Dhananjay Munde on Namdev Shastri Maharaj : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्याभोवती आरोपांचे चक्र तयार झाले होते. या चक्राला आता जवळपास ५३ दिवस झालेत. या प्रकरणी त्यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर आला. परंतु, महायुती सरकारने त्यांच्या राजीनाम्याबाबत अद्यापही ब्र काढलेला नाही. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली. रात्रभर त्यांच्याकडे मुक्काम केला. आज सकाळीच नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवला आहे. यानंतर आता धनंजय मुंडे यांनीही भगवान गडाचे आणि नामदेव शास्त्री यांचे आभार मानले. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या मुक्कामाविषयीही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनंजय मुंडे म्हणाले, “न्यायाचार्य बाबांनी मुलाखतीत सांगितलं की हा गड माझ्यासारख्या अतिशय सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा आहे, याच्यासारखी ताकद आणि शक्ती आणि बाबांचा विश्वास माझ्या पाठिमागे उभा करणं ही फार मोठी जबाबदारी आहे. हा गड गरिबातल्या गरिब माणसाच्या एक एक रुपयांतून मोठा झालेला गड आहे. त्यामुळे त्यांना ऐश्वर्यासंपन्न म्हटलं जातं. असा गड माझ्या संकटाच्या काळात उभा आहे. ही माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे. इतकी मोठी शक्ती आहे की, त्याचं शब्दांत वर्णन करता येणार नाही.”

मुंबईला जाण्याआधी भगवान गडाचं दर्शन घेतलं

“हे संकट आज आलेलं नाही. ५३ दिवसांपासून आपण पाहताय इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियावरून मला टार्गेट करून मीडिया ट्रायल चालवलं जातंय. मी त्यात कोठेही एकही अवाक्षर बोललेलो नाही. संकट ५३ दिवसांचं होतं, मी इथे कधीही आलो असतो. पण मी त्या भावनेने येथे आलेलो नाही. तर मी मंत्री झालो आहे. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर भगवान गडाचं दर्शन घेतलं नव्हतं. आता मुंबईला जाण्याआधी त्यांचं दर्शन घेतलं”, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं.

ज्ञानेश्वरीचे अनुभव ऐकल्यानंतर जगण्यासाठी बळ मिळतं

मुक्कामकाळात डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी काय चर्चा झाली, यावर धनंजय मुंडे म्हणाले, “बाबा राजकीय चर्चा करत नाही, मीही त्यांच्याशी राजकीय चर्चा केली नाही. आमच्यात अध्यात्मिक चर्चा झाली. त्यांनी ज्ञानेश्वारीचे अनुभव सांगितले. ते ऐकल्यानंतर त्यातून आपल्याला काहीतरी मिळतं. ते जीवन जगण्यासाठी स्वतःसाठी आणि लाखो लोकांचं जीवन समृद्ध करण्याकरता त्याचा फायदा होतो.”

धनंजय मुंडे भगवान गडचे पुत्र?

“न्यायाचार्य बाबांनी पंकजा मुंडेंना या गडाची कन्या ठरवलं आहे. मी या गडाचा निस्सिम भक्त आहे. संत भगवान बाबाचा मी निस्सिम भक्त आहे. शास्त्रीबाबांचा मी निस्सिम भक्त आहे. अशा ठिकाणी जिथे कायम श्रद्धा असते, आपण श्रद्धेने गेल्यानंतर आपल्या पाठिमागे ऊर्जा मिळते, असा गड पाठीमागे उभा राहतो, तेव्हा स्वाभाविक आपल्यामागे विश्वास निर्माण होतो”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde reaction on namdev shastri maharaj over his support in santosh deshmukh murder case sgk