महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आजही बालविवाह केले जातात. उमलत्या वयात मुलींच्या हाती संसाराची दोरी देऊन त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. पण महाराष्ट्रातील एका उपक्रमामुळे आणि वर्गमित्रांच्या सजगतेमुळे १२ बालविवाह रोखण्यास मदत झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे घडलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यानंतर मे महिन्यात सर्वांचे निकाल जाहीर झाले. विद्यार्थ्यांची प्रगती नोंदवणारं प्रगती पुस्तक प्रत्येकाच्या हातात आलं. यावेळी या प्रगती पुस्तकावर चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आले होते. बालविवाहसारख्या प्रथा रोखण्यासाठी सरकार पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजनेचा भाग म्हणून प्रगती पुस्तकावर चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहेत. याच हेल्पलाईन क्रमांकाला फोन करून तब्बल १२ बालविवाह रोखण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलींचे बालविवाह होत होते, त्या मुलींच्या वर्गमैत्रिणींनी आणि वर्गमित्रांनीच चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून हे बालविवाह रोखले. १०९८ आणि ११२ हे चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक आहेत. या क्रमांकावर फोन केल्यास पीडित आणि घटनेची माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Classmates help prevent 12 child marriages through helpline number on report cards sgk
First published on: 26-05-2024 at 12:13 IST