साने गुरुजी हे स्वातंत्र्यलढय़ातील माझे प्रेरणास्थान होते. १९४० साली मी पुण्याला फग्र्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना माझी खानदेशमधील काही विद्यार्थ्यांशी मैत्री होती. त्यांच्यापैकी खुशाल पाटील हा वैदिकाश्रमात राहत होता. तो एक दिवस मला म्हणाला, ‘‘साने गुरुजी पुण्यात आले असून आज रात्री आम्ही फिरायला जाणार आहोत. तू ९ वाजता खोलीवर ये.’’ हे ऐकून मला फार आनंद झाला. मॅट्रिकला असताना मी त्या वेळी नुकतेच ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचले होते आणि अर्थातच सर्व वाचकांप्रमाणे मीही भारावून गेलो होतो. साने गुरुजी आणि जळगावला हायस्कूलमध्ये शिक्षक असलेले माझे मामा हे मित्र होते आणि मी मामांकडून गुरुजींबद्दल खूप ऐकले होते; परंतु गुरुजींना भेटण्याचा योग आला नव्हता. त्यामुळे खुशाल पाटीलने मला बोलाविल्यावर माझे मन हरखून गेले. नऊ वाजता मी खुशालकडे गेलो. पाच मिनिटांतच साने गुरुजी तेथे आले. आम्ही पाच-सहा जण होतोच. आम्ही लागलीच निघालो. साने गुरुजींचा साधा पोशाख, सावळी ठेंगणी मूर्ती यापेक्षा माझे लक्ष त्यांच्या डोळ्यांकडे गेले आणि मला त्यांचे डोळे विलक्षण बोलके वाटले. आम्ही फग्र्युसन कॉलेजच्या मागच्या बाजूच्या टेकडीकडे गेलो आणि टेकडीवर निघालो. खुशाल आणि चौधरी हे काही तरी बोलत होते, परंतु साने गुरुजी काही न बोलता खाली मान घालून चालत होते. मला हे काहीसे अनपेक्षित होते. मी न बोलता गुरुजींच्या मागून चालत होतो. आम्ही टेकडी चढून गोखले यांच्या स्मारकापाशी गेल्यावर साने गुरुजी एकदम म्हणाले, ‘‘चला, आपण इथं बसू या. ही माझी फार आवडती जागा आहे.’’ साने गुरुजी एस.पी. कॉलेजमधून बी.ए. झाले होते हे मला माहीत होते. त्यामुळे ही जागा त्यांची आवडती असेल अशी मला कल्पनाही नव्हती. आम्ही बसल्यावर साने गुरुजी आपणहून बोलू लागले. ‘‘मी कॉलेजमध्ये असताना गोखल्यांवर एक छोटं पुस्तक लिहिले. लेखनाची तयारी करीत असताना मी रोज इथे येत असे. गोखल्यांच्या स्मारकाला नमस्कार करून मी खोलीवर गेलो आणि लिहायला सुरुवात केली. पुस्तक लिहून झाल्यावर इथंच येऊन गोखल्यांच्या स्मारकाला माझं हस्तलिखित अर्पण केलं.’’
मी एकदम म्हणालो, ‘‘गुरुजी, मग आज तुम्ही आम्हाला गोखल्यांबद्दलच सांगा.’’ खुशालही तेच म्हणाला. साने गुरुजी एकदम प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले, ‘‘बरं.’’ आणि बोलू लागले. जिवाचा कान करून मी ऐकत होतो. आजही हे लिहिताना माझ्या मनश्चक्षूंसमोर साने गुरुजी उभे आहेत. त्यांचे शब्द जणू मला ऐकू येत आहेत. साने गुरुजींची वाणी हा गंगेचा ओघच होता. साधे-सोपे शब्द सुंदर होत होते. साने गुरुजींनी गोखल्यांचे व्यक्तिमत्त्व आमच्यासमोर उभे केले. गोखल्यांची उत्कट देशभक्ती, त्यांचा व्यासंग, त्यांचे कार्य- साऱ्या पैलूंवर साने गुरुजींनी प्रकाश टाकला. आम्ही जणू त्या कालखंडात वावरत होतो. गोखले आणि गांधी यांच्या भेटीचे वर्णन करताना तर गुरुजी विलक्षण रंगून गेले. ते नंतर म्हणाले, ‘‘गांधीजी भारतात आल्यावर सर्व थोर व्यक्तींना भेटले आणि एका वाक्यात त्यांनी तीन राष्ट्रीय नेत्यांचे वर्णन केले आहे. त्यांनी लिहिले की, ‘फिरोजशहा मेहता पर्वतासारखे उत्तुंग होते. लोकमान्य टिळक हे जणू महासागर होते. गोखले मात्र गंगानदीप्रमाणे होते. या गंगामाईने मला हृदयापाशी घेतले.’ साने गुरुजी पुढे म्हणाले, ‘पुस्तक लिहिताना मला गोखल्यांच्या जीवनातील पावित्र्य समजले आणि त्या वेळी गांधीजी त्यांना गंगामाई का म्हणाले ते समजले.’’ जवळजवळ तासभर साने गुरुजी बोलत होते. मी ते ऐकताना स्वत:ला विसरून गेलो. ‘भारत सेवक समाज’ हे गोखल्यांचे स्वप्न किती भव्य आणि उदात्त होते, हे सांगून साने गुरुजी थांबले. आम्हाला काय बोलावे हे सुचत नव्हते. इतक्यात गुरुजी पुन्हा बोलू लागले, ‘‘आपण बसलो आहोत या जागी गोपाळकृष्ण गोखले आणि त्यांचे दोन सहकारी यांनी आजन्म देशसेवेची प्रतिज्ञा केली. आपण या जागेचे नुसते दर्शन घेऊन चालणार नाही. तुम्ही तरुण आहात. स्वातंत्र्याची चळवळ लवकरच सुरू होईल. तुम्ही मुलांनी येथे स्वातंत्र्यलढय़ात भाग घेण्याची शपथ घेतली पाहिजे. शपथ मनाशी घ्या. तुम्ही ती पाळाल ही मला खात्री आहे. या पवित्र स्थानी आल्यावर माझे जीवन बदलले. तुमचेही बदलेल आणि स्वातंत्र्यलढय़ात उडी घ्याल, असा मला विश्वास आहे.’’ त्या क्षणी साने गुरुजींच्या शब्दांमुळे माझ्या मनाचा निर्धार पक्का झाला आणि स्वातंत्र्य चळवळीत पडण्याची शपथ मी मनाशी घेतली. माझे मित्र मधू लिमये यांच्याबरोबर १९३८ सालापासून मी राजकीय अभ्यास मंडळात जात होतो. १९४० साली मधू लिमये कॉलेज सोडून अमळनेरला गेले आणि साने गुरुजींसमवेत काम करू लागले. १९४१ साली मधू काही दिवस पुण्याला आला होता. त्या वेळी आम्ही पुन्हा भेटलो. बोलता-बोलता मधू म्हणाला, ‘‘तू साने गुरुजींचे फक्त एक भाषण ऐकले आहेस. मी गेले सहा महिने त्यांच्याबरोबर राहतो. इतका मोठा माणूस मी पाहिलाच नाही. एकीकडे ते साधुपुरुष आहेत आणि त्याच वेळी स्वातंत्र्यासाठी सर्वस्व देणारे योद्धे आहेत. मुलांसाठी गोड गोष्टी लिहिणारे साने गुरुजी व्यासपीठावर स्वातंत्र्याबद्दल बोलू लागले की, त्यांचा प्रत्येक शब्द जणू निखाऱ्यासारखा धगधगीत होतो. खानदेशातल्या असंख्य तरुण मुलांच्या मनात साने गुरुजींनी देशभक्तीची ज्योत पेटवली आहे. साने गुरुजी तपस्वी आहेत आणि योद्धेही आहेत. सामान्याला असामान्य करण्याची किमया साने गुरुजीच करू शकतात.’’ मधूच्या या शब्दांचा अनुभव मला १९४२ साली चळवळीत आला. साने गुरुजी १९४२च्या ऑगस्ट महिन्यात पूर्वीची शिक्षा भोगत धुळे जेलमध्ये होते. ९ ऑगस्टला सकाळी त्यांची सुटका झाली. त्यांच्यावर वॉरंट होते, परंतु जेलरने साने गुरुजींना सकाळी लवकर सोडले आणि पोलीस येण्याच्या आतच ते तेथून पळून भूमिगत झाले. तेथून ते मुंबईस आले आणि १४ ऑगस्टला रात्री पुण्यात आले. मी त्यांना खडकी स्टेशनला उतरून घेऊन एका सुरक्षित जागी नेले. आम्ही दुसऱ्या दिवशी कॉलेज विद्यार्थ्यांच्या तीन छोटय़ा बैठकी ठरवल्या होत्या, पोलिसांना संशय येणार नाही अशा जागी. पायजमा-शर्ट-कोट या वेशात जाणाऱ्या साने गुरुजींना कोणी ओळखणे शक्यच नव्हते, परंतु ते बोलायला सुरुवात करीत आणि दोन वाक्यांतच श्रोत्यांच्या मनाचा कब्जा घेत. प्रत्येक ठिकाणी साने गुरुजी पंधरा-वीस मिनिटेच बोलत. त्या दिवशीची त्यांची भाषणे ऐकताना शब्दांतून ज्वाळा कशी उफाळते याचे मला दर्शन झाले. आम्ही संध्याकाळी खोलीवर आलो आणि आम्हाला समजले की, म. गांधींच्या समवेत आगाखान पॅलेसमध्ये असलेले त्यांचे सचिव महादेवभाई देसाई यांचे निधन झाले. ही वार्ता ऐकून साने गुरुजी एकदम क्षुब्ध झाले आणि येरझारा घालू लागले. त्यांच्या डोळ्यांमध्ये दु:ख आणि संताप यांचा जणू लोळ दिसत होता. गुरुजी एकदम थांबले आणि मला म्हणाले, ‘‘कागद आहेत का?’’ मी खोलीतील कागद त्यांना दिले आणि साने गुरुजी खिशातून पेन काढून एकदम लिहू लागले. ते विलक्षण जलदपणे लिहीत होते. मी मंत्रमुग्ध होऊन फक्त पाहत होतो. पाच-सहा ताव लिहिले आणि थांबून माझ्या हातात तो मजकूर देत ते म्हणाले, ‘‘वाच आणि लगेच सायक्लोस्टाइल करून आजचे बुलेटिन म्हणून ते सगळीकडे पाठव.’’ साने गुरुजींनी महादेवभाईंच्या जीवनावर आणि मृत्यूवर लिहिलेले ते जणू अविस्मरणीय काव्य होते. मी आणि माझा मित्र बुलेटिन काढण्याच्या आमच्या गुप्त जागी गेलो. या बुलेटिनच्या हजारो प्रती आम्ही पुण्यात वाटल्या आणि महाराष्ट्रातील प्रमुख केंद्रांवर पाठवल्या. ते बुलेटिन चळवळीच्या धबडग्यात कोठे गेले ते आठवत नाही. आज जरी ते उपलब्ध झाले असते तरी साने गुरुजींचे लेखन तात्कालिकाकडून चिरंतनाकडे कसे जात असे हे वाचकांना समजले असते.
मुंबईला भूमिगत असताना एस. एम., शिरुभाऊ यांच्याबरोबरच साने गुरुजी ताडदेवला राहत. या जागेचे चळवळीतील नाव होते ‘मूषक महाल’. दिवसभर सर्व जण वेगवेगळ्या जागी जात. साने गुरुजींना मात्र दुपारी चार ते रात्री अकरापर्यंत वेगवेगळ्या जागी नेत. साने गुरुजी त्या वेळी सगळ्यांचा स्वयंपाकही करीत. एकदा अच्युतराव तेथे जेवायला आले तेव्हा गुरुजींनी त्यांना गरम पोळ्या वाढल्या आणि अच्युतराव जेवत असताना हळूच हसत विचारले, ‘‘पांडू आचाऱ्याच्या पोळ्या कशा झाल्यात?’’ अच्युतरावांना एक क्षण प्रश्न कळला नाही, पण साने गुरुजींचे नाव पांडुरंग आहे हे लक्षात येताच ते एकदम म्हणाले, ‘‘माझी सातजन्मांची पुण्याई म्हणून पांडूने आई होऊन मला आज जेवू घातले.’’
पुढे साने गुरुजी, एस. एम., गोरे, शिरुभाऊ हे सगळे जण मूषक महालात पकडले गेले. नंतर काही दिवसांनी साने गुरुजींना येरवडय़ाला आणण्यात आले आणि माझे परमभाग्य म्हणजे आमच्या बराकीतच त्यांना ठेवले. जेलमध्ये साने गुरुजींना आम्ही काही मित्र म्हणालो, ‘‘गुरुजी, तुम्ही आम्हाला बंगाली शिकवा!’’ गुरुजी आनंदाने तयार झाले. मात्र म्हणाले, ‘‘तुम्हाला बंगाली येते, पण ते तुम्हाला माहीत नाही. ते मी फक्त माहीत करून देईन.’’ त्यांनी आम्हाला जेलरकडून खडू आणि फळा आणण्यास सांगितले आणि ते आणल्यावर ते म्हणाले, ‘‘पाच वाजता आपण टागोरांची कविता वाचू.’’ बंगालीची आम्हाला तोंडओळख नसताना एकदम टागोरांची कविता कशी समजेल असे मला वाटले. पाच वाजता आम्ही सात-आठ जण जमलो. त्या वेळी गुरुजींनी फळा आमच्यासमोर ठेवला. फळ्यावर नागरी लिपीत रवींद्रनाथ टागोरांची ‘संन्यासी उपगुप्त’ ही कविता लिहिली होती. गुरुजी म्हणाले, ‘‘ही कविता तुम्ही वाचा आणि अर्थ समजतो की नाही ते मला सांगा!’’ आम्हाला बहुतेक सर्व अर्थ समजला होता. साने गुरुजी हसले आणि म्हणाले, ‘‘तुम्हाला बंगाली येतंय हे मी म्हणालो ते बरोबर आहे ना!’’ थोडे थांबून पुढे म्हणालो, ‘‘पण तुम्हाला शब्दांचा अर्थ कळला म्हणजे कविता समजली असे समजू नका. मी ती तुम्हाला समजावून सांगतो.’’ आणि नंतर गुरुजी बोलू लागले, ‘‘अभिसार करायला निघालेल्या वारांगनेला उपगुप्त हा तरुण संन्यासी दिसला आणि ती एकदम थबकली.’’ टागोरांच्या कवितेतील हा प्रसंग साने गुरुजींनी आमच्या डोळ्यांसमोर उभा केला. उपगुप्त त्या वारयोषितेस म्हणतो, ‘मी तुला भेटेन, पण आज नाही. पुढे कधी तरी ती वेळ येईल.’ हे सांगून साने गुरुजी कवितेच्या उत्तरार्धाकडे वळले. काही वर्षांनी ती वारांगना त्या गावाच्या वेशीत पडली होती. तिचा उपभोग घेऊन चैनी लोकांनी तिला हाकलून लावले होते. ती आजारी होती आणि कोणी तिला पाणीही देत नव्हते. या वेळी उपगुप्त संन्यासी तेथे येतो आणि तिला उचलून घेऊन म्हणतो, ‘मी कबूल केल्याप्रमाणे आज आलो आहे!’ आणि तिची शुश्रूषा करण्याकरिता तिला घेऊन जातो. त्या वारांगनेच्या जीवनातील कारुण्य आणि संन्याशी उपगुप्ताने पाळलेले वचन, यांवरील साने गुरुजींचे भाष्य ऐकताना माझ्या लक्षात आले की, टागोरांची कविता आता खरी उमजली. प्रतिभावान शिक्षक कसा असतो याचा अनुभव साने गुरुजींच्या जवळ बंगाली शिकताना मला आला. पुढे स्वातंत्र्य मिळाले. साने गुरुजी त्या वेळी दादरला ‘मेधा भुवन’मध्ये राहत. १५ ऑगस्ट १९४८ ला साने गुरुजींनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. साने गुरुजींचा ‘साधना’तील पहिला अग्रलेख अविस्मरणीय आहे. ‘साधना’ ही वैरभाव आणि विषमता कमी करील आणि सत्याग्रही लोकशाही समाजवादाचा संस्कार तरुण पिढीवर करील, असे साने गुरुजींनी आत्मविश्वासाने लिहिले आहे. साने गुरुजी मोठय़ा माणसांच्या सहवासात अबोलपणे वावरत; परंतु मुले भोवती असली की त्यांचे मन बहरून येई आणि मुलांशी त्यांचा संवाद सुरू होत असे. ‘साधना’त त्यांनी आपली पुतणी सुधा हिला लिहिलेली ‘सुंदर पत्रे’ ही केवळ सुधाला लिहिलेली नाहीत- साने गुरुजींनी महाराष्ट्रातील सर्व मुलांशी त्या पत्रांतून संवाद केला आहे. त्यांना निसर्गाचे, जीवनाच्या विविध अंगांचे सौंदर्य दाखविले आहे. १९५० सालच्या मे महिन्यात सांगली येथे राष्ट्र सेवा दलाचे प्रांतिक शिबीर भरले होते. साने गुरुजी शिबिरात आले. त्यांनी लहान मुलांना एक सुंदर गोष्ट सांगितली. दुपारी प्रौढांसाठी आम्ही त्यांचे बौद्धिक ठेवले होते. साने गुरुजी आले. मी त्यांची अनेक बौद्धिके ऐकली होती; परंतु त्या दिवशीचे त्यांचे बोलणे अलौकिकच होते. गुरुजी बोलू लागले, ‘‘एका वेळी ज्याच्या हातात कौशल्य असे त्याचे समाजात कौतुक होई. काम करताना ज्ञानही मिळे. शेतीचं काम करताना माणसाला किती तरी ज्ञान मिळालं. आकाशात ढग येतात, पण कोणत्या ढगांतून पाऊस पडणार आहे, कोणते वाऱ्यावर विखरून जाणार हे शेतकऱ्यालाच कळतं. एकीकडे त्याचे हात काम करीत असतात, दुसरीकडे त्याचे डोळे पाहात असतात. पक्ष्यांचे आवाज तो ऐकतो. त्यावरून तो आपले आडाखे बांधतो. मातीचा वास त्याला येतो. निसर्गाची गुपितं त्याला समजतात. जमिनीची मशागत कशी करावी, पेरणी केव्हा करावी हे त्याला कळू लागतं. काम करताना ज्ञान मिळवायचं आणि मिळालेल्या ज्ञानातून काम अधिक चांगलं करायचं, असं होतं एका वेळी आपल्याकडे. सगळे जण काम करीत. सगळ्यांना वाचता येत नव्हतं, पण हातानं काम करताना जीवनाचा ग्रंथ कळत होता; पण पुढं मात्र आपल्या समाजात विकृती निर्माण झाली. ज्ञान आणि काम यांची फारकत करण्यात आली. ज्यांनी ज्ञान मिळवायचं त्यांनी ग्रंथ वाचावेत, वेदमंत्र म्हणावेत, पण शारीरिक श्रम मात्र करू नयेत असं ठरलं. जे कष्टाची, अंगमेहनतीची कामं करीत त्यांना कमी लेखण्यात येऊ लागलं. त्यांनी नुसतं राबायचं. त्यांना ज्ञान मिळवण्याचा अधिकारही नाकारण्यात आला. त्यामुळं झालं काय, तर ज्ञान मिळविणाऱ्यांचे हात कमजोर झाले आणि काम करणाऱ्यांच्या बुद्धीची वाढ थांबली. ज्ञानापासून निर्मितीचा आनंद दूर गेला. ज्ञान वांझोटं झालं. कष्ट म्हणजे ढोर मेहनत ठरली. यामुळे समाजात भिंती उभ्या राहिल्या. जातिभेद सुरू झाला. हा ब्राह्मण, तो शूद्र. ब्राह्मणाने श्रम करायचे नाहीत. शूद्रानं ज्ञान मिळवायचं नाही. याच्यातून आपला अध:पात झाला. ज्ञान म्हणजे ‘घटपट’ झालं, कष्ट म्हणजे आंधळेपणानं राबणं झालं. पाश्चात्त्य देशांनी ही चूक केली नाही. त्यांनी सात समुद्र ओलांडले, शोध लावले. त्यामुळे त्यांच्याकडे ज्ञानाचा प्रकाश आला. आपण अंधारात चाचपडत राहिलो. त्यामुळंच स्वातंत्र्यही गमावलं. दीडशे वर्षे इंग्रजांनी आपल्याला लुटलं. आता आपला देश स्वतंत्र झाला, पण स्वातंत्र्य मिळालं म्हणजे देश सुधारला असं समजू नका. स्वातंत्र्य म्हणजे देश सुधारण्याची संधी. या संधीचा फायदा घेऊन आपण पुन्हा ज्ञान आणि श्रम यांना एकत्र आणलं पाहिजे. आपण प्रत्येकानं हातात नवी कौशल्यं आणली पाहिजेत आणि विद्याही मिळवली पाहिजे. आपल्या मनातली कोळिष्टकं काढली पाहिजेत आणि देशातील घाण काढून शेतं पिकवली पाहिजेत, बागा फुलवल्या पाहिजेत!’’ गुरुजी पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण म्हणतो, ‘हे सरकारनं करावं. ते सरकारनं करावं.’ सरकारनं आपलं कर्तव्य केलंच पाहिजे, पण लोकांनीही काम केलं पाहिजे. म. गांधींनी ‘हिंद स्वराज’मध्ये ही कल्पना सुंदर रीतीने मांडली आहे. लोकांचा सहभाग नसेल तर ते कसलं स्वराज्य? प्रत्येकाला, ‘मी माझा देश घडवतो’ असं वाटलं पाहिजे. असं वाटायचं असेल तर लोकांनी एकत्र येऊन कष्ट केले पाहिजेत. हे आपण लोकांना शिकवलं पाहिजे. ते व्याख्यान देऊन नाही शिकवता येणार. आपणच गावागावांत जाऊन रस्ते बांधायला, तळी खोदायला सुरुवात केली पाहिजे. राष्ट्र सेवा दलाने हे केलं पाहिजे. म्हणजे लोक हळूहळू येतील. पहिली पणती सेवा दलाने लावावी. त्या पणतीवर दुसऱ्या पणत्या पेटतील. आपण नवा भारत घडवू. समृद्ध आणि समतेवर आधारलेला भारत, घाम गाळणारा आणि विद्येची उपासना करणारा भारत हा निसर्गावर प्रेम करणारा आणि देशातील सर्व भेदाभेद- धर्माचे, जातींचे भेद नाहीसे करून सर्व देशबांधवांची एकजूट करणारा माझ्या स्वप्नातील बलसागर भारत! आपला भारत देश सुखी व्हायचा असेल तर स्वातंत्र्याबरोबर समता पाहिजे आणि बंधुभावही पाहिजे. यासाठीच सेवा दल सैनिकांनी धडपडावं अशी माझी अपेक्षा आहे.’’ साने गुरुजींनी त्यांचे मनोगत उत्कटतेने व्यक्त केले. हे ऐकताना आम्ही केवळ मंत्रमुग्ध झालो नव्हतो, तर आम्हाला प्रकाशाचे किरण गवसत होते. साने गुरुजींचे मी ऐकलेले हे शेवटचे भाषण. त्या वेळी मी टिपणे घेतली होती. त्यातूनच साने गुरुजींचे हे शब्द मी येथे देत आहे. या भाषणानंतर महिन्याभरातच साने गुरुजींनी त्यांच्या जीवनाची ज्योत विझवली. त्यांनी मला दिलेल्या प्रकाशात मी आजवर आयुष्यात वाटचाल केली आहे. मात्र या वाटचालीत माझ्या मनात अनेकदा येते की, अनेकांना प्रकाश देणाऱ्या साने गुरुजींनी स्वत:च्या जीवनाची ज्योत अचानक मालवून का बरे टाकली? अजूनही मला या प्रश्नाचे उत्तर सापडलेले नाही. मला असे वाटते, प्रकाश आणि छाया यांची सीमारेषा सूक्ष्म असते आणि मृत्यूच्या छायेत गेलेले साने गुरुजी त्यांच्या साहित्यातून आपल्याला सतत प्रकाशकिरणच देतात. अशा चार ओळी म्हणजे-
‘जाच काच गरिबांना नुरवू
झोपडय़ांतूनी मोद फुलवू
स्थापन करणार लोकशाही,
सुखवू प्रियतम भारतमाई ’
(लोकरंग -२० डिसेंबर १९९८)
संग्रहित लेख, दिनांक 28th Aug 2016 रोजी प्रकाशित
आठवणीतील साने गुरुजी
मी एकदम म्हणालो, ‘‘गुरुजी, मग आज तुम्ही आम्हाला गोखल्यांबद्दलच सांगा.’’ खुशालही तेच म्हणाला.
Written by लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-08-2016 at 00:50 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author ga pra pradhan article on on occasion of birth centenary year of sane guruji