चंद्रमौळी झोपडी सावरण्याइतपतही पैसा हाती येत नव्हता,  झोपडी प्रकाशमय करण्यासाठी महावितरणकडे मागणी तरी कशी करणार ? त्यामुळे अनेक वर्षांपासून अंधारातच राहण्याची सवय झालेल्या ढवळू ठमके यांची ही बिकट परिस्थिती प्रकाशझोतात येण्यास ‘सुवर्णकन्या’ आंतरराष्ट्रीय धावपटू अंजना ठमकेने मिळविलेले डोळे दिपवून टाकणारे यश कारणीभूत झाले आहे. चीनमधील युवा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून सर्व भारतीयांचे डोळे दिपविणाऱ्या अंजनाच्या घरातील अंधार अजूनही कायम आहे.
नाशिकपासून सुमारे ३० किलोमीटरवरील गणेशगावची सध्या क्रीडा जगतात चर्चा आहे. गणेशगावपासून अवघ्या एक किलोमीटरवर ठमके यांचे शेत आहे. या शेतातच त्यांचे घरवजा झोपडी आहे.
घरापासून काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या घरी वीज असल्यामुळे एकदा अंजनाच्या वडिलांनी सहजच त्या व्यक्तीकडे वीज आणण्यासाठी किती पैसे लागतील, अशी विचारणा केली. त्यावर किमान सहा हजार रूपये तरी, असे उत्तर मिळाल्यावर त्यांनी मग या विषयाचा नादच सोडला. कंदील, चिमणी किंवा दिवा यांच्या सहाय्याने अंधार दूर करण्याचा ते आपल्यापरीने प्रयत्न करीत राहिले. या वर्षी जानेवारीत उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य शालेय क्रीडा स्पर्धेत अंजनाने तीन सुवर्णपदकांची कमाई केल्यावर क्रीडा मंत्र्यांसह काही स्थानिक राजकीय मंडळींनी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजूनही त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळेच आता या चंद्रमौळी झोपडीत आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाचे तेज आले तरी विजेचा प्रकाश त्यांच्यापासून दूरच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suvarna kanya anjana thamke house still darkling