दुसऱ्या सामन्यात विंडीजवर ४४ धावांनी मात; मालिकेत विजयी आघाडी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईकर सूर्यकुमार यादवच्या (६४ धावा) अर्धशतकानंतर प्रसिध कृष्णाने (४/१२) केलेल्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर ४४ धावांनी मात केली. त्यामुळे भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात दुखापतग्रस्त किरॉन पोलार्डच्या अनुपस्थितीत विंडीजचे नेतृत्व करणाऱ्या निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. कर्णधार रोहित शर्माला (५) केमार रोचने लवकर माघारी पाठवले. भारताने ऋषभ पंतला सलामीला पाठवण्याचा डाव खेळला; पण तो अपयशी ठरला. ओडिन स्मिथने एकाच षटकात पंत (१८) आणि विराट कोहलीला (१८) बाद केल्यामुळे भारताची ३ बाद ४३ अशी स्थिती झाली.

यानंतर मात्र पुनरागमन करणारा केएल राहुल (४९) आणि सूर्यकुमार यांनी ९१ धावांची भागीदारी रचत भारताला सावरले. राहुलचे अर्धशतक केवळ एका धावेने हुकले, तर सूर्यकुमारने संयमाने फलंदाजी करताना ७० चेंडूंत एकदिवसीय कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. मग त्याने धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, डावखुरा फिरकीपटू फॅबियन अ‍ॅलनच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या नादात तो ६४ धावांवर बाद झाला. यानंतर दीपक हुडा (२९) आणि वॉिशग्टन सुंदर (२४) वगळता इतरांना फारसे योगदान देता न आल्याने भारताला ५० षटकांत ९ बाद २३७ धावांचीच मजल मारता आली.

प्रत्युत्तरात,विंडीजने सुरुवातीपासूनच ठरावीक अंतराने बळी गमावले. प्रसिधने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना ब्रँडन किंग (१८), डॅरेन ब्राव्हो (१) आणि कर्णधार पूरन (९) यांना झटपट माघारी धाडले. शाय होपला (२७) यजुर्वेद्र चहलने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शमार ब्रूक्स (४४), अकील हुसेन (३४) आणि स्मिथ (२४) यांनी काही काळ प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. अखेर प्रसिधने रोचला (०) बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विंडीजचा डाव ४६ षटकांत १९३ धावांत संपुष्टात आला.    

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ९ बाद २३७ (सूर्यकुमार यादव ६४, केएल राहुल ४९; ओडिन स्मिथ २/२९, अल्झारी जोसेफ २/३६) वि. वेस्ट इंडिज

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suryakumar yadav in odis west indies captain kieron pollard akp