नागपूर : इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ३६ चेंडूंत ५९ धावांची झंझावाती खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरला या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ खेळाडूंत स्थानही मिळणार नव्हते. सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्याच्या अनुपलब्धतेमुळेच आपल्याला संधी मिळाल्याचे श्रेयसने सामन्यानंतर सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर येथे झालेल्या या सामन्यात २४९ धावांचा पाठलाग करताना भारताची २ बाद १९ अशी स्थिती झाली होती. यावेळी फलंदाजीला आलेल्या श्रेयसने इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत दोन षटकार आणि नऊ चौकारांची आतषबाजी केली. त्याच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला. भारताने हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. या सामन्यात सलामीवीर यशस्वी जैस्वालला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळाली. कोहलीला दुखापत झाल्याने जैस्वालला खेळवले जात असल्याचा जाणकार आणि चाहत्यांचा समज होता. मात्र, प्रत्यक्षात श्रेयसला संघाबाहेर ठेवले जाणार होते.

‘‘काल (सामन्याच्या आदल्या रात्री) मजेशीर किस्सा घडला. मी सिनेमा पाहत बसलो होतो. उद्या खेळायचे नसल्याने आपण आणखी थोडा वेळ जागे राहू शकतो असा मी विचार केला. मात्र, त्याच वेळी मला कर्णधार रोहित शर्माचा फोन आला. विराटच्या गुडघ्याला सूज आहे, त्यामुळे कदाचित तुला खेळण्याची संधी मिळू शकेल असे त्याने मला सांगितले. मी लगेच सिनेमा बंद केला आणि झोपायला गेलो. संघाच्या यशात मी योगदान देऊ शकलो याचे समाधान आहे,’’ असे श्रेयस म्हणाला.

‘‘मी या सामन्यात खेळणे अपेक्षित नव्हते. दुर्दैवाने विराटला दुखापत झाली आणि त्याला सामन्याला मुकावे लागले. त्याच्या अनुपलब्धतेमुळे मला खेळता आले. मात्र, मी यासाठी पूर्णपणे तयार होतो. आपल्याला कधीही संधी मिळू शकेल, आपण त्यासाठी सज्ज असले पाहिजे असाच मी विचार केला. गेल्या वर्षी आशिया चषकात असेच काही घडले होते. मी जायबंदी झाल्याने दुसऱ्या खेळाडूला संधी मिळाली आणि त्याने शतक झळकावले. यावेळी मी दुसऱ्या बाजूला होतो,’’ असे श्रेयसने सांगितले.

विराट दुसऱ्या सामन्यात खेळणे अपेक्षित

विराट कोहलीच्या गुडघ्याची दुखापत गंभीर नसून तो रविवारी कटक येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठी उपलब्ध असणे अपेक्षित आहे, असे भारतीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिलने सांगितले. ‘‘कोहलीची दुखापत गंभीर नाही. पहिल्या सामन्यासाठीच्या सरावादरम्यान त्याला फारसा त्रास जाणवला नाही. सामन्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर गुडघ्याला सूज असल्याचे त्याला जाणवले. त्यामुळे तो खेळू शकला नाही. मात्र, आम्ही निश्चिंत आहोत. तो दुसऱ्या सामन्यात खेळेल याची आम्हाला खात्री आहे,’’ असे गिल म्हणाला.

देशांतर्गत क्रिकेटला यशाचे श्रेय…

लय परत मिळविण्यासाठी आणि तंदुरुस्तीत सुधारण करण्यासाठी आपल्याला देशांतर्गत क्रिकेटची खूप मदत झाल्याचे श्रेयस म्हणाला. ‘‘मी देशांतर्गत क्रिकेटचा संपूर्ण हंगाम खेळलो. यातून मला खूप शिकायला मिळाले. चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत कसे रूपांतर करायचे, कशी मानसिकता राखायची हे मी शिकलो. तसेच माझ्या तंदुरुस्तीतही खूप सुधारणा झाली,’’ असे श्रेयसने नमूद केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I only played because virat kohli got injured shreyas iyer zws