विविध चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता अमेय वाघ आता आणखी एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘मुरांबा’ या चित्रपटाच्या निमित्ताने अमेय वाघ आणि मिथिला पालकर ही एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. नेहमीच बेव सिरिज आणि सोशल मीडियामुळे चर्चेत असणाऱ्या मिथिलाचासुद्धा या चित्रपटात सहभाग असल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता पाहायला मिळतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेय वाघने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन आगामी चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला आहे. या पोस्टरसोबतच त्याने सुरेख असे कॅप्शनही लिहिले आहे. ‘मी आणि मिथिला एकमेकांना डेट करतोय. पण, चित्रपटात. आम्ही कपल आहोत. पण, चित्रपटात. हो मी सध्या सिंगलच आहे….पण, तरीही मी या चित्रपटाच्या प्रेमात आकंठ बुडालो आहे. मिथिला आणि माझी जोडी ज्यांना आवडते त्या सर्वांसाठी यंदाच्या उन्हाळ्यात आम्ही घेऊन येत आहोत ही खास भेट….मुरांबा’, असे कॅप्शन अमेयने लिहिले आहे. ‘मुरांबा’ चित्रपटाचा पोस्टर पाहता धमाल कथानक आणि या फ्रेश जोडीची सांगड चित्रपटाच्या माध्यमातून घालण्यात आली आहे, असेच म्हणावे लागेल.

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी अमेयने सोशल मीडियावर त्याचा आणि मिथिलाचा एक फोटो पोस्ट करत ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे भासवले होते. इतकेच काय, तर या दोघांच्या पोस्ट पाहता अनेकांचा यावर विश्वासही बसला होता. पण, डेटिंगचा तो सर्व घाट या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी घालण्यात आला होता हे आता स्पष्ट झाले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमेय आणि मिथिला एका सोफ्यावर उलटे झोपलेले दिसत असून, त्यांचा नेहमीचाच फ्रेश लूक अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपटाचा पोस्टर पाहता आता नेमका हा मुरांबा असणार तरी कसा? याबद्दलचे तर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, ‘घंटा’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर आता दशमी क्रिएशन्सने त्यांचा मोर्चा ‘मुरांबा’ या चित्रपटाकडे वळवला आहे. वरुण नार्वेकर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल तरुणाईमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amey wagh mithila palkar upcoming movie muramba movie new poster launch