भारताच्या अव्वल भालाफेकपटूच्या कोपरावर मुंबईत शस्त्रक्रिया

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या कोपरावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून दोहा येथे २७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील त्याच्या समावेशाविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

नीरजला पूर्णपणे बरा होण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्यामुळे प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धेला तो मुकण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर डायमंड लीग सीरिजसह तो या मोसमातील अनेक स्पर्धामध्ये खेळू शकणार नाही.

गेल्या वर्षी राष्ट्रकुल तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरजच्या कोपरावर मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात डॉ. दिनशॉ पर्डिवाला यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. ‘‘माझ्या कोपरावर मुंबईत शस्त्रक्रिया झाली असून आता पुन्हा पुनरागमन करण्यासाठी मला काही महिन्यांचा अवधी लागणार आहे. मात्र दमदार पुनरागमन करण्याचे माझे ध्येय आहे. माझ्याकडून आतापर्यंत कधीही न घडलेली कामगिरी यापुढे घडेल अशी आशा आहे,’’ असे नीरजने म्हटले आहे.

२१ वर्षीय नीरजने ८८.०६ मीटर अशा कामगिरीसह राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला असून एप्रिल महिन्यात पतियाळाच्या राष्ट्रीय क्रीडा संस्थेत (एनआयएस) सराव करत असताना नीरजच्या कोपराला वेदना होत होत्या. त्याआधी तो दोन महिने दक्षिण आफ्रिकेत सराव करत होता. डॉ. पर्डिवाला हे विख्यात ‘ऑर्थोपेडिक सर्जन’ म्हणून ओळखले जात असून त्यांनी सुशील कुमार, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, योगेश्वर दत्त, विनेश फोगट, अखिल कुमार, एच. एस. प्रणॉय यांसारख्या अनेक खेळाडूंवर शस्त्रक्रिया केल्या आहेत.

नीरजचे प्रशिक्षक बहादूर सिंग यांनीही पुढील वर्षीची ऑलिम्पिक स्पर्धा ध्यानात घेता, घाईघाईने पुनरागमन न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र भाला फेकण्याच्या त्याच्या शैलीमुळे नीरजच्या कोपराला दुखापत झाली, असे तज्ज्ञमंडळी, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचे विद्यमान प्रशिक्षक उवे हॉन यांनीही त्याला शैली बदलण्याचा सल्ला दिला आहे.

‘‘सात ते १० दिवसानंतर हातावरील प्लास्टर काढल्यावर नीरजचा पुनर्वसन कार्यक्रम सुरू होईल. त्यानंतर त्याला पूर्णपणे बरा होण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी लागेल, असे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे,’’ असे नीरजच्या नजीकच्या सूत्रांनी सांगितले.

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ (एएफआय) आणि जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स यांनी नीरजला परदेशात शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र नीरजने मुंबईत शस्त्रक्रिया करवून घेण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javelin thrower neeraj chopra elbow surgery in mumbai