उमरगा तहसील कार्यालयातील अव्वल कारकून एम. एल. कोंडेकर यांचे रविवारी रक्तदाब वाढल्याने निधन झाले. बठकीत धमकीवरूनच कोंडेकर यांनी धसका घेतला व त्यातच त्यांचे निधन झाल्याचा आरोप करून जिल्हा महसूल व तलाठी कर्मचारी संघटनेने मंगळवारी लेखणी बंद आंदोलन पुकारले.
संघटनेने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोंडेकर यांचे रविवारी निधन झाले. तत्पूर्वी ६ मे रोजी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी उमरगा तहसील कार्यालयात अचानक बठक घेतली. या बठकीत कोंडेकर यांना नोकरीतून बडतर्फ करण्याची धमकी देण्यात आली. त्याचा धसका घेतलेल्या कोंडेकर यांची प्रकृती बिघडून त्यांचा रक्तदाब वाढला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जिल्ह्यात सर्व संवर्गातील कर्मचारी आपापले कर्तव्य उत्कृष्ट पार पाडत आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र निवडणुकीचे कामकाज केले. त्यामुळे त्या कालावधीतील सज्जांच्या ठिकाणचे काम प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. ही बाब समजून घेणे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहे. कर्मचाऱ्यांना कामकाजाबद्दल ताण देणे सयुक्तिक ठरणार नाही. कोंडेकर यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करेपर्यंत लेखणी बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही महसूल संघटनेच्या वतीने निवेदनात दिला आहे.
या बरोबरच महसुलेतर कामासाठी सरकारला पाठपुरावा करून अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावेत, कार्यालयीन वेळेतच कामकाज सांगावे, कर्मचाऱ्यास त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्तीच्या कामाचा ताण देऊ नये, कर्मचाऱ्यांशी चांगले संभाषण करावे, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना अवैध गौण खनिज उत्खननासाठी पुरेसे पोलीस संरक्षण द्यावे, निलंबित कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ सेवेत सामावून घ्यावे, सार्वजनिक सुटीच्या दिवशी कोणत्याच बठका, प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येऊ नये, आदी मागण्याही निवेदनात आहेत. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष जीवन कुलकर्णी, कार्याध्यक्ष चंद्रकांत िशदे, सरचिटणीस सचिन पाटील, नितीन मंडळे, संभाजी चौरे, गोपाळ आकोसकर, महादेव िशदे आदींच्या सहय़ा आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revenue workers pen closed agitate