भारताला १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती असं वक्तव्य करुन वाद निर्माण करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. कंगनाने यावेळी महात्मा गांधींवर निशाणा साधला असून सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना त्यांच्याकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य नाही असं म्हणत अहिंसेची खिल्ली उडवली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामला काही पोस्ट शेअर केल्या असून आपले हिरो निवडताना विचार करा असा सल्ला दिला आहे. तसंच महात्मा गांधींना सत्तेची भूक होती असंही म्हटलं आहे. यावरुनच मलिकांनी कंगनाला सुनावलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंगनाच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले, “ज्या प्रकारे कंगना रणौतने महात्मा गांधींजींविषयी भाष्य केलं आहे, त्यावरुन मला असं वाटतं की सुनियोजितपणे देशात पंडित नेहरु, महात्मा गांधी तसंच स्वातंत्र्यसैनिकांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे. लोकांना चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. त्याप्रमाणेच कंगनाने वक्तव्य केलं आहे. पण आपल्याला हे समजायला हवं की बापू एक व्यक्ती नाहीत तर विचार आहेत. बापूंची हत्या केली असली तरी विचार नष्ट करता येणार नाहीत. त्यांच्या हत्येचा कट रचणारे लोकही त्यांचे विचार कधीच संपवू शकणार नाहीत. आम्हाला वाटतं महात्मा गांधींबद्दल केली जाणारी ही विधानं देश, जग स्वीकारणार नाही. हिंसेने प्रश्न सुटत नाही. हिंसेने जमीन बळकावता येते पण लोकांची मनं जिकता येत नाहीत. जगभरात अनेक लोकांच्या हृदयापर्यंत बापूंचे विचार पोहोचलेले आहेत हे कळायला हवं”.


काय म्हणाली होते कंगना रणौत?

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ‘गांधी आणि इतर नेताजींना सोपवण्यास तयार झाले होते’ अशी या बातमीची हेडलाइन आहे. या रिपोर्टमध्ये महात्मा गांधींसोबत जवाहरलाल नेहरु तसंच मोहम्मद अली जिन्ना यांनी एका ब्रिटीश न्यायाधीशांसोबत सुभाषचंद्र बोस देशात आल्यानंतर त्यांना सोपवण्यात येईल असा करार केल्याचा दावा आहे.

‘तुम्ही गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक, तुम्ही दोन्ही भूमिका घेऊ शकत नाही. निवडा आणि निर्णय घ्या’ असं या बातमीवर लिहिण्यात आलं आहे.

स्वातंत्र्यसैनिकांना त्या लोकांनी ब्रिटीशांच्या हवाली केलं ज्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत नव्हती, मात्र सत्तेची भूक होती असंही कंगनाने म्हटलं आहे. पुढे बोलताना कंगनाने महात्मा गांधींवर निशाणा साधत म्हटलं आहे की, “हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा आणि अशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी शिकवण दिली. अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते. आपले हिरो हुशारीने निवडा”.

“महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंग यांना फाशी व्हावी अशी महात्मा गांधींची इच्छा होती असे काही पुरावे दर्शवतात. त्यामुळे तुम्ही तुमचे हिरो योग्यपणे निवडले पाहिजे. कारण या सर्वांना तुमच्या आठवणींच्या एकाच बॉक्समध्ये ठेवणं आणि प्रत्येक वर्षी जयंतीला शुभेच्छा देणं पुरेसं नसून खरंतर मूर्खपणा, बेजबाबदारपणा आहे. प्रत्येकाला आपला इतिहास आणि आपले हिरो माहिती असायला हवेत”, असंही कंगनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawab malik on kangana ranaut statement on mahatma gandhi vsk