चार हजार फायली जळाल्या, कागदाचा चिटोराही वाचला नाही

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयास लागलेल्या आगीत सर्व दस्तावेज, फíनचर, दरवाजे, खिडक्या जळून खाक झाल्या. मंगळवारी मध्यरात्रीनंतर ही आग लागली. पहाटेच्या सुमारास अग्निशमन दलाने ती विझवली. कार्यालयातील सर्व चीजवस्तूंची राखरांगोळी झाली. सहकार क्षेत्रातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे, फायली, न्यायप्रवीष्ट प्रकरणे असे सगळेच या आगीत खाक झाले. एक चिटोराही शिल्लक राहिला नाही.

जिल्हा उपनिबंधक कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात आता पीपल्स बँकेत स्थलांतरित करण्यात आले आहे. महत्त्वाची कागदपत्रे आगीत जळाल्याने सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या कारवाया आणि दस्तावेजांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता न्यायप्रवीष्ट असलेल्या प्रकरणांचे काय होणार आणि न्यायालयाने काही कागदपत्रांची विचारणा केलीच तर जिल्हा उपनिबंधक कार्यालय काय सादर करणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाजी पुतळ्याजवळ भू-विकास बँकेच्या इमारतीत वरच्या मजल्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालय आहे. या कार्यालयात जिल्ह्य़ातील सहकारी बँका व संस्थांच्या घोटाळ्यांची महत्त्वपूर्ण कागदपत्रे होती. काही घोटाळ्यांची चौकशी चालू होती. घोटाळे लपविण्यासाठीच कोणी तरी कार्यालयाला आग लावली असावी, असा तर्क लढविला जात आहे. ही आग शॉर्टसर्किटनेच लागल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आगीत एकही कागद शिल्लक राहिलेला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

पहाटे तीन-चारच्या सुमारास आग पसरत गेल्याने कार्यालयातील सभागृह, जिल्हा उपनिबंधकांचा कक्ष, अभिलेखा कक्ष आणि कागदपत्रांच्या सर्व फायली जळून खाक झाल्या. पहाटे पाचच्या सुमारास रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आग लागल्याचे पाहिले. तत्काळ त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले.

अग्निशामक बंबाने पाणी मारुन आगीवर नियंत्रण मिळवले, तरी तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका, सहकारी संस्थेची महत्त्वपूर्ण कागदपत्रे, कार्यालयातील टेबल, खुच्र्या, संगणक, छताला लटकलेले पंखे, कार्यालयाचा दरवाजा, खिडक्या जळून खाक झाल्या.

या घटनेची चौकशी नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस जमादार मुळे करीत आहेत. आगीचे कारण गुलदस्त्यात आहे. आगीची सखोल चौकशी करून दोषीला शासन झाले पाहिजे, अशी मागणी आहे.

कार्यालयाचे परिपत्रक

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने परिपत्रक काढले असून, सर्व तालुकास्थानी असलेल्या कार्यालयांना त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची झेरॉक्सप्रत मागविण्यात येत आहे. याच पद्धतीने दोन-तीन महिन्यांत फायली गोळा केल्या जातील. पण जी कागदपत्रे केवळ याच कार्यालयाशी संबंधित आहेत, अशी कागदपत्रे कुठून मिळवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आगीत किमान चार हजार फायली जळून खाक झाल्याची माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire in parbhani district registration offices