आपल्या आहाराच्या दृष्टीने दूध हे पूर्णान्न असते. लहान मूल तर जन्मानंतर जवळपास दीड वर्ष फक्त दुधावरच असते. पण आपण जसंजसे मोठे होत जातो तसे दूध पिण्याचे प्रमाण कमी होते. दुधात शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषक घटक असतात. दुधात कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्स तर भरपूर असतातच, पण ए, बी-१, बी-२, बी-३, बी-५, बी-६, बी-१२, सी, इ, के, डी ही जीवनसत्वेसुध्दा मुबलक असतात. याशिवाय कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, मँगेनीज, तांबे, पोटॅशियम, सेलेनियम, झिंक, फॉस्फरस ही खनिजे उत्तम प्रमाणात उपलब्ध असतात. एक कप शुध्द दूध प्यायल्यावर आपल्या शरीराला साधारणतः १४० कॅलरीज मिळतात. सुदृढ प्रकृतीसाठी, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यासाठी, हाडे बळकट होण्यासाठी आणि मुख्य म्हणजे आरोग्य उत्तम राहायला दुधासारखा दुसरा पर्याय नाही. पण दूध कोणत्या वेळेला, किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने प्यावे याबाबत सामान्यांमध्ये बरेच गैरसमज असतात. त्यामुळे त्याची नेमकी माहिती असल्यास त्यातील पोषक घटक जास्त चांगल्या पद्धतीने मिळतात.
      
सकाळी दूध घेणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

* सकाळी उठल्यावर व्यायाम आणि प्रातविधी झाल्यानंतर दूध घेतल्यास त्यातून मिळणारी पोषक द्रव्ये शरीराला दिवसभर ऊर्जा देतात. त्यामुळे दिवसभर शरीरातील उर्जेची पातळी टिकून राहण्यासाठी दूध सकाळी घेतलेले उत्तम.
*  काहींच्या मते सकाळी उठल्यावर दूध पिणे जड असते, कारण पचनसंस्थेला सकाळी दूध पचवणे त्रासाचे ठरते. मात्र परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. दूध हे पचायला सोपे असते. सकाळी उठल्यावर मांस, मटण, केक, क्रीमरोल यांसारखे पदार्थ पचायला जड असतात.

* आरोग्याच्या नियमानुसार सकाळी व्यायाम करून दूध आणि त्याबरोबर काही तंतुमय पदार्थ खावा. उदा. पोहे, फळे, लाह्या किंवा कॉर्नफ्लेक्स. त्याचप्रमाणे प्रोटीन्स जास्त असलेली अंडी खायला हरकत नाही. याचा उपयोग उर्जा मिळवण्यासाठी आणि स्नायूवर्धन होण्यास नक्की होतो.

रात्री दूध घेणे
*  रात्री झोपण्यापूर्वी दूध घेतल्यास त्यामुळे पोटातली अॅसिडिटी कमी होते. मात्र यासाठी दूध कपभर किंवा ग्लासभरच घ्यावे आणि झोपण्यापूर्वी किमान तासभर आधी घ्यावे.

*  दुधामध्ये असलेले ट्रिप्टोफॅन या अमायनो अॅसिडमुळे सिरोटोनिन आणि मेलाटोनिन ही मेंदूवर इच्छित परिणाम करणारी दोन द्रव्ये जास्त प्रमाणात तयार होतात. त्यामुळे वेळेवर झोप येते, तसेच ती शांत आणि पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते.
*  ज्या व्यक्तींचे रात्री पाय दुखतात त्यांचे दुखणे दुधामध्ये असलेल्या मँगनीजमुळे कमी होते. हा त्रास औषधाशिवाय नियंत्रणात येतो.

 

काही महत्त्वाच्या सूचना
*  काही व्यक्ती कच्चे दूध पिणे पसंत करतात. मात्र ते स्वच्छ आणि शुध्द आहे याची खात्री करावी.  दूध खूप तापवल्याने त्यातील काही प्रथिने आणि जीवनसत्वे नष्ट होऊ शकतात.
*  आम्ल पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी थंड दूध घ्यावे.
*  दूध नैसर्गिक स्वरूपातले असावे. पावडरचे दूध किंवा बॉक्समधले दूध चहा कॉफीसाठी एखादवेळी ठीक, पण तब्येतीसाठी नैसर्गिकच दूध जास्त उपयुक्त असते.
*  दुभत्या जनावरांना जर अॅँटिबायोटिक्स, हार्मोन्स वापरली असतील तर त्याचे दुष्परिणाम आपल्यावरही होतात.
थोडक्यात, ‘कधीही प्या, पण दूध प्या’ सकाळी प्या किंवा रात्री प्या, हवे तर दोन्ही वेळेस प्या’ हा मुख्य संदेश आजच्या तरुणपिढीने आणि लहान मुलांनी लक्षात ठेवला पाहिजे.

डॉ. अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milk is useful for body misconceptions regarding the same