भारतीय संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने आपल्या जुन्या सहकाऱ्यांसोबतचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. मुंबई रणजी संघाकडून खेळताना सचिनचे जुने सहकारी अमोल मुझुमदार, निलेश कुलकर्णी, अजित आगरकर, विनोद कांबळी हे एका खास कारणानिमीत्त भेटले होते. यावेळी फोटोसेशनदरम्यान सचिनने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या या मित्रांसोबतचा फोटो शेअर केला आहे. आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत या मित्रांनी मला खूप काही दिलं, यांच्यासोबत मैदानात एकदाही कंटाळवाणं वाटलं नाही, अशा आशयाचा संदेशही सचिनने दिला आहे.
A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on
याआधीही सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोन जिवाभावाचे मित्र मुंबईत, एका पुस्तक प्रकाशनावेळी भेटले होते. ज्युनिअर क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यात ६६४ धावांची विक्रमी भागीदारी झाली होती. एका टेलिव्हिजन शोमध्ये विनोद कांबळीने सचिनने आपल्या पडत्या काळात आपल्याला मदत केली नसल्याचं वक्तव्य केलं होतं. यानंतर सचिन आणि विनोद कांबळीमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र यानंतर कित्येक वर्षांनी या दोन मित्रांमधला दुरावा पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी संपला होता. त्यानंतर सचिनच्या या फोटोमुळे सगळं काही आलबेल असल्याचं कळतंय.