नवी दिल्ली : भारताच्या बी. साईप्रणीत आणि पारुपल्ली कश्यप यांनी दिमाखदार विजयांसह इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
मार्च महिन्याच्या पूर्वार्धात स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या प्रणीतने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना पाचव्या मानांकित समीर वर्माला १८-२१, २१-१६, २१-१५ असे नामोहरम केले. २०१४च्या राष्ट्रकुल विजेत्या कश्यपने थायलंडच्या टॅनाँगसॅक साइनसोम्बूनसूकला २१-११, २१-१३ असे पराभूत केले.
उपांत्यपूर्व फेरीत प्रणीतची गाठ माजी विजेत्या किदम्बी श्रीकांत किंवा चीनच्या लू गुआंगझूशी पडणार आहे, तर कश्यपचा सामना शुभंकर डे किंवा झू वेईशी होईल.
रिया मुखर्जीचे संघर्षपूर्ण लढतीनंतर आव्हान संपुष्टात आले. डेन्मार्कच्या आठव्या मानांकित मिया ब्लिशफेल्डने रियाचा २१-८, १७-२१, २१-१३ असा पराभव केला. महिला दुहेरीत अपर्णा बालन आणि श्रुती केपी जोडीने हाँगकाँगच्या विंग युंग आणि येऊंग गा टिंग जोडीला २१-१९, ७-२१, २१-१७ असे पराभूत केले. पुरुष दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि शिवम शर्मा जोडीने अनिरुद्ध मयेकर आणि विनय कुमार जोडीला २१-१५, २१-११ असे हरवले.