राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी यंदाच्या संघाच्या विजय दशमी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांना बोलावलं. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शंकर महादेवन यांनी ही माझ्यासाठी आयुष्य बदलून टाकणारी घटना आहे, अशी भावना व्यक्त केली. तसेच माझ्याकडून काही चूक झाली, तर कृपा करून मला माफ करा, असंही नमूद केलं. ते मंगळवारी (२४ ऑक्टोबर) नागपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजय दशमी सोहळ्यात बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शंकर महादेवन म्हणाले, “या कार्यक्रमासाठी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं गेलं यावर माझा विश्वास बसला नाही. वर्षानुवर्षे हा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे. याची माहिती व्हॉट्सअपवर शेअर व्हायला लागली तसे मला जगभरातून फोन कॉल यायला सुरुवात झाली. लोकांचं प्रेम आणि त्यांना झालेला आनंद त्या शुभेच्छांमध्ये दिसत होता. मला हा आदर दिला त्यासाठी मी संघ परिवाराच्या प्रत्येक सदस्याचे आभार मानतो.”

“ही माझ्यासाठी आयुष्य बदलून टाकणारी घटना”

“काही घटना या आयुष्य बदलून टाकणाऱ्या असतात. आज माझ्यासाठी तीच घटना घडली आहे. मी पहिल्यांदा सरसंघचालक मोहन भागवत यांना मुंबईत भेटलो. ती भेट अगदी व्यक्तिगत झाली. अशी भेट देशातील अनेक लोकांना अनुभवायला आवडेल. त्यासाठी मी खुप सुदैवी आहे. ते मला एखादा व्हॉट्सअप मेसेजही पाठवू शकले असते किंवा स्वयंसेवकामार्फत मला बोलावू शकले असते. त्यानंतरही मी अगदी सहजपणे आलो असतो. मात्र, त्यांनी तसं केलं नाही,” असं शंकर महादेवन यांनी सांगितलं.

हेही वाचा : “डॉ. आंबेडकरांची ‘ती’ दोन भाषणं पारायण करण्यासारखी आहेत, वारंवार…”; मोहन भागवतांचं वक्तव्य

“हा अनुभव घेतल्यावर मी आश्चर्यचकीत झालो”

शंकर महादेवन पुढे म्हणाले, “मोहन भागवत यांनी खूप प्रेमाने, आदराने मला व्यक्तिगत निमंत्रण दिलं. त्यामुळे मला फार आनंद झाला. त्यानंतर नागपूरला येऊन हा सोहळा अनुभवणं हा अविस्मरणीय अनुभव आहे. स्मारकात जाणं, अभिवादन करणं, मोहन भागवत यांचं प्रेम, साधेपणा, या कार्यक्रमाचं आयोजन हे सगळंच आश्चर्यकारक होतं.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “लक्षात ठेवा, २०२४ च्या निवडणुकीत मतदान…”; मोहन भागवत यांच्या सूचक वक्तव्याची जोरदार चर्चा

“माझ्याकडून काही चूक झाली तर कृपा करून मला माफ करा”

“हे सर्व बघितल्यावर मला भारतीय नागरिक असल्याचा आणखी अभिमान वाटला. संगीतकार, गायकांना भाषण करायला सांगितलं, तर ते खूप घाबरतात. मीही खूप घाबरलेलो आहे. दोन तीन गाणे म्हणा म्हटलं तर आम्ही सहजपणे गाणी गातो. असं असलं तरी मोहन भागवत यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती मी समजू शकतो. जर माझ्याकडून काही चूक झाली तर कृपा करून मला माफ करा. कारण मला अशाप्रकारे भाषण करण्याची फार सवय नाही,” अशीही भावना महादेवन यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer shankar mahadevan speech in rss vijaya dashami program nagpur pbs