भारतीय संघाला पहिला टी २० विश्वचषक जिंकून मंगळवारी १२ वर्षे पूर्ण झाली. त्या स्पर्धेत युवराज सिंगने ६ चेंडूत ६ षटकार मारून दमदार खेळी केली होती. तसा पराक्रम भारताच्या कोणत्याही खेळाडूला जमला नाही. युवराज हा एकमेवाद्वितीय खेळाडू आहे. त्यामुळे त्याने खेळताना परिधान केलेली टीम इंडियाची १२ क्रमांकाची जर्सी निवृत्त करा, अशी मागणी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्रजी वृत्तपत्रातील स्तंभात गंभीरने लिहीले आहे की सप्टेंबर महिना माझ्यासाठी खास आहे. याच महिन्यात २००७ साली आम्ही टी २० विश्वचषक जिंकला. युवराज सिंगने उत्कृष्ट कामगिरी केली होती. २०११ सालच्या वर्ल्ड कप विजयाचा नायक युवराजच होता. त्यामुळे त्याची १२ क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्यात यावी. हाच त्याच्यासाठी योग्य सन्मान असेल. युवराज सिंगसाठी ‘बीसीसीआय’ने हा निर्णय घ्यावा.

सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो परिधान करत असलेली १० नंबरची जर्सी कोणी वापरत नाही. टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्वत:हून हा निर्णय घेतला होता. पण शार्दुल ठाकूरने १० क्रमांकाची जर्सी घातल्यानंतर त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर बीसीसीआयने यापुढे १० क्रमांकाची जर्सी कोणालाच देणार नाही, असे स्पष्ट केले होते. तसाच सन्मान युवराजलाही मिळावा, अशा आशयाचे विचार गंभीरने व्यक्त केले आहेत.

२००७ च्या टी २० विश्वचषकात युवराज सिंगने ५ डावात १४८ धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये युवराजने १२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. याच सामन्यात त्याने स्टुअर्ट ब्रॉडला ६ षटकार मारले होते. तर २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेत युवराज सिंगने दमदार कामगिरी केली होती. २८ वर्षानंतर भारताने पुन्हा जिंकलेल्या विश्वचषक स्पर्धेत युवराजने ९ डावात सर्वाधिक ३६२ धावा केल्या होत्या आणि १५ गडीही टिपले होते. या कामगिरीबद्दल त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuvraj singh jersey retire sachin tendulkar vjb