभीर हा डॉन ब्रॅडमन आणि जेम्स बॉण्ड या दोघांचे मिश्रण आहे. अशा लोकांना आम्ही कराचीमध्ये सरीयल (सनकी) म्हणतो. मला आनंदी आणि सकारात्मक लोक आवडतात. तुम्ही रागीट आणि स्पर्धात्मक वर्तणूक करत असाल, तरी हरकत नाही. मात्र तुम्ही सकारात्मक असावे. गंभीर तसा मुळीच नव्हता,’ असं आफ्रिदीने पुरस्तकामध्ये लिहिले आहे.

गंभीर आफ्रिदी वाद

२००७ साली गंभीर आणि आफ्रिदीमध्ये कानपूर येथील भारत पाकिस्तान एकदिवसीय सामन्यादरम्यान वाद झाला. खेळांच्या नियमांचा भंग करुन मैदानात वाद घातल्याबद्दल आयसीसीने दोघांनाही दंड ठोठावला. या घटनेबद्दल बोलताना ‘२००७ साली आशिया कप स्पर्धेतील एका समान्यादरम्यान धाव घेताना गंभीर थेट माझ्या अंगावर आला होता. त्यानंतर तो वाद झाला त्यानंतर पंचांना मध्यस्थी करावी लागली. यावेळी आम्ही एकमेकांसाठी अपशब्द वापरले होते,’ असं आफ्रिदी म्हणाला होता.

भारतीय संघासाठी मानसिक तज्ज्ञ म्हणून काम करणारे प्रशिक्षक पॅडी अॅप्टन यांनी लिहीलेल्या एका पुस्तकामध्ये गंभीरला सतत असुरक्षित वाटत असे असं म्हटलं आहे. ‘असे असले तरी या असुरक्षिततेचा परिणाम गंभीरच्या खेळावर झाला नाही आणि तो भारतासाठी क्रिकेट खेळणाऱ्या सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक ठरला,’ असेही पॅडी यांनी म्हटले आहे. ‘गंभीरने दीडशे धावा केल्यानंतर मला २०० धावा करता आल्या नाहीत म्हणून तो उदास असायचा. मी आणि तत्कालीन प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी त्याला किती समजून सांगितले तरी फरक पडायचा नाही,’ असंही पॅडी आपल्या पुस्तकात म्हणाले आहेत. पॅडी यांच्या या पुस्तकाबद्दल बोलताना गंभीरने ‘त्यांनी केलेली वक्तव्ये सकारात्मकच आहेत. पॅडी चांगली व्यक्ती असल्याने त्यांच्या मताचा मी सन्मान करतो. तसेच त्यांच्यामुळेच माझ्यामधील असुरक्षिततेची दखल घेतली गेली याचं समाधान आहे,’ असं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir lashes out on shahid afridi autobiography row and says i will personally take you to a psychiatrist