सिंधू आणि श्रीकांत दुसऱ्या फेरीत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्वालालम्पूर : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे पुनरागमन अपयशी ठरले. मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीच्या फेरीतच तिचे आव्हान संपुष्टात आले. परंतु पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी दुसरी फेरी गाठली.

जागतिक क्रमवारी २१व्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या पोर्नपावी चोचूवाँगने सायनाला २०-२२, २१-१५, २१-१० असे पराभूत केले. २१ वर्षीय चोचूवाँगविरुद्ध सायनाचे पारडे जड मानले जात होते. मात्र जागतिक कनिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत तीन वर्षांपूर्वी रौप्यपदक जिंकणाऱ्या चोचूवाँगने पहिल्या गेममधील संघर्षांनंतर सायनावर कुरघोडी केली.

गेल्या महिन्यात झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेनंतर आजारपणामुळे सायना स्विस आणि इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत खेळू न शकली नाही.

ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या सिंधूने जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानावर असलेल्या आया ओहोरीचा २२-२०, २१-१२ असा पराभव केला. सिंधूने सहाव्यांदा जपानच्या आयाला पराभूत केले. याचप्रमाणे इंडियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या श्रीकांतने इंडोनेशियाच्या मौलाना मुस्तफाला ३८ मिनिटांत २१-१८, २१-१६ असे नामोहरम केले.

पाचव्या मानांकित सिंधूचा पुढील फेरीत कोरियाच्या संग जि ह्यूनशी सामना होणार आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत संगनेच सिंधूला नमवले होते. श्रीकांतचा पुढील फेरीत थायलंडच्या खोशित फेटप्रदाबशी सामना होणार आहे.

गेल्या आठवडय़ात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या एच. एस. प्रणॉयचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. थायलंडच्या सिट्टहीकोम थामासिनने संघर्षपूर्ण लढतीत प्रणॉयला १२-२१, २१-१६, २१-१४ असे नामोहरम केले. समीर वर्माचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आल्यामुळे पुरुष एकेरीत फक्त श्रीकांत हा एकमेव भारतीय खेळाडू शिल्लक आहे.

पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी यांनाही सलामीचाच अडथळा ओलांडण्यात अपयश आले. सातव्या मानांकित हॅन चेंगकाय आणि झोऊ हाओडांग जोडीने त्यांचा २१-१६, २१-६ असा पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal bows out of malaysia open