सोमवार कधीच येऊ नये आणि शुक्रवार खूप लवकर यावा असे नोकरदार वर्गातील अनेकांनाच वाटत असते. कधी एकदा ५ दिवस जातात आणि साप्ताहिक सुटीचे दिवस येतात असे झालेले असते. कधी फिरायला जाण्यासाठी, कधी चित्रपट पाहण्यासाठी, कुटुंबाला वेग देण्यासाठी आणि आरामासाठी हे दोन दिवसही कमी पडत असल्याची तक्रार अनेक जण करतात. याचाच विचार करुन न्यूझीलंडमध्ये नुकताच एका कंपनीत ४ दिवसांचा आठवडा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग २ महिन्यांसाठी सुरु करण्यात आला होता. मात्र त्याचा मिळालेला सकारात्मक परिणाम पाहून हे कायम ठेवावे असा निर्णय होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक अभ्यासांतून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, आठवड्यातील कामाचे दिवस कमी केल्यास त्याचे अनेक फायदे होतात. न्यूझीलंडमध्ये ज्याठिकाणी हा प्रयोग करण्यात आला तेथील लोकांना ४ दिवस काम करुनही पाच दिवसांचा पगार देण्यात आला होता. या प्रयोगामुळे कर्मचाऱ्यांना येणाऱ्या ताणाचे प्रमाण ४५ ते ३८ टक्क्यांनी घटल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. तर काम आणि वैयक्तिक आयुष्य यांतील समतोल ५४ ते ७८ टक्क्यांनी सुधारला आहे.

यातील आश्चर्याची बाब म्हणजे अशाप्रकारे ४ दिवसांचा आठवडा करण्याचा कंपनीच्या उत्पादकतेवर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. तर अनेक विभागांमधील लोकांची उत्पादनक्षमता वाढली. त्यामुळे त्यांच्याकडून आधीपेक्षा जास्त चांगले काम केले जाऊ लागले. या प्रयोगामुळे लोकांमधील नेतृत्त्व, कामाप्रती असणारी बांधिलकी, वचनबद्धता, सक्षमता यामध्ये वाढ झाली. या सर्व सकारात्मक गोष्टींमुळे कंपनीच्या कार्यकारी मंडळाने हा निर्णय कायम करण्याचे जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे कमी वेळ ऑफीसमध्ये असल्याने कर्मचाऱ्यांचा शारीरिक आणि मानसिक ताण नकळत कमी होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 day work week experiment went well in new zealand company