गरम मसाल्याच्या पदार्थातील एक अविभाज्य घटक म्हणजे काळी मिरी. चवीला तीक्ष्ण, उत्तम सुवास आणि पदार्थाची चव वाढविणारी काळी मिरीचं स्वयंपाक घरात महत्त्वाचं स्थान आहे. मसालेभात किंवा ग्रेव्ही असलेल्या भाजीत काळी मिरीचा वापर हमखास होतो. परंतु, काळी मिरीचे अन्यही काही फायदे आहेत. विशेष म्हणजे केसांच्या समस्येवर काळी मिरी एक गुणकारी औषध असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे केसातील कोंडा, केस गळणे यावर काळी मिरी फायदेशीर आहे. चला तर मग पाहुयात काळी मिरीचे काही फायदे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. केसातील कोंडा –

अनेक जण केसात कोंडा होण्याच्या समस्येने त्रस्त असतात. वातावरणातील बदल, आपली आहारपद्धती याचा परिणाम शरीरावर, त्वचेवर आणि केसांवर थेट होत असतो. त्यामुळे अनेकदा केसांमध्ये कोंडा होतो. त्यामुळे अशा समस्येवर काळी मिरीच्या तेलाने केसांना मालिश करावी. यासाठी ३०० ग्रॅम खोबऱ्याच्या तेलात ३ ग्रॅम मिरपूड टाकून हे तेल चांगलं उकळून घ्यावं. त्यानंतर तेल गार झाल्यावर या तेलाने टाळूवर हलक्या हाताने मालिश करावी. साधारणपणे अर्धा-एक तासाने कोमट पाण्याने केस धुवून घ्यावेत. हा प्रयोग आठवड्यातून २ ते ३ वेळा करावा.

२. अकाली केस पांढरे होणे –

काळी मिरीमध्ये अॅटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. त्यामुळे अकाली पांढरे झालेले केस पुन्हा काळे करण्यास काळी मिरी फायदेशीर ठरते. यासाठी ३ चमचे दही, १ चमचा मिरपूड एकत्र करुन त्याची पेस्ट करावी. त्यानंतर ही पेस्ट स्काल्पवर लावावी. १ तास झाल्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवावेत.

३. केसांच्या वाढीसाठी –

अनेक जण केसगळतीमुळे त्रस्त असतात. त्यामुळे अशा समस्येवर काळी मिरी फायदेशीर ठरते. केस गळत असल्यास ऑलिव्ह ऑइलमध्ये मिरपूड घालावी किंवा ५-६ काळी मिरी टाकावी. या तेलाने दररोज डोक्यावर मालिश केल्यास केसांची वाढ होते. तसंच केस मजबूत होतात.

४. केस मजबूत करण्यासाठी –

केसांचं आरोग्य हे आपल्या हातात असतं. त्यामुळे केस निरोगी राहतील, त्यांना योग्य पोषण मिळेल याकडे आपणच लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे केस मजबूत करण्यासाठी ४ चमचे लिंबाचा रस घेऊन त्यात १ चमचा मिरपूड घालावी. हे मिश्रण केसांना लावावं. त्यानंतर १ तासाने केस स्वच्छ धुवावेत.

( कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips home remedies for dandruff how to use black pepper for hair ssj