शर्मिला फडके

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ओव्हर अ पॅसेज ऑफ टाईम’ हे सुभाष अवचट यांचे जलरंगांतील निसर्गचित्रांचे प्रदर्शन वरळी येथील ‘आर्ट अ‍ॅन्ड सोल’  कलादालनामध्ये १२ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत भरले आहे. अवचटांच्या आजवरच्या चित्रप्रवासापेक्षा अगदीच वेगळा विषय व वेगळ्या रंगमाध्यमातील या अनोख्या चित्रप्रदर्शनाबद्दल..

सुभाष अवचट गप्पा मारतात किंवा लिहितात तेव्हा त्यात त्यांना भेटलेल्या माणसांचे किस्से असतात. ते रंगतदार, कधी मजेशीर असतात. बऱ्याचदा अंतर्मुख करणारेही. ही माणसं त्यांना प्रवासात भेटलेली असतात, त्यांचं लहानपण जिथे गेलं त्या गावातली असतात, फिरलेल्या शहरांतली असतात, भेटी दिलेल्या घरांतली असतात, शेतातली असतात आणि रस्त्यांवरचीही असतात.. अवचटांच्या बोलण्या किंवा लिहिण्यातून ते आपल्याला त्यांच्या आठवणींच्या आल्बममधील एकेक पान उलगडून दाखवत असल्यासारखं वाटत राहतं. त्यांची नवी जलरंगांतली निसर्गचित्रं पाहताना अगदी तसंच वाटतं. प्रवासात पाहिलेली, अनुभवलेली घरे, इमारती, रस्ते, वाटांची वळणे, मोकळ्या जागा, भिंती, बुरुज.. काही ढासळलेले, काही अभंग! हे त्यांच्या आठवणीतले प्रदेश आहेत की आपल्या, असा प्रश्न मनाला पाडून जाणारे. 

‘ओव्हर अ पॅसेज ऑफ टाईम’ या चित्र-प्रदर्शनातली अवचटांची ही जवळपास पन्नासेक जलरंगांतली निसर्गचित्रं त्यांच्या आधीच्या कोणत्याही चित्रमालिकेपेक्षा अत्यंत वेगळी आहेत, वेगळा ‘फील’ जागवणारी आहेत. त्यांतला मूड वेगळा आहे, रंग आणि आकार वेगळे आहेत. त्यांच्या एरवीच्या भल्यामोठय़ा साइझच्या पेंटिंग्जच्या तुलनेत ही अगदीच लहानशी. वापरलेलं माध्यमही त्यांचं नेहमीचं अ‍ॅक्रिलिक नाही, वॉटर कलर्सचं आहे. साहजिकच या माध्यमाला साजेल, शोभेल अशी ही अभिव्यक्ती आहे. अवचटांच्या नेहमीच्या ठळक, ठसठशीत आकार आणि रंगांहून वेगळी, हलकी, तरल आणि लिरिकल. खरं तर अवचट काही रोमँटिक पेंटर नाहीत. त्यांना तसं म्हटलेलं आवडतही नाही. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर त्यांची स्टाईल वेगळी आहे. ते हमाल, कामगार, संन्यासी रंगवतात. त्यात धारावी असते, थिएटर असतं. त्यात गुहेतील अंधाराचा शोध आहे. विदूषकाच्या डोळ्यांतला पॅथॉस आहे. कदाचित लॉकडाऊनमध्ये घराकडे, गावाकडे चालत निघालेल्या कामगारांच्या झुंडी, घरात गुदमरलेले, भीतिदायक चेहरे हे त्यांचे विषय आहेत.

आणि तरीही लॉकडाऊनच्या त्याच एकांतवासात हे तरल आठवणींच्या प्रदेशातले तुकडे त्यांच्या हातून कागदावर उमटले आहेत. ही चित्रं म्हणजे एखाद्या करडय़ा, राखाडी संध्याकाळी आत्ममग्न अवस्थेत आपोआप बाहेर तरंगत येणारे अनुभवांच्या प्रदेशातले तुकडे आहेत. एकेकटे. त्यांना एकत्र जोडून कदाचित एक एकसंध प्रदेशचित्र निर्माण होईलही. रुढार्थाने ही लॅन्डस्केप्स नाहीत, ही मेटास्केप्सही नाहीत. अनेकदा काही विशिष्ट गोष्टीबद्दल सांगायचं नसतं.. विशिष्ट आठवण, प्रवास असं काही डोळ्यासमोर नसतं. पण त्या अनुषंगाने बरंच काही असतं, जे व्यक्त होत राहतं. आपोआप. उत्स्फूर्तपणे. अनेक आठवणी, अनुभवांची सरमिसळ, त्यानिमित्ताने मनात उमटत गेलेले विचार.. त्यालाही काही विशिष्ट दिशा नाही. अशा वेळी लॅन्डस्केप्सना कधी ‘मेटास्केप्स’, कधी ‘ड्रीमस्केप्स’ संबोधलं जातं.

अवचटांच्या या वॉटर कलर्सना ‘इनस्केप्स’ संबोधता येईल, कारण ते खरं तर ठसे आहेत. स्वत:च्या आत उमटलेले. संवेदनशील, तीव्र भावनाशील मनावर उमटणारे ठसे जितके खोल असतात, तितकेच ते तरल असतात. बाहेर यायला उत्सुक असे. वॉटर कलरसारखं माध्यम मिळाल्यावर ते आपोआप बाहेर झिरपले. पाण्याच्या प्रवाहाइतके सहज. अर्थातच ही सहजता, सोपेपणा दिसत आहे, तो अवचटांच्या आजवरच्या प्रवासाचं फलित आहे. चित्रांमध्ये, रंगांमध्ये बुडून अख्खं आयुष्य बुडून जातं तेव्हा हा सोपेपणा, ही सहजता तरंगत वर आलेली असते.

भेटलेली माणसं, लहानपणातलं जग, गावातली घरं, कुंपण, िभती, शेती, मळे, दगड, टेकडय़ा, प्राचीन इमारती, सह्याद्रीचे डोंगरकडे, नदीचे काठ, मोकळी कुरणं, अथांग अवकाश.. या सगळ्यांचे ठसे, खूणा आजवर कधी ना कधी त्यांच्या चित्रांमधून दिसल्या होत्या. त्यात कोलाहल होता, प्रश्न होते, दु:ख, आवेग होता.. काहीतरी सांगायचे होते. त्यात सर्कस, पेट्रोमॅक्सचे कंदिल, विदुषक, हमाल.. लाल, हिरवे, निळे रंग, अध्यात्माचा केशरी, देवरायांचा सोनेरी झळाळ होता. आणि आता चित्र-प्रदर्शनातल्या चित्रांमध्ये या सगळ्याला संपूर्ण विरोधाभासी असे आत्ममग्न मूडमधले हलके, उत्फुल्ल, आनंदी जलरंग आहेत. 

अवचटांचं हे रंगांचं पॅलट अनोखं आहे. त्यांच्या चित्रांमधून आजवर कधी न दिसलेल्या या छटा आहेत. एकाच वेळी त्या आनंद देतात आणि शांतही करतात मनाला.. कोलाहलापासून मुक्त करतात. लॉकडाऊनच्या एकांतवासात त्यांनी स्वत:त भिनवून घेतलेली शांतता यात झिरपलेली आहे. या चित्रांमधले आकार मिनिमलिस्ट आहेत. शतकांपूर्वीच्या लघुचित्रांची आठवण करून देणारी सोपी मांडणी त्यात आहे.

अनेक वाटांवरून चालत, प्रदेश पार करत, डोंगर, दऱ्या, वाळवंट ओलांडत मुसाफिर अखेर एका शांत, स्थिर मुक्कामावर येऊन पोहचतो. आणि मग शांत विश्रामावस्थेत तो आपल्या आजवरच्या त्या प्रदीर्घ, क्लिष्ट प्रवासाकडे मिटल्या डोळ्यांच्या आडून पाहतो तेव्हा त्याला काही मोजके रंग, सोपे आकार, सरळ, प्रवाही रेषा फक्त दिसत असणार. सगळी गुंतागुंत, क्लिष्टता निमाल्यावर उरणारे मूलभूत, सोपे आकार आणि सौम्य, सुखावणारे रंग.

रंग महत्त्वाचे असतात. अवचटांकरता ते कायमच होते. सगळ्या आकारांना, आकृत्यांना, भावनांना बांधून ठेवणारे रंग. त्यांचे रंग आजवर ठळक होते, ठसठशीत होते, थेट भिडणारे, अंगावर येणारेही होते. त्यात कल्लोळ होता, झगमगाट होता, कोलाहल होता. या चित्रांमध्ये तो नाही. यात रंगांचा डॉमिनन्स नाही. आकारांमध्ये सौंदर्यपूर्ण, ठळक रचनांचा अट्टहास नाही. जाणीवपूर्वक असा कोणताच प्रयत्न नाही. सशक्त दृश्यात्मकता हा त्यांच्या चित्रांमधला स्थायीभाव. यातही ती आहे. पण तरीही एक तरल, काव्यात्मकता त्यात आहे.. जी वेगळी आहे, अनोखी आहे. यात कसलीही तीव्रता नाही, घाई नाही. आठवणीतल्या दृश्यांचं हे एक कोलाज आहे. यातलं प्रत्येक चित्र म्हटलं तर वेगळं; म्हटलं तर एका अखंड, सलग दृश्यमालिकेतला एक तुकडा. म्यूटेड.  

कला-इतिहासात जवळपास प्रत्येक चित्रकाराने आपापल्या शैलीत आणि माध्यमात लॅन्डस्केप्स रंगवली आहेत. कधी कळत, अनेकदा नकळत. काहींमध्ये ओळखू येणारे अवतीभवतीचे आकार, काहींमध्ये मनावर उमटलेले आकार, काहींमध्ये नुसताच रंग, प्रकाश- जो त्या, त्या प्रदेशातला, मनात शिल्लक उरलेला. मातिझचं आकाश निळं असायचंच असं नाही. गवतही नेहमी हिरवं नसायचं. निसर्गचित्रात निसर्ग अमुक एका पद्धतीचाच असायलाच हवा, खरं तर तो असायलाच हवा असं त्याने मानलं नाही.. अनेकांनी नाही मानलं. मॉरिस डेनिस (१८९० साली) म्हणाला होता- ‘पेंटिंग म्हणजे सर्वात आधी सपाट पृष्ठभागावर लावलेला रंग. त्यातले आकार- मग ते प्राणी असतील, झाड असेल किंवा माणसं, निसर्ग.. ते नंतर येतं.’

रामकुमारांनी आपल्या वैविध्यपूर्ण प्रवासांच्या नोंदी चित्रांमध्ये केल्या. त्याला नाव ‘बनारस’ दिलं, तरी त्यात अनेकदा लडाखच्या वैराण, पिवळट तपकिरी भूप्रदेशाच्या खूणा दिसत राहिल्या. आसामच्या जंगलातला हिरवा शेवाळी रंग आला. चित्रांमधला प्रवाही निळेपणा पर्वतमाथ्यांवरच्या आकाशाचा की त्रिभुज प्रदेशाकडे वाहत जाणाऱ्या गंगेच्या पाण्याचा- हे त्यांनाही सांगता येणार नाही. 

रझांच्या प्रवासांच्या नोंदी रंगांमधून अभिव्यक्त झाल्या तेव्हा त्यात रंगांचा आणि भावनांचा आवेग होता, तीव्रता होती, अनुभवांची उष्ण स्पंदने होती, क्षणांची गर्दी होती.

अवचटांच्या या चित्रांमधून भूतकाळात अनुभवलेल्या प्रदेशांमधून प्रवास करत असताना मनात शिल्लक राहिलेले त्या प्रदेशांचे आकार, रंग, जाणिवा यांचा एक दस्तावेज मांडलेला आहे. त्यात वास्तवता आहे, अमूर्तता आहे, आभासी वास्तवता किंवा सर्रिअलिझमही आहे. यातलं प्रत्येक पेंटिंग एक प्रदेश आहे. शुद्ध प्रदेश. त्या, त्या वेळचे रंग आणि आकार यांचे ठसे वागवणारा, मनावरच्या शिल्लक खूणांचा आलेख. लॅन्डस्केप काळाचा आलेख नोंदवण्याकरता वापरलं जाऊ शकतं का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित इथे मिळेल. एका बहुविध व्यक्तिमत्त्वाच्या चित्रकाराच्या सहा-सात दशकांच्या प्रवासाचं हे अनेक तुकडय़ांतलं कोलाज आहे.

या चित्रांमध्ये लिरिकल अ‍ॅब्स्ट्रॅक्शन आहे. रंगांची आणि माध्यमाची निवड यातून ते साधलं गेलेलं आहे. दृश्यांमधली ‘व्हाइब’ शांतवणारी आहे. विक्षिप्त, मनस्वी असा छांदिष्टपणा त्यात आहे. आणि त्याही पलीकडे एक उन्मुक्त भावनिकता आहे, खटय़ाळ बालिशपणा आहे. यात भूतकाळ आहे आणि समकालीनताही आहे.

याआधीची त्यांची चित्रमालिका अंतर्मनात जागलेल्या प्रकाशाची सुवर्णझळाळी दर्शवणारी. गूढ आणि गहिऱ्या देवरायांमधला तो प्रवास अमूर्ततेच्या दिशेने सुरू झालेला होता. जे सांगायचं आहे त्याकरता पारंपरिक आकृत्यांच्या मर्यादा लक्षात येऊ लागल्या की आकार आपोआप विरघळायला लागतात. रंग, रेषा, आकार, अवकाश, प्रकाश यांचा खेळ कागदावर उमटायला लागतो. मनाच्या तळातल्या सुप्त जाणिवा हलक्या हलक्याने वर येऊ लागतात. त्यात स्वत:लाच कधीतरी पडलेल्या प्रश्नांची उत्तरं असतात, काही संवेदनांच्या लकेरी असतात, उत्स्फूर्ततेला दिलेली हाक असते. स्वत:करता केलेल्या निर्मितीतलं अमर्याद स्वातंत्र्य. नेहमीपेक्षा वेगळं माध्यम हाताळण्यातला उत्स्फूर्त, निरागस आनंद. अमूर्ततेच्या वाटेवरचा हा प्रवास चित्रकाराला मुक्त करतो.. स्वत:च्या आत शिरण्याचा मार्ग दाखवतो. सुभाष अवचटांची ही चित्रं एका दीर्घ, व्हायब्रन्ट प्रवासानंतरचा एक अपरिहार्य मुक्काम आहे.. पंथविराम आहे. जिथे शांतता आहे, आनंद आहे, मूलभूत आकारात उमटलेल्या आठवणी आहेत. असंख्य माणसं, प्रदेश, गावं, देश, कला, तत्त्वज्ञान, इतिहास पार करून कदाचित माणूस इथेच येऊन पोहचत असतो.

कोविड साथीमध्ये लॉकडाऊनच्या काळात काढलेली ही चित्रं आहेत. या दीर्घ एकांतवासाला प्रत्येक जण आपापल्या वैशिष्टय़पूर्ण पद्धतीने सामोरा गेला. जिवंत राहण्याकरता प्रत्येकाचा झगडा चालू होता. प्रत्येक जण मिळेल तिथून बळ गोळा करत होता. त्याकरता सर्वात जास्त उपयोगी पडली ती कला.  या काळात अवचटांनी ते वॉटर कलर या  वेगळ्या माध्यमाकडे कसे वळले याबद्दल सांगताना म्हटलं आहे :  ‘‘स्टुडिओत काही कॅनव्हासचे तुकडे शिल्लक होते. पण रंग वाळले होते. दुकानंही बंद होती. मी शोधाशोध सुरू केली. अचानक एक जुनं वॉटर कलरचं पॅड सापडलं आणि चक्क रंगांचा एक बॉक्स हाताशी आला. बहुतेक ते माझ्या नातवाला बर्थ-डे गिफ्ट मिळालं असावं. मला हायसं वाटलं. आता हा लॉकडाऊन राहिला काय अन् नाही राहिला काय, मला काही देणंघेणं उरलं नाही. पण आता प्रश्न हा होता की, छोटय़ा आकारात वॉटर कलरची पेंटिंग्ज करण्यासाठी मानसिकता बदलणे. छोटय़ा ब्रशने छोटय़ा आकारात काम करण्यासाठी प्रथम मला प्रॅक्टिस करावी लागणार होती. परत रंग, कागद वाया घालून चालणार नव्हते. मी जुन्या, पाठकोऱ्या कागदावर काळ्या शाईत काम सुरू केलं. पाणी आणि इंक यांच्या कॉम्बिनेशनमध्ये काही आठवडे गेले आणि मला वॉटर कलरचं थोडं टेक्निक जमलं. पाण्याचा फ्लो, रंगांच्या वापरावर कंट्रोल आणि विषयानुसार त्याचे कम्पोझिशन वगैरे. एका सकाळी मी कागदावर लेमन यलोचा वॉश मारला. तो कागदावर पाण्याबरोबर पसरत गेला आणि अचानक मनात खोल कुठेतरी बा. भ. बोरकर आठवले. ते उन्हात उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर हाच लेमन यलोचा कोवळा, पातळ प्रकाश पसरला होता. ते नाकातल्या नाकात त्यांना आत सुचलेल्या कवितेच्या ओळी गुणगुणत होते. कागदावर जसा लेमन यलो हळुवार पसरत होता, त्यात बाकीबुवांच्या कवितेचे ते गुणगुणणे पसरत निघालेले होते. आठवणी कोठून कधी येतील त्यांचा नेम नसतो.’’

नेमका कुठून आणि कुठे येऊन पोचत असतो चित्रकार? कोणत्या दिशेचा प्रवास असतो त्याचा? त्याच्या अंतर्मनातल्या विचारांचा? त्यालाही नाहीच सांगता येत. आणि अवचटांसारख्या शब्द-चित्रांच्या भिन्न माध्यमांमधून अखंड फिरस्ती करत असलेल्या कलावंताकरता तर या प्रवासाचे टप्पे जाणीवपूर्वक नोंदवणं केवळ जटील आणि अशक्यच. पण त्या नोंदी झालेल्या असतात. प्रत्येक मुक्कामाची, प्रवाही वाटांची, निसटत्या वळणांची अलिखित नोंद अंतर्मनाने घेऊन ठेवलेली असते. कलाकाराच्या बाबतीत कधी ना कधी त्या अभिव्यक्त होतातच. अवचटांकडे त्याकरता शब्द आणि रंग दोन्ही आहेत.

बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा हा चित्रकार आहे. शब्द आणि चित्र दोन्ही माध्यमांवर विलक्षण हुकूमत असणारा. दोन्ही माध्यमांमधून तितक्याच समर्थपणे व्यक्त होऊ शकणारा. साहित्यिक आणि चित्रकार या दोन्ही रूपांमध्ये खुलून दिसणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व. आपल्या बहुढंगी आयुष्यातले असंख्य अनुभव, केलेले प्रवास, भेटलेली माणसं, त्यांची व्यक्तिमत्त्वं, चेहरे त्यांनी रंगांमधून कॅनव्हासवर आणि शब्दांमधून साहित्यात वेळोवेळी उलगडून दाखवले. त्यांना मुळातच हे असं शेअर करणं, स्मरणरंजन, नॉस्टेल्जियात रमणं मनापासून आवडतं. आनंदाने, उत्साहात, मजेत ते आपल्या आठवणी- मग त्या माणसांच्या असोत, प्रवासाच्या, घरांच्या, स्वभावांच्या, अनुभवांच्या- सांगत असतात. त्यांचा तो संवाद असतो.

पुढचा मुक्काम, अंतिम ठिकाण संपूर्ण अमूर्तता हाच असेल का, माहीत नाही. चित्रकाराला स्वत:लाही ते सांगता येत नसतं. पण त्या दिशेच्या वाटेवरचे हे मुक्काम न्याहाळण्याचा अनुभव नितांतसुंदर आहे, हे निश्चित.

‘The past is never dead.  It’s not even past.’  – William Faulkner,  Requiem for a Nun sharmilaphadke@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paintings by subhash awchat watercolor paintings by subhash awchat subhash awchat paintings exhibition zws