मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्य़ातील घनसौरमध्ये राहणाऱ्या एका चार वर्षीय चिमुरडीवर अमानुष बलात्काराची संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर तिला रविवारी रात्री नागपुरात एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. या चिमुरडची प्रकृती अतिशय चिंताजनक असून तिला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले असल्याचे तिच्यावर उपचार करणारे डॉ. अशोक टांक यांनी पत्रकारांना सांगितले.
राजधानी दिल्लीतील चिमुरडीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने सारा देश हादरला असताना मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्य़ातील घनसौर या छोटय़ा गावात चार वर्षच्या चिमुरडीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याचे उघडकीस आले.  या चिमुरडीला सिवनीमधून जबलपूरला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिची प्रकृती अचानक खालावल्याने रविवारी रात्री उशिरा रात्री विमानाने नागपुरात आणल्यानंतर केअर रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. रविवारी रात्रीपासून तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून प्रकृती गंभीर आहे.
चिमुरडीवर उपचार करणारे डॉ. अशोक टांक यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार गेल्या १८ एप्रिलला घनसौरमध्ये ही घटना उघडकीस आल्यानंतर सिवनी आणि त्यानंतर जबलपूरमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक झाल्यावर तिला जबलपूरवरून रविवारी रात्री एअर अँब्युलन्सने नागपुरात आणावे लागले. रविवारी रात्रीपासून तिच्या एमआरआय, सीटी स्कॅनसह अन्य तपासण्या करण्यात आल्या आहेत. तिच्या हृदयाची गती कमी झाली आणि मेंदूला ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे प्रकृती अतिशय गंभीर असून तिला वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहे. या चिमुरडीवर सात डॉक्टरांची चमू लक्ष ठेवून आहेत. ज्या कक्षात तिला ठेवण्यात आले आहे त्या ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नाही. मुलीची आई, आजी आणि मामा तिच्या सोबत आले असून मध्यप्रदेश प्रशासनातील अधिकारी आणि पालकमंत्री रुग्णालयाच्या संपर्कात असल्याचे डॉ. टांक यांनी सांगितले.
राज्य सरकार हादरले
दिल्लीनंतर मध्यप्रदेशमधील सिवनी जिल्ह्य़ात घडलेल्या या घटनेने सारा देश हादरला असून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह विविध पक्षांचे राजकीय नेते रुग्णालयाच्या संपर्कात आहे. मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री नाना मोहोड,अध्यक्ष नरेश दिवाकर नागपुरात तळ ठोकून आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्या सकाळी नागपुरात येण्याची शक्यता रुग्णालयाने व्यक्त केली.
मुलीचे मामा शाम यादव यांच्याशी संवाद साधला त्यांनी सांगितले, चिमुरडीचे आई-वडील मोलमजुरी करतात. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा असून ही  सर्वात लहान कन्या आहे. बुधवारी सायंकाळपासून ही चिमुरडी घरातून गायब झाल्यामुळे सगळीकडे शोधाशोध केली मात्र कुठेच दिसली नाही त्यामुळे घनसौर पोलीस ठाण्यात तक्रार केली.
 दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी घनसौरजवळील स्मशानघाटाजवळ ती सापडली. पोलिसांनी तिला लगेच घनसौरमधील रुग्णालयात दाखल केल्यावर प्रकृती गंभीर असल्यामुळे सिवनीला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर सिवनीमधून जबलपूरमधील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मध्यप्रदेश सरकारने या घटनेची दखल शिक्षणमंत्री नामा मोहोड आणि भारतीय जनता पक्षाचे मध्यप्रदेशचे अध्यक्ष नरेश दिवाकर यांच्या मदतीने रविवारी रात्री नागपुरात आणण्यात आले आहे. मुलीची आई आणि आजी सोबत असून ते काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raped victim small girl still in critical condition