रवींद्र पाथरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकेकाळी मराठी रंगभूमीवर बालनाट्याची चळवळ जोरात होती. सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी, सुलभा देशपांडे, कांचन सोनटक्के आदी मंडळींनी त्याकाळच्या केवळ बालप्रेक्षकांनाच नव्हे, तर तमाम प्रेक्षकांना नाटकाचं खूळ लावलं होतं. त्यातून आजचे अनेक कलाकार आणि प्रेक्षकही घडले; जे आजच्या रंगभूमीचेही प्रेक्षक आहेत. त्यावेळची बालनाट्यं संस्कार, प्रबोधन, मनोरंजन, कल्पकता यांवर आधारित असायची. मुलांचं मन आणि कल्पनाशक्ती घडवण्याचं श्रेय या नाटकांना जातं. कालौघात ही मंडळी इतर माध्यमांत व्यग्र झाली, काही कालवश झाली आणि बालनाट्य चळवळ जवळजवळ ठप्पच झाली. अर्थात अजूनही दरवर्षी नवनवी बालनाट्यं होतात, पण ती मुलांचं मनोरंजन करण्यात थिटी पडतात. डोरेमान, पोकेमान, शिंच्यान- जे मालिकारूपात मुलांना दृश्य माध्यमांत पाहायला मिळतात, तेच परत अळणी स्वरूपात रंगमंचावर पाहण्यात मुलांना रस वाटला नाही तर त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. परंतु अलीकडच्या काळात ‘अलबत्या गलबत्या’, ‘बोक्या सातबंडे’सारखी नाटकंही पुन्हा येऊ लागली आहेत आणि त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. याच पठडीतलं, पण आधुनिक तंत्रज्ञानासहित, आजच्या मुलांची मानसिकता ओळखत त्यांना पुन्हा एकदा मातृभाषेच्या संस्कारांपर्यंत घेऊन जाणारं क्षितीज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित ‘आज्जीबाई जोरात’ हे नवं नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं आहे. जिगीषा-अष्टविनायकची ही निर्मिती आहे. आज तंत्रज्ञानाच्या पुरत्या आहारी गेलेल्या मुलांना त्यांच्या कलाकलानं पुनश्च आजूबाजूच्या जगाकडे, पुस्तकं, वाचनसंस्कार, त्यातून त्यांचा होणारा व्यक्तिमत्त्व विकास यांकडे वळवणं ही खूपच कठीण गोष्ट झाली आहे. प्रत्येक गोष्ट हाताच्या बोटांवर मिळण्याची सवय लागलेल्या या पिढीच्या मनोरंजनाचा वेगळा विचार करणं त्यामुळेच निकडीचं झालं आहे. हल्ली मुलांना खेळायला मैदानं उरली नाहीत. पूर्वीसारखी आजी-आजोबांसहची एकत्र कुटुंबं उरलेली नाहीत. त्यामुळे मुलांच्या त्यांच्याबरोबरच्या गप्पागोष्टी वगैरे सगळंच संपलं आहे. हल्ली घरात एखादंच मूल असतं. ना त्याला भावंड असत, ना मित्र. अशावेळी त्याला मोबाइल घेऊन दिला की त्याचा तो आपोआपच रमतो असा पालकांनी आपला ग्रह करून घेतलेला आहे. मुलांना द्यायला पालकांकडेही वेळ नाहीए. तेही सोशल मीडिया आणि आपल्या रोजच्या व्यवधानांत कमालीचे व्यग्र झालेले आहेत. याचे जे काही भयंकर परिणाम आजच्या पिढीवर होत आहेत, त्याची पुसटशीही कल्पना त्यांना नाही. आणि जेव्हा कधीतरी अचानकपणे हे वास्तव त्यांच्या समोर येतं तेव्हा ते मग बावचळून जातात. पण तेव्हा खूपच उशीर झालेला असतो. या व्यथेलाच बालनाट्याच्या रूपात हात घालणारं ‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक आहे. एकीकडे आजच्या पिढीचं तंत्रज्ञान वापरून मुलांना त्यात खिळवून ठेवायचं आणि त्यांच्या कलानं घेत त्यांच्यावर भाषेचे संस्कार करायचे, त्याचवेळी त्यांचं भरपेट मनोरंजनही करायचं असा तिहेरी घाट या नाटकानं घातला आहे.

हेही वाचा >>> सतीश आळेकर लिखित ‘ठकीशी संवाद’ रंगमंचावर

अक्षर हा मुलगा मोबाइल गेम्सच्या पार आहारी गेलेला आहे. त्यात तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्याने मातृभाषेची त्याची पार बोंबच आहे. आईही मोबाइलमध्ये सदानकदा दंग असल्याने तिचंही त्याच्याकडे नीट लक्ष नाहीए. शाळेतून सतत त्याच्याबद्दलच्या तक्रारी येतात. पण त्याला त्याचं काहीही वाटत नाही. आई चिडून त्याला धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतेही, पण त्याला तिची भीती वाटेनाशी झाली आहे. अशात एक आज्जीबाई त्यांच्याकडे येतात. घरातली गोंधळी परिस्थिता त्यांच्या लक्षात येते. त्या मग अक्षरला ताळ्यावर आणायचा विडा उचलतात. त्याला मोबाइलच्या मगरमिठीतून सोडवून मराठी भाषेची गोडी लागावी म्हणून त्या नाना क्लृप्त्या योजतात. त्याची गोष्ट म्हणजे हे नाटक होय.

मराठी भाषेचे संस्कार करणं म्हणजे निव्वळ घोकंपट्टी नव्हे. तिच्या अनेकानेक आविष्कारांशी त्याचा हळूहळू परिचय करून देणं- आणि तेही एकीकडे त्याचं मनोरंजन करत, हसतखेळत त्याला गुंतवून ठेवत, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत करायचं. यात लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन भलतेच यशस्वी झाले आहेत. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत, त्यांना परी, राक्षस, निसर्ग, खेळ, नाच-गाणी, जादूचे खेळ यांच्याशी त्यांची ओळख करून देत त्यांनी हे साध्य केलं आहे. मोबाइलचे धोकेही मुलांना कळतील आणि आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही वापर योग्य तऱ्हेनं कसा करता येऊ शकतो याचं उत्तम उदाहरण घालून देत त्यांनी हे जमवलं आहे. या अर्थानं हे नाटक आजच्या पिढीशी कनेक्ट होतं आणि त्यातले धोकेही त्यांना कळून येतात. आधुनिक तंत्रज्ञानातील प्रतिमा-प्रतीकं वापरूनच हे केल्यानं वर्तमान पिढीतली मुलं या नाटकाशी आपली नाळ जोडू शकतात. गाव, तिथली माणसं, निसर्ग यांच्याशीही ती जोडली जातात. आणि परी, राक्षस वगैरेच्या अद्भुत जगाशीही त्यांची नव्याने ओळख होते. नाटकात दृक्-श्राव्य माध्यमाचाही (अॅनिमेशन) वापर करून ही गोष्ट पुढे सरकते. अशा तऱ्हेनं नव्या-जुन्याचं कॉकटेल या बालनाट्यात घडवून आणण्यात आलं आहे. त्यासाठी नवी रंग-परिभाषाही जाणीवपूर्वक योजली गेली आहे. नेपथ्य, संगीत, वेशभूषा, रंगभूषा यांचं नवेपण नाटक पाहताना प्रकर्षानं जाणवतं. बालप्रेक्षकांनाही यात प्रत्यक्ष सामील करून घेत त्यांचंच जग त्यांच्यासमोर यातून मांडलं आहे.

प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्य आणि प्रकाशयोजनेत मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी सगळ्या युक्त्याप्रयुक्त्या वापरल्या आहेत. प्रसन्न, आल्हाददायक, अद्भुतरम्य वातावरणनिर्मिती करून त्यांनी मुलांना नाटकात सामील करून घेतलं आहे. सुभाष नकाशे यांनी नृत्यांतून मुलांना रिझवण्याची कामगिरी फक्कड केली आहे. सौरभ-क्षितीज यांचं उडतं, ठेकेदार संगीत मुलांना गुंतवून आपलंसं करतं. नाटकात राक्षस, परी, शाळेतील मुलं, गावकरी, आज्जीबाई अशी नाना परीची माणसं आहेत. त्यांची वास्तवदर्शी आणि अद्भुत वेशभूषा कल्याणी कुलकर्णी-गुगळे यांनी केली आहे. अभिनय बेर्डे यांनी यातला वांड, पण लोभस अक्षर धमाल वठवला आहे. त्याची अखंड ऊर्जा नाटकाचा आलेख उंचावते. आज्जीबाईच्या भूमिकेत निर्मिती सावंत यांचा मनमोकळा वावर, नव्या पिढीला घोळात घेऊन भाषिक संस्कार करण्याचं त्यांचं तंत्र अप्रतिम आहे. पुष्कर श्रोत्री यांचा घाटावरचा आणि कोकणातला बडबड्या सरपंच हशा आणि टाळ्या वसूल करणारा. मुग्धा गोडबोले यांनी अक्षरची आई नामे टेन्शनयुक्त स्त्री सहजी साकारलीय. जयवंत वाडकरांचा गेमार्ड व्हिलन लक्षणीय. बाकी सगळ्या मुलांचा उत्साही सहभाग नाटकाला ऊर्जा पुरवणारा. यातली दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आवाजातील नाटकाची उद्घोषणा ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वानवळा ठरावी.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aajji bai jorat marathi natak review by loksatta ravindra pathre zws