अलिबागपासून जवळच नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलाने आता मोकळा श्वास घेतला असून गेली अनेक वष्रे वापराविना असलेल्या या संकुलाचा वापर सुरू झाला आहे. येथील विविध क्रीडाविषयक सुविधा खेळाडू, विद्यार्थी व नागरिकांसाठी दिनांक १ जूनपासून खुल्या करण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
अलिबाग तालुक्यातील नेहुली येथे असलेल्या रायगड जिल्हा क्रीडासंकुलाचे गेल्या वर्षी जून महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. अपूर्णावस्थेत असलेले हे संकुल वापराविना पडून होते. मदानात रान वाढले होते. महादेव कसगावडे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतच संकुलाच्या साफसफाईची मोहीम सुरू केली. रायगडच्या जिल्हाधिकारी तथा क्रीडासंकुल समितीच्या अध्यक्ष शीतल तेली-उगले यांनी संकुलातच समितीची बठक घेतली. त्यामुळे संकुलाच्या साफसफाईच्या कामाला गती आली. क्रीडासंकुल आता स्वच्छ झाले आहे. खेळाडू त्याचा वापर करू लागले आहेत. या संकुलातील सुविधा सकाळ व सायंकाळ या सत्रामध्ये असून, सकाळी ६ ते १० व सायंकाळी ४ ते ७ या वेळेमध्ये सरावासाठी, खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्यांना मासिक, त्रमासिक, सहामाही किंवा वार्षकि अशा पद्धतीचे सभासदत्व देण्यात येणार आहे.या सुविधांमध्ये संकुलातील बॅडिमटन, टेबल टेनिस, फिटनेस सेंटर (जिम) जलतरण तलाव व टेनिस आदींचा समावेश आहे.
विविध सुविधा व सवलती
१० एकर परिसर असलेल्या या क्रीडा संकुलात बहुउद्देशीय हॉल, फिटनेस सेंटर (जिम) बास्केटबॉल कोर्ट व ८० बेडच्या वसतिगृहाची उभारणी तसेच विविध खेळांची मदाने, ४०० मीटर धावमार्ग, जलतरण तलाव, टेनिस कोर्ट इत्यादी सुविधा तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जलतरण, जिम व बॅडिमटन, जलतरण व जिम, जलतरण व बॅडिमटन, टेनिस व जलतरण, जिम व टेनिस, टेनिस, जलतरण, जिम अशा पद्धतीने एका वेळेस विविध सुविधांचा वापर करू इच्छिणाऱ्या सभासदांना या सुविधा विविध सवलतींसह देण्याचाही निर्णय घेतलेला आहे.
यासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडू, विद्यार्थी, नागरिकांनी प्रवेश अर्ज व प्रवेश शुल्क तसेच इतर अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली-अलिबाग येथे संपर्क साधावा.
प्रथम येणाऱ्या व्यक्तींना प्रथम याप्रमाणे सध्या प्रवेश देण्यात येणार असून प्रत्येक सुविधेसाठी एक तासाच्या बॅचमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याने प्रत्येक बॅचमध्ये मर्यादित प्रवेश देण्यात येणार आहे.
खेळाडू, विद्यार्थी व इतर नागरिकांसाठी जिल्हा क्रीडा संकुलात निर्माण केलेल्या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व क्रीडा संकुल समितीच्या अध्यक्षा शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facilities open in raigad district sports complex