दत्तात्रेयांचा मूळ अवतार अनादिकाळापासून मानला जातो. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तत्त्वाच्या मुळाशी असलेले ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांचा एकत्रित व अनसूयेच्या पोटी आलेला अवतार म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार होय! परंतु अनेक वेळा दत्तांच्या परंपरेचा उल्लेख दत्त संप्रदाय असा होणे योग्य वाटत नाही. दत्तात्रेय ही सात्त्विक देवता आहे. दत्तात्रेयांचे चित्र वा मूर्तीच्या मागे गाय दाखविली जाते. जे वैदिक सात्त्विक यज्ञांचे प्रतीक आहे, तर पुढे चार श्वान दाखवले जातात, जे चार वेदांचे प्रतीक आहे; वेद हे मूलभूत ज्ञान, जे सृष्टीच्या जननाचे वेळीच परमपिता परमात्म्याने आपल्या मानसपुत्रांना परमकल्याणाचा मार्ग, विश्वाचे सूत्रमय ज्ञान देण्यासाठी प्रदान केले, त्यामुळे अर्थातच वेद हा विश्वमानवाचा वारसा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्रिमुखी दत्तात्रेय असे त्यांचे चित्र नेहमी पाहण्यास मिळते, जे कायमच प्रसन्न करणारे असते. काही वेळा एकमुखी दत्तमंदिर वा चित्रही असते. परंतु अलीकडेच सरदार किबे यांचे हस्तलिखित वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत मिळाले. गोकाकच्या त्या हस्तलिखितांत दत्तमूर्तीचे हात व तीन मुखे निळ्या रंगात दाखवली असून त्यात गाय व श्वान दाखविलेले नाही; ते सुमारे २०० वर्षांपूर्वी छापलेल्या गुरुचरित्र या गं्रथावरील हे चित्र आहे.

भगवान दत्तात्रेय हे गुरुतत्त्व आहे, व ते युगायुगातून आलेल्या गुरुशिष्यांच्या जोडींपैकी महातत्त्व असते! म्हणून सद्गुरू संस्थेचा आद्यगुरू स्वयं परमात्मा आहे, त्याचेपासूनच ही महान परंपरा सुरू झाली. या युगात भगवान दत्तात्रेयांचे अवतार आंध्रमधील पिठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांचे रूपात ७०० वर्षांपूर्वी झाला असे मानले जाते. त्यांचेनंतर श्रीनृसिंह सरस्वती व पुढे अक्कलकोट स्वामींचे रूपात अवतार धारण केला असे मानले जाते. श्री दत्तात्रेयांची परंपरा ही एवढीच दाखवली जाते;  त्याशिवाय शिर्डीचे साईबाबा, टेंबेस्वामी, रंगावधूत महाराज, नवनाथ व आणखी काही थोडेजण एवढाच दत्तात्रेयांचा परिवार दाखवला जातो. पण दत्तात्रेयांचे प्रधान कार्य म्हणजे वेदांचे व वेदधर्माचे रक्षण व पुनरुज्जीवन हेच आहे. त्यामुळे पिठापूर येथे दत्तात्रेयांचे वेदांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्याचे दिशेने वाटचाल सुरू झाली होती, जे  कार्य १९४४ च्या विजयादशमीच्या दिवशी (२७ सप्टें) गुरुमंदिर, अक्कलकोट येथे गजानन महाराजांनी विधिवत उदक सोडून केलेल्या, वेदांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रतिज्ञेने पूर्ण झाले; व लागलीच सात श्लोक (सप्तश्लोकी- धर्मादेश) यांचे माध्यमाने या वैश्विक कार्याची दिशा स्पष्ट केली. वेद हे विश्वमानवाच्या कल्याणासाठी प्रदान केलेले मूलभूत ज्ञान व त्यातील आचारधर्म याप्रमाणे आहे-

१) वायुमंडलशुद्धी हेतू यज्ञ- (रोज करण्याचा यज्ञ अग्निहोत्र) याने मन:शुद्धी लाभते.

२) मनाच्या निर्ममत्व अवस्थेसाठी – सत्पात्री दान!

३) संकल्प- सिद्धीसाठी तप (संयमित जीवन) याचा नियमित अभ्यास!

४) आत्मशुद्धी हेतू सत्कर्माचे आचरण (जसे सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह इ.)

५) मुक्ती हेतु स्वाध्याय!

याच पंचसाधनांच्या पायावर जगातील विविध धर्ममते निर्माण होत राहिली! गाणगापूरचे (पूर्वीचे गंधर्वपूर) नृसिंह सरस्वती कर्दळीवनात तपस्यारत होते. असे मानले जाते की ते एका लाकूडतोडय़ाच्या हातातील कुऱ्हाडीचे निमित्ताने प्रकट झाले व भारतभर भ्रमण करून १८५६ मध्ये अक्कलकोटला आले.

श्रीपादश्रीवल्लभांचे सुमारे ७०० वर्षांपूर्वीचे चरित्र आता मराठीत उपलब्ध आहे. एकदा त्यांच्या मातेने त्यांना ‘‘मुंडावळ्या घातलेले पाहायचे आहे’’, अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा ‘‘मातोश्री आता ते शक्य नाही, पण पुढे आपण कल्कि म्हणून शंबलपुरास येऊ, तेव्हा ते पाहण्यास मिळेल’’- असे प्रत्युत्तर दिले होते, असे म्हटले जाते. शंबलपूर म्हणजे आताचे खरगपूर (प. बंगाल) तर प्राचीन काळचे स्वर्गपूर- जेथे अनेक ऋ षिमुनींनी तपस्या केली होती. शिर्डीच्या साईबाबांचे प्रधान शिष्य- सद्गुरू उपासनी महाराज व स्वामी समर्थाचे प्रमुख शिष्य सद्गुरू बालप्पा महाराज, खरगपूरला जाऊन काही दिवस राहिल्याचे संदर्भ मिळतात, तर परम सद्गुरू गजानन महाराज यांचे जन्मस्थान खरगपूर हेच आहे.

आपल्या निर्वाणाचे वेळी स्वामी समर्थानी त्यांच्या चैतन्य पादुका, छाटी निशाण, बोटांतील अंगठी सद्गुरू बालप्पा महाराज यांना देऊन ‘‘आपले कार्य यावच्चंद्रदिवाकरौ चालू ठेव’’ अशी आज्ञा केली. तेव्हा १९०१ साली त्यांनी मठ (गुरुमंदिर) उभारून आत चैतन्यपादुकांची स्थापना केली, व स्वामींच्या नावाची ग्वाही फिरवली. त्यांचा कार्यकाळ इ. स. १८७८ ते १९१० एवढा होता. त्यांनी पुढे गंगाधर महाराज यांची मठाचे प्रमुख (इ.स. १९१० ते १९३८) म्हणून नियुक्ती केली. त्यांच्यानंतर वयाच्या २० व्या वर्षी  ‘श्री’ यांची गुरुगादीवर नियुक्ती झाली.

सद्गुरू हे ‘श्री’ नावाने सर्वत्र सुविख्यात असून अनेक भारतीय व युरोपीय भाषांत त्यांची चरित्रे, कार्य तसेच संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शिवपुरी, अक्कलकोट हे त्यांच्या चिरंजीव कार्याचे विश्वकेंद्र बनले आहे. आज दत्तप्रभूंच्या कार्याची भक्ती म्हणजे पादुकादर्शन, प्रसाद, पालखी, याला एवढय़ापुरतेच राहिले आहे. त्यांच्या भक्तीच्या कार्याची नेमकी दिशा म्हणजे रोज सायंप्रातर अग्निहोत्र, दान, तप, कर्मादि मूलतत्त्वांचा आचार निष्ठेने सुरू करणे, हा होय.
(हा लेख लोकप्रभामध्ये ८ डिसेंबर रोजी प्रकाशित झाला आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Datta jayanti 22 dec