मुंबई स्थित शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेने कौशल्य निर्मितीच्या अनुषंगाने विविध तांत्रिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम संबंधित विषयात प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी उपयुक्त ठरतात. या अभ्यासक्रमामध्ये ‘फायर आणि इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा’ अभ्यासक्रमाचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. हा अभ्यासक्रम भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह बी.एस्सी पदवी प्राप्त उमेदवार अथवा दहावीनंतर आयआयटी केलेले उमेदवार करू शकतात. या अभ्यासक्रमात आगीपासून लोकांचे संरक्षण करण्याच्या विविध पद्धती, सुरक्षिततेचे उपाय, आगीच्या धोक्याचे विश्लेषण,आग नियंत्रित करण्याविषयीच्या मूलभूत संकल्पना, आग नियंत्रणाची विविध तंत्रे आणि कौशल्ये, औद्योगिक आस्थापनांच्या सुरक्षिततेच्या मूलभूत बाबी, सुरक्षिततेचे विविध उपाय व यंत्रणा, सुरक्षितेविषयक धोरणे आणि कार्यपद्धती, आणीबाणीच्या प्रसंगी करायच्या उपाययोजना, सुरक्षाविषयक पाहणी व सर्वेक्षण, सुरक्षा व्यवस्थापन कार्यपद्धती, अपघात नियंत्रण कार्यपद्धती, आरोग्यविषयक व्यावसायिक समस्या, सुरक्षिततेसंदर्भातील विविध कायदे, नियम आदी विषयांच्या ढोबळ मानाने समावेश केला जातो. याच विषयात एक वर्षांचा अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमासुद्धा या संस्थेत करता येतो. हा अभ्यासक्रम अनुभवप्राप्त बारावी विज्ञान शाखेतील उमेदवार, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिक शाखेतील बी.ई पदवीधारक आणि भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयासह विज्ञान पदवीधारकांना करता येईल. पत्ता- शासकीय तंत्रनिकेतन, ४९, खेरवाडी, अलियावर जंग मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संकेतस्थळ- http://www.gpmumbai.ac.in

मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about diploma courses of fire and industrial safety