कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. सात वर्षाच्या या चिमुरड्याचं अपहरण कऱण्यात आलं होतं. अपहरण केल्यानंतर त्याची हत्या करुन मृतदेह एका घराच्या मागे फेकून देण्यात आला. मृतदेहावर हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोल्हापूरमधील कापशीमध्ये हा प्रकार घडला असून एकच खळबळ माजली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरव केशव केशरे असं या सात वर्षाच्या चिमुरड्याचं नाव आहे. घराबाहेर खेळत असताना दोन दिवसांपूर्वी आरवचं अपहरण झालं होतं. यानंतर पोलिसांसोबतच गावकऱ्यांकडून आरवचा शोध घेतला जात होता. मात्र त्याचा शोध लागत नव्हता. त्यानंतर मंगळवारी पहाटे सहा वाजता गावापासून दूर असणाऱ्या एका जुन्या घराच्या मागे आरवचा मृतदेह सापडला. यावेळी त्याच्या शरीरावर हळद कुंकू लावलेलं होतं. यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा अशी शक्यता गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर : अपहरण करून मुलाचा खून, नरबळी शक्यता; आरोपी ताब्यात!

शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावातील या घटनेमुळे परिसर हादरला असून अनिसकडून निषेध करण्यात येत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

कोल्हापुरात अपहरण करून मुलाचा खून, नरबळी शक्यता


गेल्या महिन्यात बालकाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार कागल तालुक्यात घडला होता. मुरगूड येथील या बालकाचे अपहरण झाले होते. विशेष म्हणजे मित्राच्या मुलाचेच अपहरण करून खून केल्याची माहिती समोर आली होती. वरद रवींद्र पाटील असे या खून झालेल्या मुलाचे नाव होते. तर, याप्रकरणी पोलिसांनी मारुती वैद्य या आरोपीला ताब्यात घेतले होते.

कागल तालुक्यातील सोनाळी गावात डॉ. रवींद्र पाटील हे राहतात. त्यांचा मुलगा आजोबांच्या घरी वास्तुशांती समारंभासाठी चार दिवसापूर्वी सावर्डे बुद्रुक या गावी गेला होता. कार्यक्रम संपल्यावर १७ ऑगस्टपासून तो बेपत्ता होता. त्याचे अपहरण झाल्याची फिर्याद वडिलांनी कागल तालुक्यातील मुरगूड पोलिस ठाण्यात दिली होती. तसेच चार दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. कागल, कोल्हापूर जिल्हा तसेच कर्नाटकातही याचा शोध घेतला गेला पण तो आढळला नाही. यानंतर सावर्डे बुद्रुक येथील तलावात त्याचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्याच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्याने, त्याचा खून करून मृतदेह तलावात टाकला असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A dead body of seven year old found in kolhapur sgy