चेन्नईच्या संघाने सलामीवीर शेन वॉटसनचं आक्रमक अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली मोलाची साथ याच्या बळावर हैदराबादवर ६ गडी राखून मात केली. वॉटसनने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेताना ९६ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने वॉटसनला यष्टीरक्षक बेअरस्टोकरवी झेलबाद केलं. अवघ्या ४ धावांनी वॉटसनचं शतक हुकलं. त्याच्या या खेळीचं सर्वत्र कौतुक झालं. पण त्याला विशेष स्तुती ऐकायला मिळाली ती ज्युनिअर वॉटसनची…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेन वॉटसनच्या मुलाने आपण आपल्या वडिलांचे चाहते आहोत, हे तर सांगितलेच. पण त्याबरोबरच तो धोनीचाही खूप मोठा फॅन आहे असे त्याने सांगितले. हैदराबादविरूद्धच्या सामन्यानंतर सिनिअर आणि ज्युनिअर वॉटसन यांचा मैदानावर झकासपैकी संवाद रंगला होता. या संवादामध्ये शेन वॉटसनने त्याला आवडता खेळाडू कोण? असे विचारले असता ज्यूनिअर वॉटसनने प्रथम शेन वॉटसनचे नाव घेतले. पण अजून कोणता खेळाडू आवडतो, या प्रश्नावर मात्र त्याने महेंद्रसिंग धोनीचे नाव घेतले. तसेच धोनी कायम षटकार मार्ट असतो आणि मला त्याची ही बाब आवडते, असेही तो म्हणाला.

दरम्यान, हैदराबादने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात अतिशय खराब झाली होती. फाफ डु प्लेसिस स्वस्तात धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर सुरेश रैना आणि शेन वॉटसन जोडीने चेन्नईचा डाव सावरला. राशिद खानने सुरेश रैनाचा अडसर दूर करत चेन्नईला दुसरा धक्का दिला. मात्र वॉटसनवर अंकुश लावणं हैदराबादच्या गोलंदाजांना जमलं नाही. वॉटसनने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. शतकासाठी अवघ्या ४ धावा असताना तो भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा केदार जाधव- अंबाती रायुडू जोडीने पूर्ण करत आणल्या होत्या. मात्र अखेरच्या षटकात विजयासाठी अवघी एक धाव हवी असताना अंबाती रायुडू माघारी परतला. मात्र चेन्नईने अखेरीस आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हैदराबादकडून राशिद खान, संदीप शर्मा आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी १-१ बळी घेतला. चेन्नईचा एक फलंदाज धावबाद झाला.

त्याआधी, मनिष पांडे आणि डेव्हिड वॉर्नरने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर सनराईजर्स हैदराबाद संघाने १७५ धावांपर्यंत मजल मारली. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या हैदराबादने चेन्नईच्या गोलंदाजांचा व्यवस्थित समाचार घेतला. हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरने ५७ तर मनिष पांडेने नाबाद ८३ धावा केल्या. चेन्नईकडून हरभजन सिंहने २ तर दिपक चहरने १ बळी घेतला. याव्यतिरीक्त एकाही चेन्नईच्या गोलंदाजाला यश मिळालं नाही.

हैदराबादचा जॉनी बेअरस्टो आजच्या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. हरभजन सिंहच्या गोलंदाजीवर धोनीने बेअरस्टोचा झेल घेतला. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेने दुसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेत, संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. डेव्हि़ड वॉर्नर माघारी परतल्यानंतर, विजय शंकरने मनिष पांडेला साथ दिली. अखेरच्या षटकात फटकेबाजी करताना शंकरही माघारी परतला. दिपक चहरने त्याचा बळी घेतला. अखेरीस, मनिष पांडेने युसूफ पठाणच्या मदतीने संघाला १७५ धावांचा टप्पा गाठून दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 csk vs srh video shane watson junior watson ms dhoni fan