परभणी : शहरातील साखला प्लॉट भागातील सराईत आरोपी ताडीवाला अशोक मारोतराव शिंदे याला एमपीडीए कायद्यांतर्गत जिल्हा मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. आरोपीवर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दाखल केलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मान्यता दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ए.एम. पठाण यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. सराईत आरोपी ताडीवाला अशोक मारोतराव शिंदे हा त्याच्या राहत्या घरी बेकायदेशीररित्या विषारी ताडी निर्मिती करत होता. सराईतपणे तो बेकायदेशीरकृत्य करत होता. त्याच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेकदा गुन्हे दाखल केले आहेत.

संबंधिताकडून चांगल्या वर्तवणुकीचे बंधपत्र देखील घेतले होते. मात्र त्याचे गुन्हेगारी कृत्य कमी होत नव्हते म्हणून त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी या बाबत दुय्यम निरीक्षक ए. एम. पठाण यानी आधीक्षक गणेश पाटील यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून अशोक शिंदे याला छत्रपती संभाजी नगर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpda accused parbhani the district collector passed order ssb