भारताच्या सरिता देवी व एम.सी.मेरी कोम यांनी पोलंडमधील सिलेसियान बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्य फेरीत स्थान मिळवत किमान कांस्यपदकाची निश्चिती केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी जागतिक विजेती व आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सरिताने चेक प्रजासत्ताकच्या एलिना जेचीवर ५-० अशी मात केली. त्याआधी तिने पहिल्या फेरीत कझाकिस्तानच्या एझान खोजाबेकोवावर शानदार विजय मिळवला होता. ६० किलो गटात सरिताला उपांत्य लढतीत कझाकिस्तानच्या करिना इब्रागिमोवाशी झुंजावे लागणार आहे.

जागतिक स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद व ऑलिम्पिक कांस्यपदक मिळवणाऱ्या मेरी कोमला ४८ किलो गटात थेट उपांत्य फेरीत स्थान मिळाले आहे. तंदुरुस्तीच्या कारणास्तव मेरी कोमला जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते.

भारताच्या रितू अगरवालने ५१ किलो गटात उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. तिने रशियाच्या स्वेतलाना रोसजावर ४-१ अशी मात केली. भारताच्या लवलीना बोगरेहैनने ६९ किलो गटात उपांत्य फेरीत स्थान मिळवले. तिने चेक प्रजासत्ताकच्या मार्टिना श्मोरानजोवाचा पराभव केला.

भारताच्या सीमा पुनिया (८१ किलो), प्विलाओ बासुमतारी (६४ किलो) व शशी चोप्रा (५७ किलो) यांना पदकापासून वंचित राहावे लागले. त्यांना रेपिचेज फेरीत पराभव स्वीकारावा लागला. सीमाला कझाकिस्तानच्या लझात कुंगेबायेवाने ५-० असे सहज हरवले तर बासुमतारीला पोलंडच्या नतालिया बार्बुसिनोस्काने त्याच फरकाने पराभूत केले. शशीला इंग्लंडच्या अँजेलिया चॅपमनकडून पराभव स्वीकारावा लागला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarita devi mary kom