मला एक सख्खा भाऊ  आहे, त्यामुळे या मनोरंजनक्षेत्रातील कुठल्या अभिनेत्याला मी माझा भाऊ  मानेन असं कधीच वाटलं नव्हतं. पण आता ते स्थान अभिनेता आस्ताद काळेने पटकावलं आहे. तो मला ताई म्हणतो आणि ताई मानतोही. त्याचे आई-वडील पुण्यात राहतात. त्यामुळे मुंबईतील त्याची मार्गदर्शक म्हणून मला त्यांनी नेमलं आहे, असं रेशम हसत म्हणाली. त्याचं काही चुकलं तर ओरडण्यासाठी मी त्याच्यावर लक्ष ठेवून असते. या वर्षी मनापासून मला आस्तादला राखी बांधावीशी वाटते आहे आणि मी बांधणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आस्तादला मी अभिनेता म्हणून आधीपासून ओळखत होते, पण त्याच्याशी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. तोही मला अभिनेत्री म्हणून ओळखत होता. बिग बॉसच्या घरात आमची पहिली भेट झाली. तेव्हा आमची मस्त ओळख झाली. आम्ही एकमेकांशी छान बोलू लागलो, असं रेशमने सांगितलं.

आस्ताद खूप चांगला अभिनेता आहे. तो त्याच्या जवळच्या व्यक्तींची खूप काळजी घेतो. तो स्त्रियांचा आदर करतो. तो सोबत असला की सुरक्षित वाटतं. आमचं दोघांचं चांगलं जमतं पण मला अजून त्याच्याइतकं छान मराठी बोलता येत नाही. त्याच्याबरोबर बोलताना माझा गोंधळ उडतो, तेव्हा तो मला नेहमी म्हणतो, रेशमताई कळल्या मला तुझ्या भावना, तुला काय म्हणायचं आहे.. इतकं तो मला समजून घेतो. बिग बॉसच्या घरात आम्ही दोघेच असे स्पर्धक होतो की जे गॉसिप, इतरांबद्दल काहीबाही बोलण्यापेक्षा आम्ही एकमेकांविषयी बोलायचो. आम्ही दोघे नाटकाविषयी, आस्तादच्या गाण्याविषयी बोलायचो. त्यामुळे आमच्या उणीदुणी काढण्याच्या गप्पा कधी व्हायच्या नाहीत तर त्या सर्जनशील गप्पा व्हायच्या. त्या गप्पा हरवल्या आहेत, पण आता लवकरच त्याला भेटेन आणि या गप्पा पुन्हा रंगतील, अशी भावनाही तिने बोलून दाखवली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astad kale resham tipnis