दापोली : खेड तळे मार्गावर गुरुवारी कारच्या धडकेत ठार झालेल्या २१ वर्षे प्रदीप ढेबे या दुचाकी स्वाराचा मृतदेह रस्त्याअभावी ग्रामस्थांनी दीड किलोमीटर हातातून घेऊन जावा लागला. त्यामुळे त्या मृतदेहाला मरणानंतरही यातना सहन कराव्या लागल्या. प्रदीप प्रकाश ढेबे (वय २१) रा.वावे-धनगर वाडी या दुचाकीस्वाराचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेनजीक घडला.
तळे-देऊळवाडी येथून प्रदीप ढेबे खेडच्या दिशेने येत होता. याचदरम्यान तळेच्या दिशेने जाणाऱ्या कारने धडक दिल्यानंतर तो रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीवर जावून आदळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
प्रदीप ढेबे याच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले. मात्र त्यानंतर शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका करण्यात आली. परंतु ही रुग्णवाहिका किंजळे तर्फे नातू कळकरायवाडी या ठिकाणी येऊन थांबली. त्यानंतर पुढील मार्ग खराब असल्याने पायी जाण्याशिवाय पर्याय नसल्याने अखेर ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह हातात घेऊन तब्बल दीड किलोमीटर पायपीट करत न्यावा लागला. मात्र रस्त्याअभावी येथील ग्रामस्थांना नेहमीच पायपीट करावी लागत आहे. मागील दोन वर्षांपासून या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. याबाबत ग्रामस्थांना विचारणा केले असता त्यांनी सांगितलं की, जमीन मालकांनी विरोध केल्यामुळे हे काम रखडलेले असून येथील नागरिकांना स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही रस्त्यासाठी न्याय मागावा लागत आहे.
हेही वाचा – धाराशिव : जिल्ह्यात किती कंपन्यांच्या किती पवनचक्की? जिल्हा प्रशासनच अनभिज्ञ
प्रदीप याच्या मृत्यूपूर्वी आठ दिवसांपूर्वी याच गावतील एका महिलेला सर्पदंश झाल्यामुळे त्यांनाही उचलून झोळीमधून कळकरायवाडी या ठिकाणी आणावे लागले. त्यानंतर पुढील उपचारासाठी न्यावे लागले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने किंजळे तर्फे नातू कळकरायवाडी ते धनगरवाडी तसेच वावे तर्फे नातू गायकर वाडी ते ढेबेवाडी हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करून धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती ग्रामस्थांनी केलेली आहे.
© The Indian Express (P) Ltd