भोंदू डॉक्टर संतोष पोळ याने पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे त्याने खून केलेल्या वनिता गायकवाड या महिलेच्या मृतदेहाचे अवशेष शुक्रवारी दुपारी त्याच्या शेतघराजवळ खोदकाम केल्यावर सापडले. संतोष पोळने याआधी वनिता गायकवाड यांचा मृतदेह कृष्णा नदीत टाकून दिल्याचे पोलिसांना सांगितले होते. पण नंतर त्याने हा मृतदेह पाण्यात टाकला नसून, तो धोम येथील शेतघराजवळच पुरल्याचे म्हटले होते. वनिता गायकवाड यांचा मृतदेह कुठे पुरला याची जागाही त्याने पोलिसांना दाखवली. त्यानंतर पोलिसांनी तिथे खोदण्यास शुक्रवारी सकाळी सुरुवात केली. खोदल्यानंतर घटनास्थळी साडीचे तुकडे आणि हाडांचे अवशेष आढळल्याची माहिती साताऱ्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी दिली. संतोष पोळने २००६ मध्ये वनिता गायकवाड यांचा खून करून त्यांचा मृतदेह पुरला होता. दरम्यान, संतोष पोळ याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला शुक्रवारी वाई न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत २५ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.
खुनी संतोष पोळचे बनावट नोटांच्या रॅकेटचे गौडबंगाल?
अनैतिक संबंध आणि पैशाच्या मोहातून सातारा जिल्ह्य़ातील वाईनजीक धोम गावात संतोष पोळ या भोंदू डॉक्टरने गेल्या १३ वर्षांत तब्बल सहा खून केल्याचे गेल्या मंगळवारी उघड झाले. अंगणवाडी सेविका मंगला जेधे हत्याकांडाचा छडा लावताना पोळचे हे अमानुष कृत्य उघड झाले. मंगला जेधेसह आजवर चार अन्य महिलांची हत्या करून त्यांचे मृतदेह आपल्याच शेतघराच्या आवारात त्याने पुरले होते तर एका पुरुषाचा मृतदेह नदीत सोडून दिला होता. कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना डॉक्टर म्हणून वावरणाऱ्या पोळने अतिजहाल औषध देऊन हे खून केल्याची कबुली दिली. त्याने पुरलेले पाचही मृतदेह पोलिसांनी हस्तगत केले आहेत. यावेळी त्याने वनिता गायकवाड यांचा मृतदेह कृष्णा नदीत टाकून दिल्याचे सांगितले होते. पण पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने तोही मृतदेह शेतघरातच पुरल्याचे सांगितले. पोळने १५ मे २००३ ते जून २०१६ या दरम्यान सर्व खून केले आहेत. सुरेखा चिकणे, वनिता गायकवाड, गजाबाई पोळ, सलमा शेख आणि मंगला जेधे या पाच महिलांचा आणि नथमल धनाजी भंडारी या पुरुषाचा पोळने आतापर्यंत खून केला आहे. पोळने आणखीही काही लोकांचा खून केला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, पोलीत त्यादृष्टीने तपास करीत आहेत.
संतोष पोळची बँक खाती गोठवली
२००३ मध्ये संतोष पोळ याने सुरेखा चिकणे यांचा खून करून त्यांचा मृतदेह शेतघराजवळच पुरला होता. त्या जागेपासून अगदी दहा फूट अंतरावर त्याने २००६ साली वनिता गायकवाड यांचाही मृतदेह पुरल्याचे तपासात आढळले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serial killer santosh pol gives new information about vanita gaikwads murder