मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज सकाळी सभा पार पडली. पुण्यात होणाऱ्या या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला होता. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी दौरा रद्द केल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावरुन आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ज्या दिवशी आपण लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली त्यानंतर पुण्यामध्ये अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर अयोध्येला येऊ देणार नाही हे प्रकरण सुरु झाले. मी हे पाहत होतो. मला उत्तर प्रदेशातूनही माहिती मिळाली. एक वेळ अशी आली की मला समजले की हा सापळा आहे आणि यामध्ये अडकले नाही पाहिजे. या सर्व गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. ज्यांना माझी अयोध्यावारी खुपली त्यांनी सगळ्यांनी मिळून हा आराखडा आखला,” असे राज ठाकरे म्हणाले.

“मला रामजन्मभूमीचे दर्शन घ्यायचे होतेच पण जिथे कारसेवकांना मारले गेले तिथल्या जागेचेही दर्शन घ्यायचे होते. राजकारणामध्ये अनेकांना भावना समजत नाही. मी हट्टाने ठरवले असते तर महाराष्ट्रातून हजारो मनसैनिक अयोध्येला आले असते. तिथे जर काही झाले असते तर तुमच्यावर गुन्हे दाखल झाले असते. ऐन निवडणुकीच्या वेळी हे काढले असते आणि इथे त्यावेळी कोणीच नसते. हा सगळा सापळा होता. एक खासदार उठून मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो हे शक्य आहे का?” असा सवाल राज ठाकरेंनी केला.

त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.“पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आंदोलन करून जेलमध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपून बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला,” असे दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भोंग्यांचं आंदोलन एका दिवसाचं नाही. या गोष्टीला सातत्य नसेल, तर पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू होणार. ते फक्त तुम्हाला तपासत आहेत. हे विसरले, की हळूहळू आवाज वर यायला सुरू होणार. आत्ता सुरू केलंय ना, एकदाचा तुकडा पाडून टाका. मी एक पत्र तुम्हाला देणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की घराघरात ते पत्र पोहोचलं पाहिजे. हे आंदोलन आहे. प्रत्येक वेळी ते रस्त्यावरच केलं पाहिजे असं नाही. पण त्यांचं सहकार्य आवश्यक आहे. तर या गोष्टी बंद होतील, असेही राज ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena leader deepali syed reaction after raj thackeray meeting abn