पनीर बटर मसाला
(वेळ १५ मिनिटे) / चार जणांसाठी
साहित्य
२५० ग्रॅम पनीर, ३ मध्यम आकाराचे टोमॅटो, १-२ हिरव्या मिरच्या, १ इंच आल्याचा तुकडा, अर्धा कप क्रिम, २ चमचे बटर, २ चमचे कोथिंबीर, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, एक चमचा धनेपूड, एक चमचा सुकलेली मेथीची पाने, मीठ चवीनुसार, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर
कृती
टोमॅटो, हिरवी मिर्ची आणि आल धुवून घ्या. टोमॅटो बारीक चिरून घेऊन, मिरच्या आणि साल काढलेले आले भरडसर कुटून घ्यावे. नंतर या सर्वांना एकत्र मिक्सरमधून फिरवून त्याची चांगली पेस्ट करा. कढईत एक चमचा बटर घालून गॅसवर गरम करण्यास ठेवा. बटर वितळू लागताच त्यात जिरेपूड, धनेपूड, हळद घालून थोडा वेळ ढवळा. नंतर यात टोमॅटो-हिरवी मिर्ची-आल्याची पेस्ट, लाल तिखट, सुकलेली मेथीची पाने घाला. बटरचा तवंग दिसेपर्यंत हे मिश्रण ढवळत राहा. त्यानंतर या मिश्रणात क्रिम, गरम मसाला, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा ढवळा. आता यात अर्धा कप पाणी घालून उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवा. जेव्हा ग्रेव्हीला उकळी येईल, तेव्हा ग्रेव्हीमध्ये पनीरचे तुकडे घालण्यास सुरुवात करा. कढईवर झाकण ठेऊन मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे शिजवा. ३ ते ४ मिनिटांनंतर उरलेले बटर यात घाला. तोंडाला पाणी आणणारे ‘पनीर बटर मसाला’ तयार आहे. एका सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून घेऊन, पोळी, पराठा, नान, रोटी अथवा भाताबरोबर सर्व्ह करा.
पाककृती : निशा मधुलिका