अध्यापनाचे काम, योगदानाची तपासणी करण्याचा निर्णय

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर : जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ मिळविलेले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक रणजितंसिह डिसले यांनी अध्ययनासाठी मागितलेली प्रदीर्घ रजा प्रलंबित ठेवण्यात आली आहे. या अशा रजेमुळे मुख्य अध्यापनाच्या कामावर होणाऱ्या परिणामाचे कारण देण्यात आले असून तुमच्या या अवांतर गोष्टींतून परितेवाडी शाळेत तरी काय बदल झाला, योगदान मिळाले याचा आढावा घेतच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 डिसले यांनी अमेरिकेत जाऊन पीएच. डी करण्यासाठी जि. प. प्राथमिक शिक्षण विभागात गेल्या २१ डिसेंबर रोजी अध्ययन रजेचा अर्ज दिला आहे. डिसले यांनी यासंदर्भात जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन अध्ययन रजेबाबतची अडचण सांगितली. त्यावर स्वामी यांनी डिसले यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार डिसले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन अध्ययन रजेची परवानगी मागितली. तेव्हा अध्ययन रजेचा अर्ज विहित नमुन्यात असणे

गरजेचे असल्याचे सांगत शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी तुम्ही अमेरिकेत पीएच. डी करण्यासाठी गेल्यावर शाळेचे काय करणार, असा सवाल केला. तुमच्या या उपक्रमामुळे येथील अध्यापनाच्या मूळ कामाचे काय, अशी विचारणा करत एवढी प्रदीर्घ रजा शक्य नाही. त्यामुळे यासाठी तुम्हीच पर्याय सुचवा, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी फर्मावले.

परितेवाडी शाळेसाठी काय योगदान?

गेल्या तीन वर्षांत डिसले यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे नाव उंचावण्यासाठी आणि स्वत:च्या परितेवाडी शाळेसाठी काय योगदान दिले, हे पडताळून पाहण्यासाठी त्यांच्या सेवेची फाइल सादर करण्यास शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना सांगितले. डिसले गुरुजींनी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविला, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. परंतु त्यांच्या या उल्लेखनीय कर्तृत्वाचा परितेवाडी जिल्हा परिषद शाळेला किती उपयोग झाला, हे तपासावे लागेल, असे डॉ. लोहार यांनी सांगितले.

चौकशी सुरू

रणजितंसिह डिसले यांनी ‘डाएट’ (जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था) योजनेंतर्गत दोन वर्षे प्रतिनियुक्तीवर सोलापूर व वेळापूर येथे शिक्षण प्रशिक्षण विभागात विशेष शिक्षक म्हणून सेवेत होतो, असा दावा केला असला तरी प्रत्यक्षात ते गैरहजर होते. तसा अहवाल प्राप्त झाला आहे. अशाप्रकारे गैरहजर राहणे गंभीर तर आहेच, परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान करणारेही आहे. त्यामुळे त्यांची चौकशी होऊन पुढील कारवाई होणार आहे, असे सोलापूर जि़ प़ चे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी सांगितले़

शिक्षणातील नवनवीन तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी अमेरिकेत जाऊन पीएच.डी करायची आहे. त्यासाठी दीड महिन्यापूर्वी अध्ययन रजेचा अर्ज दिला होता. रजा का मंजूर झाली नाही हे माहीत नाही.       – रणजितंसिह डिसले

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The best teacher in the world global teacher award display with ranjitha research teaching work akp