पशाचा पाऊसप्रकरणी दापोली पोलिसांनी रविवारी चिपळूण येथून दोन संशयितांना अटक केली असून त्यामुळे हे सेक्स रॅकेट संपूर्ण जिल्ह्य़ात पसरले असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहे. शैलेशकुमार लकडे आणि मंगेश साळुंखे (दोन्ही रा. चिपळूण) अशी या दोघांची नावे असून दोघेही विशीतील तरुण आहेत. या दोघांनाही पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
यापूर्वी याप्रकरणी संगीता नार्वेकर, पूजा वडार आणि गणेशप्रसाद सक्सेना या तिघांना दापोलीत अटक करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी हे प्रकरण अंधश्रद्धेशी निगडित नसून त्यामागे सेक्स रॅकेट असल्याचे निष्पन्न झाले होते. न्यायालयात तीन अत्याचारग्रस्त युवतींनी साक्ष दिल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली होती. यासाठी दापोली पोलिसांनी तपासात उल्लेखनीय कामगिरी केली. रविवारी चिपळूण येथून दोन जणांना संध्याकाळी दापोलीत आणले गेले. हे दोघेही मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता असून त्यांच्या अटकेने महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, रविवारी पोलिसांनी या दोन्ही संशयित आरोपींच्या नावाबाबत गुप्तता ठेवली होती आणि सोमवारी न्यायालयासमोर हजर करतानाही त्यांच्या तोंडावर फडका बांधण्यात आला होता. तपासकामात अडचणी येऊ न देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dapoli sex scandal two suspected arrested from chiplun