मुल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील भाऊजी घोंगडे यांच्या शेतातील पाण्याने भरलेल्या विहीरीत पडलेल्या अंदाजे सहा ते सात महिन्याच्या वाघाच्या नर बछड्याला जीवदान देण्यात आले आहे. वनविभागाच्या शिघ्रकृती दलाच्या पथकाने वाघाच्या बछड्यास सुखरूप बाहेर काढले असून त्यांच्यावर प्राणी उपचार केंद्रात उपचार करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुल तालुक्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझर उपक्षेत्रातील सुशी दाबगाव येथील शेतकरी भाऊजी घोंगडे हे शेतात गेले असता, त्यांना शेतातील विहीरीत वाघाचा बछडा पडला असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेचच याची माहीती चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजुरकर यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, शीघ्र कृती दल कर्मचाºयासह घटनास्थळी दाखल झाले.

मुल येथील संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे, मनोज रणदिवे, पंकज उजवने, राहुल जिरकुंटवार, प्रशांत मुत्यारपवार, स्वप्निल आक्केवार, अंकुश वानी, प्रतीक लेनगुरे, संकल्प गणवीर, यश मोहुर्ले हे सुध्दा घटनास्थळी दाखल झाले. बछड्याला बाहेर काढण्यासाठी शिघ्रकृती दलाच्या पथकला पाचारण करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे, शिघ्र कृती दलाचे अजय मराठे तथा शिघ्रकृती दलाच्या पथकाने कॅच पोलोच्या मदतीने वाघाच्या बछड्याला सुखरुप विहीरीतुन बाहेर काढले. त्यानंतर बछड्याला चंद्रपुर येथील प्राणी उपचार केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

सदर परिसरात वाघीण फिरत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. सदरची कार्यवाही सहाय्यक वनसरंक्षक श्रीनीवास लखमावाड, वनपरिक्षेत्राधिकारी कारेकार, डॉ. पोडचलवार, क्षेत्र सहाय्यक खनके, क्षेत्र सहाय्यक मेश्राम, वनरक्षक गुरनुले, मानकर, मरस्कोले यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger cub fall in well save by forest department scsg