‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंतेद्र आव्हाड यांना अलीकडेच ठाणे पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी आव्हाडांची जामिनावर सुटका झाली. सुटकेनंतर आव्हाडांनी सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले. माझ्यावर कठोर कारवाई करावी, म्हणून चाणक्याकडून पोलिसांवर दबाव टाकला जात होता, पोलिसांना फोन केला जात होता, असा आरोप त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आरोपानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. आव्हाडांनी उल्लेख केलेला चाणक्य आपणच आहोत, असा त्यांचा माझ्यावर रोख असेल तर मी त्यांचे आभार मानतो. कारण चाणक्य हा राजकारणातला चांगला माणूस होता, असं विधान म्हस्के यांनी केलं आहे.

हेही वाचा- “…त्यांना बकबक करावी लागते” मुख्यमंत्र्यांसमोरच आव्हाडांची श्रीकांत शिंदे यांच्याशी शाब्दिक चकमक

या घडामोडीनंतर जितेंद्र आव्हाडांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सतर्क केलं आहे. “चाणक्य नाही शकुनीमामा… शिंदेसाहेब सावध राहा” अशी फेसबूक पोस्ट जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. विशेष म्हणजे आज जितेंद्र आव्हाडांनी नरेश म्हस्के यांचा उल्लेख ‘शकुनीमामा’ असा केला होता. नरेश म्हस्के हे चाणक्य नव्हे तर शकुनीमामा आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर नुकतंच केलेल्या फेसबूक पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

आव्हाडांनी नरेश म्हस्के यांच्यावर नेमकी काय टीका केली?
म्हस्के यांच्यावर टीका करताना आव्हाड म्हणाले, “नरेश म्हस्के हा चाणक्य नव्हे तर शकुनीमामाची औलाद आहे. मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की, नरेश म्हस्के आमदार नाहीत, ते मंत्रिमंडळात कधी आले नाहीत, विधानसभेचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. विधानपरिषदेचं सदस्यत्व देणार म्हणून त्यांना केवळ चॉकलेट दाखवण्यात आलं आहे. असं असूनही हा माणूस टीव्हीवर उघडपणे म्हणतो, ‘आता बघा जितेंद्र आव्हाड किती दिवस तुरुंगात बसतात’, ते असं विधान कसं करू शकतात, याची स्पष्टता मला सरकारकडून हवी आहे” अशी मागणी आव्हाडांनी केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader jitendra awhad alert cm eknath shinde facebook post naresh mhaske rmm