RCB Victory Parade Bengaluru Stampede Updates: आरसीबीच्या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. या चेंगराचेंगरीमध्ये जवळपास १५ जण जखमी झाले आहेत. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी दिली आहे.जखमींची संख्या १५ झाली आहे आणि ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना बोरिंग हॉस्पिटल आणि वैदेही हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

१८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२५ चे जेतेपद पटकावले आहे. आरसीबीच्या विजयानंतर संपूर्ण जगभरातील चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना दिसला. यादरम्यान बंगळुरूमध्ये संघ या विजयाचा चाहत्यांबरोबर आनंद साजरा करण्यासाठी पोहोचला आहे. संघ प्रथम विधान सौधा येथे पोहोचला, जिथे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण संघाचा सत्कार करण्यात आला.

आरसीबी संघ एअरपोर्टला उतरल्यापासून ते विधान सौधाला टीम बस पोहोचेपर्यंत खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी रस्त्यांवर मोठी गर्दी केली होती. अनुष्का शर्मानेही व्हीडिओ शेअर करत बंगळुरूमधील चाहत्यांचं प्रेम दाखवलं होतं. पण या चाहत्यांच्या गर्दीने वेगळंच रूप घेत आता चिन्नास्वामी स्टेडियमजवळ एक धक्कादायक स्थिती निर्माण झाली आहे.

चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीतील अनेक अंगावर काटा आणणारे व्हीडिओ समोर येत आहेत. यादरम्यान आरसीबीचा संघ चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पोहोचला आहे. दरम्यान कार्यक्रमालाही सुरूवात झाली आहे. रजत पाटीदारने स्टेडियममध्ये येताच ट्रॉफी उंचावली. त्यानंतर मैदानावरील पोडियमवर सर्व खेळाडू पोहोचले आणि यानंतर विराट कोहलीने चाहत्यांशी बोलताना ई साला कप नामदे नाही, ई साला कप नामदू असं म्हटलं. त्यानंतर विराटने घोषणा करताच रजत पाटीदार आयपीएल ट्रॉफी घेऊन मैदानात पोहोचला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंगळुरूत चेंगराचेंगरी झालेल्यांमध्ये मृतांची संख्या १० वर पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात होती. आता मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, स्टेडियममधील लाईव्ह व्हिज्युअल्स थांबवले आहेत. शेवटचा व्हिडिओ पाटीदार ट्रॉफी एका स्टँडवर ठेवत होते तर कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत स्टँडमध्ये होता. यानंतर तेथील स्थिती समोर आलेले नाही.