लंडन : वाईट स्वप्ने पडणे हा आजार नाही. पण ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वृद्धांना दीर्घकाळ अशी स्वप्ने पडत असतील तर त्यांना पार्किन्सन व्याधी जडण्याची शक्यता असते. ब्रिटनमधील बर्मिगहॅम विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी यासंबंधी दावा केला आहे. पार्किन्सनच्या रुग्णांना चालताना अडचणींचा सामना करावा लागतो. शरीराचे कंपन, असंतुलन असा त्रासही त्यांना होतो.
पार्किन्सनमुळे अनेक रुग्णांना व्यवस्थित बोलता येत नाही. लिहितानाही त्यांचे हात थरथरतात. त्यांच्या मानसिक वर्तणुकीतही बदल होतात. कमी झोप, निराशा आणि विस्मृती यांसारख्या समस्या वाढतात. जगभरात ४० लाख लोकांना हा आजार आहे. याचाच अर्थ प्रति १ लाखापैकी १३ जण यामुळे त्रस्त आहेत.
अभ्यासात काय निष्पन्न झाले?
बर्मिगहॅम विद्यापीठाचे ‘न्यूरॉलॉजिस्ट’ आबिदेमी ओटाइकू यांनी केलेल्या या अभ्यासानुसार ही व्याधी जडल्याचे स्पष्ट होईपर्यंत त्या व्यक्तीने ६० ते ८० टक्के ‘डोपामाईन रिलीजिंग न्युरॉन’ गमावलेले असतात. त्यामुळे ६५ वर्षांवरील वृद्धांना त्यांना पडणाऱ्या स्वप्नांची माहिती घेऊन त्यांच्या हालचालींच्या आधारे पार्किन्सनच्या सुरुवातीच्या लक्षणांची माहिती घेता येते. या विषयाचा अहवाल ‘ईक्लिनीकल मेडिसिन’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
पुरुषांना अधिक धोका
१२ वर्षे केलेल्या अभ्यासादरम्यान ३ हजार ८१८ पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. यानुसार वारंवार वाईट स्वप्ने पडणाऱ्या व्यक्तीला या आजाराची शक्यता दुप्पट असते. विशेष म्हणजे या व्याधिग्रस्त महिलांपेक्षा पुरुषांना अधिक वाईट स्वप्ने पडतात.